वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी आणि पायाभूत सुविधांना १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय काल (ता. २८) प्रशासनाने घेतला. मात्र आता २४ तासातच शासनाकडून हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक होती, अशी माहिती मुख्य सचिव सुजिता सौनिक यांनी दिली आहे. त्यामुळे वक्फ संदर्भातील जीआर मागे घेतल्याचे मुख्य सचिव यांनी सांगितले आहे.
नेमका काय होता शासन निर्णय?
या जीआरनुसार २०२४-२५ वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे 'वक्फ'साठी एकूण २० कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी दोन कोटी अनुदान निवडणूकांपूर्वीच वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले होते. उर्वरित निधीची रक्कम टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार होती. त्यापैकी १० कोटी रुपये रक्कम वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी मंजूर करण्यात आली होती. त्याविषयीचा जीआर अल्पसंख्यांक विभागाकडून काढण्यात आला होता.
का घेण्यात आला निर्णय मागे?
'वक्फ'वरून गेल्या काही महिन्यांपासून केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे वातावरण तापले आहे. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार वक्फ सुधारणा विधेयक सादर करणार होती, मात्र नुकतीच त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी वक्फ बोर्ड आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींवर वारंवार टीका केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर संवाद साधताना 'वक्फ सारखी तरतूद संविधानविरोधी' असल्याचे म्हणत याविषयी पहिल्यांदाच जाहीर भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर महायुतीचे नवे सरकार स्थापन होण्याआधीच 'वक्फ बळकटीकरणा'साठी १० कोटींचा निधी मंजूर झाल्याचा निर्णय व्हायरल झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तर नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
देवेंद्र फडणवीसांचा सोशल खुलासा
या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावरून यासंबंधी खुलासा करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने GR काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter