शेकडो नागरिकांची ईद गोड करणारे ‘एहसास फाउंडेशन’

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
रमजान कीट तयार करताना एहसास फाउंडेशनचे कार्यकर्ते
रमजान कीट तयार करताना एहसास फाउंडेशनचे कार्यकर्ते

 

देशभरात ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. महिनाभर रोजे पकडून अल्लाहची उपासना करणाऱ्ऱ्यांसाठी हा सण नवचैतन्य घेऊन आला. रमजान ईदचा हा दिवस म्हणजे तीस दिवसांच्या रोज्यांचे फळ आणि एकमेकांप्रती प्रेमाचा उत्सव. 

यादिवशी पहाटे सूर्य उगवल्यापासून चहूकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. नवे कपडे, इत्राचा सुगंध आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन सगळे ईदगाहकडे नमाज पढण्यासाठी निघतात. ईदची नमाज आटोपल्यावर ‘ईद मुबारक’ म्हणत प्रेमाने एकमेकांच्या गळाभेटी घेतात. घरी परतल्यावर दस्तरखानावर सुक्यामेव्याने सजवलेली शिरखुरम्याची वाटी आणि गोड गुलगुल्यांची मेजवानी सजते. हे सगळे अगदी मन प्रसन्न करणारे असते. परंतु यापद्धतीची ईद सर्वांच्याच नशिबी नसते. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना आपली ईद अगदी साध्या पद्धतीने साजरी करावी लागते. 

ईद सारख्या सणांच्या वेळी प्रत्येकजण आनंद साजरा करू इच्छितो, तेव्हा गरिबांचा सण गोड करण्यासाठी धाराशिवमधील एक संस्था कार्यरत आहे. इस्लाममध्ये जकात आणि सदका (स्वेच्छेने दिलेले दान) यांचे अधिक महत्त्व आहे. इस्लामच्या पाच मुख्य आधारस्तंभांपैकी एक म्हणजे जकात, ज्यामध्ये प्रत्येक सक्षम मुस्लिम व्यक्तीने आपल्या संपत्तीचा काही हिस्सा गरिबांना आणि समाजाच्या कल्याणासाठी दान करणे अनिवार्य आहे. आपले हेच धार्मिक कर्तव्य ओळखून एहसास फाउंडेशन गरिबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. 

एहसास फाउंडेशन गेल्या पाच वर्षांपासून ‘रमजान कीट’चे वाटप करत आहे. धाराशिवमधील काही मित्रांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू केला. कोरोना काळात उपासमार झालेल्या गरजू लोकांना या संस्थेने जेवणाचे डबे पुरवले होते. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता या संस्थेने उपासमारी विरोधात लढण्याचे ठरवले आणि ही कार्य हाती घेतले. यंदा ईदच्या पार्श्वभूमीवर या संस्थेने १५० हून अधिक किट्सचे वाटप केले आहे. 

काय आहे ‘रमजान कीट’
समाजात एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणारा वर्ग आहे. या लोकांची निदान सणसुद तरी गोड व्हावी यासाठी एहसास फाउंडेशन अशा गरजू लोकांचा शोध घेते आणि ईदच्या निमित्ताने रमजान कीटचे वाटप करते. ईद साजरी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सगळ्याचा या कीटमध्ये समावेश आहे. शिरखुरम्यासाठी लागणाऱ्या शेवया, काजू-बदाम, तांदूळ ते अगदी तेलापर्यंत सगळा किराणा पुरवला जातो. जेणेकरून त्यांना ईद साजरी करण्यासाठी काही कमतरता भासू नये. 

या उपक्रमविषयी बोलताना संस्थेचे कार्यकर्ते खादिम सय्यद म्हणाले, “आपल्या समाजात एक असा वर्ग आहे ज्यांना आर्थिक विवंचनेमुळे अगदी खण्यापिण्याचे प्रश्न असतात. पण ते लोक समोर येऊन त्यांच्या अडचणी बोलून दाखवत नाहीत. मग समाजातील अशा लोकांचा शोध घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना रमजान कीटचे वाटप करतो. उपक्रम सुरू केल्यापासून आम्ही आजपर्यंत ६०० पेक्षा जास्त कुटुंबांची ईद गोड केली आहे.”   

ते पुढे म्हणतात, “हा उपक्रम आम्ही सगळे संस्थेचे कार्यकर्ते मिळून राबावतो. त्यासाठी पैशांची जमवाजमव सुद्धा आम्हीच कार्यकर्ते करतो. प्रत्येकजण दोन कीटचा खर्च उचलतो. नातेवाईक, मित्रमंडळी आमच्याजवळ येतात आणि  स्वेच्छेने १-२ कीटचे पैसे देतात. अशा पद्धतीने आम्हाला या उपक्रमासाठी समाजातून आर्थिक मदत देखील मिळते. हा उपक्रम धारशिवपुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जावा यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. यासाठी आम्हाला त्या त्या शहरातील स्थानिक नागरिकांची मदत मिळाल्यावर आम्ही नक्कीच सर्वत्र हा रमजान कीटचे वाटप करण्यात यशस्वी ठरू.” 

इस्लामची शिकवण 
या उपक्रमाला धर्माचा आधार देत खादिम सय्यद म्हणतात, “रमजानचा हा महिना मुस्लिमांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. त्यामध्ये लोक संपूर्ण महिनाभर रोजा करून ईदच्या दिवशी मोठा उत्सव करतात. हा सण साजरा करताना केवळ आपल्यापूरते न पाहता गरजूंची मदत केल्याने अल्लाह जास्त खुश होतो, असं मी मानतो. रमजानच्या या पवित्र काळात एक सत्कर्म केले तर, ते ७० चांगल्या कर्मांचे फळ मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या महिन्यात लोकं जास्तीत जास्त सत्कर्म करून पुण्याचे भागीदार होतात.” 

ते पुढे म्हणतात, “ज्यापद्धतीने महिनाभर कडक रोजे पकडून काटेकोरपणे इतर धार्मिक गोष्टी पाळल्या जातात, त्याचप्रमाणे लोक दानधर्म देखील देखील आवर्जून करतात. आम्ही ज्यावेळी लोकांकडे उपक्रमासाठी आर्थिक मदत मागायला जातो तेव्हा कधीच नाही म्हणत नाही, कारण ही मदत सत्कारणी लागणार असल्याचे त्यांनाही माहीत आहे.”

उपक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना खादिम म्हणतात, “आम्ही ज्या गरजवंतांना मदत करतो, त्याचे आम्ही कधीही फोटो काढत नाही. हे सगळं काही आम्ही गुप्त पद्धतीने करतो. कारण ज्याने कीटचा लाभ घेतला आहे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भावना यायला नको किंवा त्याला कोणता कमीपणा वाटायला नको. कारण आमचा हेतु शुद्ध आहे आणि हे सगळं आम्ही पाक अंतकरणाने करतोय.”  

रमजान काळात मोफत सेहरीचे वाटप 
रमजानच्या महिन्यात रोजामुळे खाण्यापिण्याच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. अशावेळी कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या रोजेदारांची गैरसोय होते. हीच अडचण ओळखून एहसास फाउंडेशन गेल्या ५ वर्षांपासून उस्मानाबादमध्ये रमजान काळात मोफत सेहरी आणि इफ्तारचे वाटप करते. 

‘करो मेहरबानी तुम अहले जमीं पर, खुदा महरबान होगा अर्शे बरी पर’ इस्लामचा हाच संदेश घेऊन ही संस्था आजवर कार्यरत आहे. याविषयी बोलताना खालीम म्हणाले, “गरजूंना मदत हे उपकार नसून तो आपला फर्ज आहे, याची जाणीव कायम असायला हवी. आम्ही ज्याला कुणाला मदत करतो ते सगळेच आम्हाला आशीर्वाद देतात. आमच्या धर्मात सुद्धा मानवसेवेला विशेष असे महत्व आहे. त्याच आधारावर आम्ही ही समाजसेवा करतो.”

सर्वधर्मियांसाठी इफ्तारचे आयोजन 
एहसास फाउंडेशन रमजानच्या काळात सर्वधर्मियांसाठी विशेष इफ्तारचे आयोजन करते. त्यामध्ये स्थानिक मुस्लिम नागरिक, विविध संस्था, पत्रकार बांधव आदींचा सहभाग असतो. या उपक्रमविषयी बोलताना संस्थेचे कार्यकर्ते खादिम सय्यद म्हणतात, “आजच्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वातावरणात राबवणे गरजेचे आहे. आमच्या या इफ्तारला हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि यांच्यात आपुलकीचा संवाद झाला. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या हिंदू बांधवांनी म्हटलं की आम्ही तुमला इफ्तार पार्टी दिली पाहिजे, तर तुम्हीच आम्हाला देताय. यावेळी मला त्यांना सांगावसं वाटलं की, आत्ता सध्या आपला मेलमिलाब होणं गरजेचं आहे.”

ते पुढे म्हणतात, “आज समाजात धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू आहे, अशा वातावरणात असे सामाजिक  उपक्रम राबवणे महत्वाचे आहे. कारण या राजकारणाचा परिणाम सर्वसामान्य माणसावर होतो. मग अशा उपक्रमांच्या मध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. समाज एकत्र आलाच नाही आपापसातील जिव्हाळा कमी होऊन दुरावा निर्माण होईल. हेच आम्हाला होऊ द्यायचे नाहीये.”

दिल की दिवाली 
रमजानच्या काळात रमजान कीटचे वाटप केले जाते, अगदी त्याच पद्धतीने दिवाळीला देखील ही संस्था गरजूंना किराणा पुरवते. दिवाळी सणाला फराळासाठी लागणारे सामान त्या कीटद्वारे गरजूंपर्यंत पोहोचवले जाते. 

या उपक्रमविषयी बोलताना खादिम म्हणाले, “हा उपक्रम राबवताना आम्ही जात-धर्म वैगेरे काही पाळले नाही, कारण आम्हाला केवळ माणुसकी जपायची आहे. आत्ता महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यापासून सामान्य माणसाने लांब राहत बंधुभाव जपला पाहिजे. आपली भारतीय संस्कृती, व्यापार एकमेकांशी निगडीत आहे, त्यामुळे आपले मनाचे व्यवहार आपण असेच निर्मळपणे केले पाहिजेत. हा संदेश देण्यासाठी ‘दिल की दिवाली’ सारखे उपक्रम आम्ही राबवत राहणार आणि आम्हाला समाजातून आणखी सहकार्य मिळाले तर आम्ही महाराष्ट्रभर याचा प्रसार करणार.   
 
- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter