अतिर खान
या ईदला मुस्लिम समाजाला देण्यासारखासर्वोत्तम उपहार म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी एक नवी चेतना निर्माण करण्यात हातभार लावणं. ईद म्हणजे एकमेकांना अर्थपूर्ण भेटी देण्याची परंपरा. पण आजच्या काळात सर्वात प्रभावी गिफ्ट म्हणजे जीवनाची नवी दिशा. इस्लामिक अभ्यास, सूफीवाद, तर्कशुद्ध विचार आणि सांस्कृतिक ओळख यांचा मेळ घालून मुस्लिम समाजाला एकजूट आणि प्रगत भविष्य देणारी नवी दिशा!
इस्लामच्या सुरुवातीपासून तीन मुख्य विचारप्रवाहांचा एकत्रित विकास झाला. उलेमा (धर्मशास्त्रज्ञ), सूफी (आध्यात्मिक संत) आणि तर्कवादी (बुद्धिवादी आणि तत्त्वज्ञानी) हे ते तीन प्रवाह’. या तिन्ही प्रवाहांनी मुस्लिमांच्या वैचारिक जडणघडणीला बहुरंगी केले. पण एखाद्या प्रवाहावर अधिक भर दिला गेल्यामुळे बाकीच्यांकडे दुर्लक्ष झालं आणि मुस्लिम समाजाची सर्वांगीण विकास आणि प्रगती खुंटली.
इतिहासात इब्न रुश्द (अव्हेरोस) यांनी विज्ञान आणि तत्त्वज्ञानात मोठं योगदान दिलं. युरोपच्या प्रबोधनात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पण मुस्लिम धर्मशास्त्रज्ञांनी या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं नाही. इब्न रुश्दची मांडणी काही धार्मिक शिकवणींशी जुळत नाही अशी धर्ममार्तंडांना शंका वाटली. या कल्पना इस्लामिक श्रद्धा आणि प्रथांना धोका पोहोचवतील अशी भीती त्यांना होती.
दुसरीकडे, सूफीवादाच्या रहस्यमयी दृष्टिकोनाला उलेमांनी विरोध केला. कारण त्यांच्या काही प्रथा उलेमांना ‘मुख्य’ किंवा ‘खऱ्या’ इस्लामिक परंपरेपासून वेगळ्या वाटल्या. बरेचदा त्यांवर ‘शिर्क’चे (एकेश्वरवादाला तडा जाईल अशी कृती) आरोपही झाले.
वेगवेगळ्या विचारांमधील हे मतभेद मुस्लिम समाजाला मौल्यवान आणि प्रगतीशील दृष्टिकोनापासून रोखत आले. मात्र या दृष्टिकोनांचा मेळ घालणं गरजेचं आहे.
इस्लाम केवळ धर्म नाही; तो एक सामाजिक व्यवस्था आहे, नैतिक चौकट आहे, विचारधारा आहे. श्रद्धेचे वेगवेगळे अर्थ आणि मार्ग असू शकतात हे समजून घेणं मुस्लिम प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक आणि व्यावहारिक यांच्यात संतुलन ठेवणंही तितकंच आवश्यक आहे.
मुस्लिमांनी फक्त परलोकावर (आखिरत) लक्ष केंद्रित करू नये, तर आपलं आजचं आयुष्य सुधारण्यासाठीही प्रयत्न करावेत. आजचं सार्थक जीवन परलोकाला विसरून मिळवावं असं नाही, आणि परलोकासाठी आजचं आयुष्य सोडावं असंही नाही. दोन्ही गोष्टी स्वीकारूनच मुस्लिम स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी आध्यात्मिक आणि व्यावहारिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगू शकतात.
कृतिशीलता आणि सहभागाने भरलेलं जीवन नशीबावर अवलंबून राहण्यापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे. पण दुर्दैवाने, सर्व काही नियतीने ठरलेलं आहे असा समज मुस्लिम जगात, विशेषतः भारतात, मोठा अडथळा ठरलाय.
भारतात उलेमांचं मुस्लिम समाजात मोठं स्थान आहे. पण शिक्षणव्यवस्था अजूनही पारंपरिक इस्लामिक शिकवणींवरच केंद्रित आहे - कुराण, हदीस आणि कायद्यांचा अभ्यास यावरच भर. काही विद्वान अपवादात्मक आहेत, पण बहुतेक संस्थांना आधुनिक जागतिक वास्तवाशी जुळणारी दृष्टी नाही. आधुनिक शिक्षणाच्या निकषांनाही त्या अपुऱ्या पडतात.
भारतातले बहुसंख्य मुस्लिम अशा संस्थांमधून शिक्षण घेतात. तिथे धार्मिक ग्रंथांचा आधुनिक संशोधनात्मक दृष्टिकोन मिळत नाही. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या अल-अझहरसारख्या इस्लामिक संस्थांनाही आजच्या समस्यांशी जुळणारं अभ्यासक्रम राखण्यात अडचणी येतात. शिक्षणातली ही तूट मुस्लिमांना बौद्धिक आणि सामाजिकदृष्ट्या आधुनिक जगाशी जोडण्यात अडथळा ठरते.
पारंपरिक इस्लामिक शिक्षणाच्या उलट, सूफीवाद अनेक भारतीय मुस्लिमांसाठी आध्यात्मिक आधार बनतो. अजमेर शरीफ आणि निजामुद्दिन औलिया यांसारख्या पवित्र स्थळांशी जोडलेल्यांसाठी तर विशेषतः. पण सूफीवाद आत्म्याला सांत्वन देतो, तरीही व्यापक सामाजिक प्रश्न सोडवण्यात कमी पडतो. काही ठिकाणी सूफी प्रथाही व्यावसायिक झाल्या आहेत - प्रार्थना आणि विधींची पैशातून देवाणघेवाण होते. यामुळे सूफीवाद जीवनाचं संपूर्ण मार्गदर्शक राहिलेला नाही.
दुसरीकडे, भारतातले तर्कवादी मुस्लिम - जे अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, जामिया मिलिया इस्लामिया, जामिया हमदर्द यांसारख्या सेक्युलर संस्थांमधून शिक्षण घेतात - श्रद्धा आणि बुद्धिवादाचा मेळ घालतात. इस्लामिक शिकवणींना आधुनिक ज्ञानाशी जुळवून ते असा समाज घडवण्याचा प्रयत्न करतात जो इस्लामिक मूल्यं जपतो आणि आधुनिकताही स्वीकारतो.
पण त्यांचं महत्त्व असूनही, उलेमा त्यांना विरोध करतात. आधुनिक शिक्षण धार्मिक श्रद्धेशी जुळत नाही असं त्यांना वाटतं. या विरोधामुळे अनेक तर्कवादी आपल्या बौद्धिक वर्तुळात मागे हटतात. समाजाशी जोडलं जाण्याची भीती त्यांना वाटते.
आज उलेमा, सूफीवाद आणि तर्कवाद हे वेगवेगळे तुकडे बनून राहिले आहेत. त्यांच्यात अर्थपूर्ण संवाद होत नाही. ही दरी मुस्लिम समाजाच्या प्रगतीपुढचा सर्वात मोठा अडथळा आहे. या विचारप्रवाहांना एकत्र आणणारी व्यासपीठं तयार करणं गरजेचं आहे. त्यांच्यातले मतभेद चर्चेतून सोडवून एकत्रित उपाय शोधले पाहिजेत.
इतिहासात वाहाबी चळवळीचा उदय आणि आयसिससारख्या टोकाच्या गटांचा प्रभाव यामुळे इस्लामिक विचारात असमतोलाचे धोके दिसले. अकराव्या शतकात मुताझिला तर्कवाद्यांच्या टोकाच्या भूमिकांमुळे धार्मिक मतभेद निर्माण झाले. इमाम गझालीसारख्या विद्वानांनी पारंपरिक अर्थ पुन्हा रुजवून हे मतभेद मिटवले.
ऑट्टोमन साम्राज्यात छापखान्याला नाकारणं हे बौद्धिक प्रगतीपुढचं अडथळं ठरलं. नव्या कल्पनांचा प्रसार थांबला. विसाव्या शतकात वसाहतवादाच्या विरोधात आधुनिकतेला नकार देताना अल्लामा इक्बाल यांनी दक्षिण आशियातल्या मुस्लिमांसाठी नवी चेतना मांडली. धर्माशी तडजोड न करता एकता आणि प्रगतीचा मार्ग त्यांनी दाखवला.
भारतीय मुस्लिम ओळखेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हिंदू संस्कृतीशी त्यांचं नातं. शतकानुशतके हिंदू संस्कृतीशी मिळूनमिसळून राहिलेला हा वारसा भारतीय मुस्लिम नाकारू शकत नाहीत. फक्त इस्लामिक ओळख जोपासण्यासाठी हे नातं तोडणं म्हणजे मोठ्या समाजापासून दूर जाणं आणि सांप्रदायिक तणाव वाढवणं होईल.
या सांस्कृतिक इतिहासाला स्वीकारणं म्हणजे इस्लामिक तत्त्वं सोडणं नाही. उलट, यामुळे मुस्लिमांना आपल्या जीवनशैलीवर प्रभाव टाकणाऱ्या बौद्धिक आणि सांस्कृतिक परंपरा - खानपान, कपडे, वास्तुकला - स्वीकारता येतात. आज जगभरातले मुस्लिम विद्वान, अगदी पाकिस्तानातलेही, भगवद्गीता, वेद आणि उपनिषदांसारख्या प्राचीन हिंदू ग्रंथांकडे पुन्हा पाहत आहेत. भारतीय मुस्लिमांनीही असंच करावं - श्रद्धा कमी करण्यासाठी नाही, तर दोन्ही समाजांत परस्पर आदर आणि समज वाढवण्यासाठी.
इस्लामिक आणि हिंदू बौद्धिक परंपरांचा मेळ घालून भारतीय मुस्लिम आपलं ज्ञान समृद्ध करू शकतात. यातून शांततामय आणि प्रगतीशील समाज घडेल. संवाद, सहकार्य आणि देशाच्या एकूण प्रगतीसाठी हा दृष्टिकोन उपयुक्त ठरेल.
या ईदला मस्जिदीतले खुत्बे (प्रवचनं) फक्त मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी प्रार्थनांपुरते मर्यादित राहू नयेत. समाजातल्या दऱ्या बुजवणारी नवी चेतना निर्माण करण्याचं आवाहनही त्यात असावं. उलेमा, सूफी आणि तर्कवादी यांच्यात पूल बांधणं हे याचं मुख्य ध्येय आहे. हे साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकत्र काम केल्याशिवाय वेगाने बदलणाऱ्या जगात मुस्लिम आपली पूर्ण क्षमता साकारू शकणार नाहीत.
- अतिर खान
(लेखक 'आवाज द व्हॉइस'चे मुख्य संपादक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -