नुकताच शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वांनीच शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान एममआयएमचे प्रमुख आणि हैद्राबाद मतदारसंघाचे खासदार असुदुद्दीन औवेसींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असुदुद्दीन औवेसींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते.
छत्रपती शिवरायांबद्दल काय म्हणाले ओवैसी
एममआयएम पक्षाच्या अधिकृत हँडलवर असुदुद्दीन औवेसी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये औवेसी शिवाजी महाराजांची प्रशंसा करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ओवैसी म्हणाले की, “मी माझ्या मराठी बांधवांना सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर होता, आहे आणि राहील! मी महाराजांचा आदर करतो कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच मुस्लिमविरोधी नव्हते.”
ते पुढे म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याणवर विजय मिळवला, तेव्हा कल्याणच्या नवाबाची सून त्यांच्यासमोर आणली गेली होती. तेव्हा शिवाजी महाराजांनी म्हटले होते की, 'ही माझ्या सूनीसारखी आहे.’ त्यानंतर महाराजांनी तिला परत पाठवले होते.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम मावळ्यांचा संदर्भ देत ओवैसी म्हणतात, “आग्र्याच्या किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराज निघाले, तेव्हा कोण त्यांच्यासोबत होता? तर महाराजांसोबत मदारी मेहतर होता आणि तो मुसलमान होता. छत्रपती शिवाजी तोफखान्याचा प्रमुख कोण होता, त्याचे नाव सांगा? तर इब्राहीम खान त्याचे नाव होते.”
ते पुढे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर हे होते. जेव्हा शिवाजी महाराजांना सांगितले गेले की, त्यांचे काजी हैदर हे मुसलमान आहेत, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले की, ‘व्यक्तीची ओळख त्याच्या धर्माने नव्हे तर कर्तृत्वाने होते.”
‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेतील खासदार असदुद्दीन औवेसी हे आपल्या प्रभावी वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांचे लहान बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे असदुद्दीन औवेसी यांच्याबद्दल बहुसंख्य समाजाच्या मनात अनेक पूर्वग्रह आहेत.
संविधानिक भाषा बोलणारे आणि मुस्लीम समाजाच्या हितासाठी आग्रही भूमिका घेण्याचा दावा करणाऱ्या औवेसींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या या वक्तव्यामुळे समाजावर सकारात्मक परिणाम होणार आहे. बहुसंख्यांकांच्या मनातील आणि विशेषतः मराठी जनतेच्या मनातील असदुद्दीन औवेसी यांच्याविषयीचे पूर्वग्रह काही प्रमाणात कमी होण्यात आणि त्यांची सकारात्मक प्रतिमा तयार होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला औवेसींनी जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील जनतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अधिक सहिष्णू प्रतिमा पोहोचणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील मुस्लीम समाजाला देखील शिवाजी महाराजांविषयी सकारात्मक संदेश जाणार आहे. आणि समाजामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळेल.