“गोहत्येचा इस्लाम अजिबात आग्रही नाही. त्यामुळे गाईविषयीच्या हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करून गोहत्येचा आग्रह मुस्लिमांनी सोडायला हवा. केवळ हिंदूंचा तिरस्कार करण्यासाठी गायींचा बळी देणारे मुस्लीम हे इस्लाममधील अत्यंत पवित्र संकल्पनेचा अपमानच करत आहेत.” १९१२ मध्ये ईद-उल-अझहा (बकरा-ईद)च्या दिवशी अयोध्येत उसळलेल्या दंगलीनंतर गोरखपूरच्या हकीम अब्दुल करीम खान यांनी ‘मशरिक’या उर्दू दैनिकात लिहिलेल्या लेखात ही भूमिका मांडली होती.
शतकानुशतके हिंदू आणि मुस्लिम गाईला पवित्रच मानत आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही समाज गोहत्येपासून दूरच राहिले आहेत. मुस्लीम धर्मगुरूंनी (उलेमांनी) गोहत्येविरोधात फतवेही दिले, तर बहुसंख्य मुस्लिम शासकांनीही गोहत्येवर पूर्णपणे किंवा अंशतः बंदी घातली. त्यामुळे रोजच्या खानपानात गोमांस शक्यतो नसायचेच.
मात्र ब्रिटीश काळात गोष्टी बदलल्या. युरोपीय लोकांचा मुख्य आहार गोमांस असल्याने त्यांनी गोहत्येला प्रोत्साहन दिले. इंग्रजांनी पोसलेले काही इंग्रज धार्जिणे मुस्लीम मुद्दाम गोहत्या करण्याचा उद्दामपणा करून लागले. परंतु, उलेमांसह बहुतांश सुशिक्षित मुस्लिम समाज बांधवांना गोहत्येपासून परावृत्त करत आले आहेत.
१९१० मध्ये बकरी ईदच्या दिवशी कोलकात्याला हिंदू मुस्लिम दंगल उसळली. सिरा-ए-मुस्तकीम या स्थानिक उर्दू दैनिकाने ‘गोहत्या करू नका’असे आवाहन मुस्लिमांना केले. अशामुळे समाजात फुट पडते आणि ही बाब ब्रिटीशांना फायदेशीर ठरते असे मत त्यात मांडण्यात आले. वृत्तपत्राच्या संपादकाने लिहिले, ‘बंगालमध्ये हिंदूंनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी चळवळीत मुस्लिम सामील होतील की काय,अशी भीती इंग्रजांना वाटत आहे. त्यामुळे ते दोन समुदायांमध्ये अविश्वासाची आणि विद्वेषाची बीजे पेरत आहेत. गोहत्येत सहभागी असलेले मुस्लिम ब्रिटीशांचे पगारी बाहुले असल्याचा दावाही या संपादकीय लेखातून करण्यात आला होता.
इंग्रजांचा हा डाव हिंदूंच्याही लक्षात आला होता. त्यांनीही गोहत्येचा विरोध करणाऱ्या मुस्लिमांना प्रोत्साहन दिले. १९१२ मध्ये नागपुरमधील मारवाडी या हिंदी वृत्तपत्राने गायींची हत्या टाळल्याबद्दल मुस्लिम समाजाचे आभार मानणारा लेख प्रसिद्ध केला. संपूर्ण भारतात याच धर्तीवर उपक्रम राबवले पाहिजेत अशी सूचनाही या लेखातून व्यक्त करण्यात आली.
‘द इंडियन पेट्रीयट’या दक्षिण भारतातील इंग्रजी दैनिकाने गोहत्या न केल्याबद्दल मुस्लिमांचे कौतुक केले होते. सुशिक्षित मुस्लिमांचे हे प्रयत्न सामान्य निरक्षर मुस्लिम जनतेपर्यंतही पोहोचतील अशी अपेक्षा त्यात व्यक्त करण्यात आली होती.
१९१२ मध्ये कोलकाता येथील ‘मुहम्मदी’ दैनिकाच्या संपादकीयमध्ये मौलवी अकबर खान आणि अक्रम खान यांनी बकरी ईद पूर्वी मुस्लिमांना उद्देशून गोहत्येपासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले, “गोहत्या करून मुस्लिमांनी आपल्या हिंदू शेजाऱ्यांच्या भावना दुखावू नयेत”. त्यांनी पुढे लिहिले, ‘मुस्लिमांनी इतरांच्या धार्मिक भावना दुखावू नयेही कुरानचीच शिकवण आहे. महत्त्वाचे म्हणजे गोहत्या हा काही इस्लामचा भाग नाही.’
१९१२ मध्ये दैनिक भारतमित्र या बंगाली वृत्तपत्राने गोहत्या बंदीचा आदेश देणाऱ्या मुर्शिदाबादच्या नवाबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेखही प्रसिद्ध केला होता.
सुशिक्षित आणि वसाहतविरोधी मुस्लिमांनी नेहमीच गोहत्येला विरोध केल्याचे इतिहासातील अशा असंख्य उदाहरणांमधून आपल्याला दिसते. मात्र तरीही हा मुद्दा वादाचा का बनला? आणि तो अजूनही धगधगत कसा राहिला? साहजिकच इंग्रजांमुळे. आहाराचा अविभाज्य भाग म्हणून इंग्रजांना गोमांसाची गरज होती. मात्र १९२० च्या एका अधिकृत अहवालात एक निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.भारतीय सैनिक त्यांना छावणी मध्ये गोहत्या करू देत नव्हते. इतकेच नव्हे मुस्लिम नवाबही त्यांच्या अधिकार क्षेत्रात गोहत्येची परवानगी देत नसत. त्यामुळे ब्रिटीश सैन्ययाबाबत खूप चिंतित होते.
इस्लामच्या पाच स्तंभांच्या थेट विरोधात जाणारी बाब नसेल तर इस्लाम कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावण्याची परवानगी देत नाही. गोहत्या हे इस्लाममध्ये बंधनकारक ही नाही त्यामुळे उलेमा आणि मुस्लीम विचारवंत गोहत्येला नेहमीच विरोध करत आले आहे.
अनुवाद: पूजा नायक
- साकिब सलीम