देशातील आणि राज्यातील नेत्यांनी दिल्या ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’च्या शुभेच्छा

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने मुस्लिम बांधव  'ईद-ए-मिलाद-उन-नबी' उत्साहात साजरी करतात. या यादिवशी जुलूस म्हणजे मिरवणूक काढली जाते. ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ निमित्त राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटवर ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “ईद मुबारक! ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. समाजात सद्भाव आणि एकता सदैव टिकून राहो. सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदो.” 
 
 
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनीदेखील मुस्लिम बंधुभगिनींना  ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मिलाद -उन- नबी च्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात त्या म्हणतात,  "मिलाद -उन- नबी म्हणून साजऱ्या होणाऱ्या प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसानिमित्त, मी सर्व नागरिकांना - विशेषतः मुस्लिम बंधुभगिनींना सस्नेह शुभेच्छा देत आहे. प्रेम आणि बंधुभाव या भावना दृढ करण्यासाठी प्रेषित मोहम्मद यांनी आपल्याला प्रेरणा दिली. समाजातील समता आणि सुसंवाद यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी लोकांना इतरांप्रती करुणामय राहून सेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पवित्र कुराणातील पावन शिकवण अंगीकारूया आणि शांततामय समाजाच्या उभारणीसाठी निश्चय करूया." 
 
ईद निमित्त शुभेच्छा देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, " सर्वांना ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक. ईदचा शुभ प्रसंग आपल्या हृदयात आणि घरात शांती,आनंद आणि करुणा घेऊन येवो. ईदच्या निमित्ताने सर्वांना सुख आणि भरभराटीसाठी शुभेच्छा."
 
कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा  दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, "सर्वांना ईद मिलाद-उन-नबी मुबारक.ईदच्या शुभ प्रसंगी आपल्या जीवनात शांती,करुणा आणि समृद्धी घेऊन येवो. तसेच सर्वांमध्ये एकता, सौहार्द वाढवो."
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'निमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे की, "ईद–ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा"
 
 
तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईदच्या मुस्लिम बांधवांना  शुभेच्छा दिल्या. 
 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, "राज्यातील जनतेला 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा! ‘ईद’च्या या पवित्रदिनी घरोघरी यश, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि समाधान नांदो ही सदिच्छा! हा सण सर्व समाजघटकाला सोबत घेऊन आनंदानं साजरा करा, असं आवाहन करतो. त्याचप्रमाणे जनकल्याणासाठी मोहम्मद पैगंबर यांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार आपण सर्वांनी करूया."
 
 
शरद पवार यांनीही जनतेला 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ईदनिमित्त आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "प्रेम व सद्भावनेतून माणुसकी जपण्याचा संदेश मोहम्मद पैगंबर यांनी दिला. हिच शिकवण आत्मसात करून सामाजिक बांधिलकी जपूयात. सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा."
 
खासदार सुप्रिया सुळे यांनीही ईदनिमित्त शुभेच्छा देत लिहिले आहे की, "प्रेमाचा संदेश देणाऱ्या ईद ए मिलाद सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा."