मुंबईतील चेंबूर येथील उर्दू शाळेमध्ये उर्दू भाषेतील 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे वाटप करताना छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईतील चेंबूर येथील उर्दू शाळेमध्ये 'छात्रभारती विद्यार्थी संघटने'ने शिवरायांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे वाटप केले. या पुस्तकाच्या ५ लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याचा संकल्प छात्रभारतीने २०२२ मध्ये केला आहे.
या उपक्रमाबाबत छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले म्हणाले, "देशात एकीकडे शाळा-कॉलेजांमध्ये धर्मांध शक्ती द्वेषाचं वातावरण पेटवत आहेत म्हणून अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन एकतेची प्रेरणा देणारे लोककल्याण राजा छत्रपती शिवराय यांचे विचार प्रत्येक विद्यार्थी-तरुणांच्या मनामनात-घराघरात पोहचवण्याची गरज आहे. आदर्शवत राजा, राज्य, प्रशासन, शासन कसे असावे, जनकल्याणकारी राज्याची संकल्पना काय आहे, हे नव्या पिढीच्या समोर आले पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत."
"शिवाजी कोण होता? हे पुस्तक ५ लाख विद्यार्थी-तरुणांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला असून मागच्या दोन वर्षात २ लाखाहून अधिक पुस्तके छात्रभारतीच्यावतीने उर्दू, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये वाटप करण्यात आली आहेत. केवळ पुस्तक वाटपच नव्हे तर हे पुस्तक मुलांनी वाचावे यासाठी सदर पुस्तकावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करणार आहे," असे छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष विकास पटेकर यांनी सांगितले. यावेळी छात्रभारतीचे राज्य सदस्य सचिन काकड, मुंबई कार्याध्यक्ष निकेत वाळके उपस्थित होते.
छात्रभारतीविषयी...
१८ डिसेंबर १९८३ मध्ये स्थापन झालेली छात्रभारती ही संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणारी ध्येयवादी तरूणांची संघटना आहे. गेली ४० वर्षे महाराष्ट्रातील विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी छात्रभारती लढत आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाला, बाजारीकरणाला छात्रभारतीचा तीव्र विरोध आहे. सरकारकडून शिक्षणावरती केलेला खर्च हा खर्च नसून ती राष्ट्र उभारणीसाठीची गुंतवणूकच असते. त्यामुळे सर्वांना सक्तीचे, समान, गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत देणे ही सरकारची जबाबदारी आहे, ही छात्रभारतीची भूमिका आहे.