अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोगाने परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्राकतून अल्पसंख्यांक दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्य प्रशासनाला या संदर्भातील सूचना आयोगाने परिपत्राकतून केल्या आहेत.
अल्पसंख्यांक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अंतरराष्ट्रीयअल्पसंख्यांक दिन देशभर उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध कार्यकर्मांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्य अल्पसंख्यांक आयोगाने प्रशासनाला योग्य सूचना केल्या आहेत. यामध्ये अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यासाठी इयत्ता ११ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानमाला तसेच चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजसेवी संस्थांच्या, सामाजिक कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने अल्पसंख्यांक समाजाला त्यांच्या सांविधानिक हक्काची जाणीव करून देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत अशा सुचना आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत.
या उपक्रमांसाठी लागणारा खर्च राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी दहा हजार इतकी रक्कम अनुदानित करण्यात आली आहे. अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी दहा हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास त्या खर्चाचा तपशील आयोगाने मागवला आहे. संबंधित खर्चाचा तपशील आयोगाला मिळाल्यानंतर आयोगामार्फत संबंधित रक्कम परत केली जाणार आहे.
अल्पसंख्यांक दिनानिमित्त उपक्रम राबावण्याची जबाबदारी जिल्हाधिकऱ्यांची
उद्या दि. १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणाऱ्या अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबावण्याची जबाबदारी अल्पसंख्यांक आयोगाने जिल्हाधीकाऱ्यांना दिली आहे. यासाठी त्यांनी जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. तसेच अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करुन त्याबाबतीतील अहवाल आयोगास पाठवावा अशी विनंती शासनाने काढलेल्या जीआरमधून करण्यात आली आहे.
अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन प्रशासकीय स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केली होती. देशातील विविध मुस्लिम संघटनांनी, कार्यकर्त्यांनी या मागणी संदर्भातील निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. मुस्लिम कार्यकर्त्यांच्या या मागणीला यश आले असून राज्य शासनाने अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाविषयी बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला म्हणतात, “अल्पसंख्यांक दिन साजरा व्हावा यासाठी राज्यातील आणि देशातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदने दिली होती. आज महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने यासंदर्भातील जीआर काढला आहे. अल्पसंख्यांकांसाठी हा निर्णय महत्वाचा असून मुस्लिम समाज या निर्णयाचे स्वागत करत आहे.”
पुढे ते म्हणतात, “अल्पसंख्यांक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. नागरिकांनी त्यांचे प्रश्न, अडचणी या कार्यक्रमातून शासनापुढे मांडाव्यात. तरच अल्पसंख्यांक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मदत होईल.”
अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९९२मध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यासाठी १८ डिसेंबर या दिवसाची निवड केली होती. तेव्हा संयुक्त राष्ट्राने म्हटले होते, 'अल्पसंख्याकांची संस्कृती, धर्म आणि त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी संबंधित देशांनी पावले उचलावी. यामुळे अल्पसंख्यांक स्वतःला सुरक्षित समजतील आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही.' त्यानुसार दरवर्षी १८ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा केला जातो. जगभरातील अल्पसंख्यांकांच्या हक्काचे संरक्षण करणे आणि सांविधानिक अधिकाराबद्दल अल्पसंख्यांक समाजामध्ये जनजागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
- फजल पठाण