२०२४मध्ये सेवाकार्यासाठी चर्चेत राहिलेल्या समाजसेवी संस्था

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
समाजातील उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मुस्लीम समाजसेवी संस्था
समाजातील उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मुस्लीम समाजसेवी संस्था

 

इस्लाममध्ये खिदमत-ए-खल्क म्हणजेच समाजसेवेला मोठे महत्व आहे. समाजसेवा म्हणजे केवळ गरीब आणि गरजूंना मदत करणे नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठीचा एक सुंदर प्रयत्न आहे. समाजसेवा ही केवळ दानधर्मासाठी नसून, ती समाजाचे हित, कल्याण आणि प्रगती साधण्यासाठी केली जाते. समाजातील प्रत्येक घटकाला योग्य संधी, मदत आणि आधार देणे हाच समाजसेवेचा उद्देश असतो. हाच उद्देश साध्य करण्यासाठी महाराष्ट्रातील काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी सामाजिक संस्था उभारल्या आहेत. या संस्थांविषयी जाणून घेऊयात या विशेष लेखातून…

‘तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत’

वंचित घटकांनामदत करण्याच्या सदहेतूने २०१९ मध्ये 'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' ची स्थापना करण्यात आली. सोलापूरमधील या संघटनेने आजवर अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यासोबतच तरुणाईचे प्रबोधन करत समतेची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. मौलाना गयास अहमद हे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर मुफ्ती अनीसउर रहमान प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात. ५० हून अधिक शाखा असणाऱ्या या संघटनेचे मुख्यालय हैद्राबाद येथे आहे. 

राज्यातील हजारो पूरग्रस्तांना धान्यकिटचे वाटप
२०२२ मध्ये चिपळूण, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर या परिसरात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. हजारो नागरिक पुरात अडकले होते. अन्नपाण्याविना त्यांचे प्रचंड हाल होत होते. त्यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी विशेषतः मुस्लिम समाजाने मोठा प्रतिसाद दिला. या उभ्या राहिलेल्या मदतीतून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागात सहा हजारांहून अधिक धान्यकिटचे वाटप केले होते.
 
 
'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' विषयी अधिक वाचा :
‘फ्यूचर फाऊंडेशन’
 
मुस्लिम कुटुंबातील आर्थिक स्थिती आणि अशिक्षितपणा मुलांच्या शिक्षणातील मोठी अडचण ठरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील कोंढवा या मुस्लीमबहुल भागातील दोन उच्चशिक्षित मैत्रिणींनी एकत्र येत २०१६ मध्ये 'फ्यूचर फाऊंडेशन' या संस्थेची स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून समिना शेख आणि शबाना कॉन्ट्रॅक्टर या दोघी मैत्रिणी अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि मुस्लिम महिलांना रोजगाराची संधी 
मुस्लीम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तीव्रता लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. तसेच पुणे परिसरातील महिलांना घरकामे, कुटिरोद्योग, शिवणकाम, सुरक्षा विभागातील कामे असे रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी या महिलांची आर्थिक घडी बसवण्यात फ्युचर फाऊंडेशनला यश आले.  तसेच ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थती अगदीच हलाखीची आहे, आणि उत्पन्नाचे आर्थिक स्रोतही नाहीत अशा कुटुंबांना फाऊंडेशनच्या माध्यमातून महिन्याचा किराणा पुरवला जातो. 
 
'फ्यूचर फाऊंडेशन' विषयी अधिक वाचा :

‘निसार फाउंडेशन’

हाफिज शेख यांनी २०१६ ला पुण्यातील कोंढवा भागात निसार फाउंडेशनची स्थापना केली. गोळ्या औषधांवरील अतिप्रमाणात होणारा खर्च लक्षात घेऊन हाफिज यांनी कोंढव्यात भाग्योदय नगर आणि नवाझीश चौकात निसार नावाने दोन दवाखाने उभे केले आहेत. त्याठिकाणी ते केवळ ३० रुपयांत रुग्णांना उपचार देतात. त्यामध्ये वैद्यकीय तपासणी आणि दोन दिवसांची औषधे देखील दिली जातात. 

महिलांसाठी शिक्षण क्षेत्रात योगदान
रुग्णसेवेसोबतच हाफिज यांनी महिलांसाठी शिक्षण क्षेत्रातही काम सुरु केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराकरिता प्रेरित करण्यासाठी देखील निसार फाउंडेशन काम करीत आहे. महिलांना सहजरीत्या नोकरी मिळावी यासाठी त्यांनी वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरु केले. या कोर्सनंतर महिलांना पदवी प्रदान केली जाते. या कोर्सेसची फी केवळ ५००-७०० रुपयांपर्यंत आहे तर काही प्रशिक्षण अगदी मोफतही दिले जातात. मग त्यात नर्सिंग, पॅरामेडिकल कोर्सेस, स्पोकन इंग्लिश, टेलरिंग, मेहंदी, ब्युटी पार्लर, मेकअप प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग अशा प्रकारच्या अनेक कोर्सेसचा समावेश आहे. 

'निसार फाउंडेशन' विषयी अधिक वाचा :
 
‘युनिक फाऊंडेशन’

पुण्यातील मंचर भागात राहणाऱ्या खिसाल जाफरी यांनी समाजसेवेच्या माध्यमातून युनिक फाऊंडेशनची स्थापना केली. जाफरी हे अल-हैदरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल-झेहरा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव असून महाराष्ट्रातील किमान सहा ते सात विविध सेवाभावी संस्थांचे ते सदस्य देखील आहेत. युनिक फाऊंडेशन हे सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करते. 

सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत 
महाराष्ट्रात आणि पुणे शहरात आजही असंख्य निराधार लोक आहेत. अशा निराधार लोकांना खिसाल जाफरी यांचे फाऊंडेशन आधार देण्यासाठी त्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना दरवर्षी ब्लॅंकेटचे वाटप करतात. समाजातील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत मदत केली जाते. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था विविध कार्यक्रम हाती घेते. अल्पसंख्यांक समाज शिक्षित व्हावा यासाठी संस्थेमार्फत पुस्तके, विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत केली जाते. देशाची पुढची पिढी सावरण्यासाठी आणि त्यांना व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी जाफरी यांच्या संघटना ‘नशा मुक्ती अभियान’ सारखे कार्यक्रम चालवते. अशा कार्यक्रमातून संस्था तरुणांमध्ये जागरूकता तर निर्माण करतेच शिवाय मार्गदर्शन देखील करते.  

'युनिक फाऊंडेशन' विषयी अधिक वाचा :
 
‘पेहेल फाउंडेशन’ 

मुंबईतील 'पेहेल फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेकडून मुस्लिम महिलांसाठी रोजगाराची एक अनोखी पहल सुरू करण्यात आली आहे. डॉ. पियू परदेशी आणि त्यांचे पती डॉ. सिद्धार्थ आचार्य हे टिफिन सेवा आणि शिवणकामातून या महिलांना आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जेवण परदेशी दाम्पत्याच्या राहत्या घरीच बनवले जाते. सर्व महिला तिथूनच हे सर्व काम करतात. 

महिलांसाठी आरोग्य शिबिर  
बऱ्याचदा महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांचे आजारपण वाढत जाते. महिलांना वेळेत उपचार मिळावे, यासाठी पेहेलने पुढाकार घेतला आहे. त्यांच्यामार्फत महिलांची साखर, रक्तदाब तपासणी करण्यात येते. आरोग्य शिबिरेही भरवण्यात येतात. आजारी महिलांना पेहेलमार्फत मोफत मार्गदर्शन केले जाते. इतकेच नव्हे तर उपचारासाठी मदतदेखील केली जाते.
 
'पेहेल फाउंडेशन' विषयी अधिक वाचा :
 
भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter