अवघ्या काही दिवसात मुस्लिमांचा पवित्र महिना रमजान येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागातील सामाजिक मुस्लिम कार्यकर्त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रोज या उपक्रमासंदर्भात विविध बातम्या वर्तमान पत्रात झळकत आहेत.
धार्मिक आणि सामाजिक सौहार्द जपणाऱ्या कोल्हापूरमध्ये नुकतेच जरिया फाऊंडेशन आणि रियाज सुभेदार युवामंचाकडून रमजाननिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी मुस्लिम कार्यकर्ते एकत्र आले होते. या रक्तदान शिबिराचा उद्देश सांगताना सामाजिक कार्यकर्ते रियाज सुभेदार म्हणतात, “सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताच्या अभावी अनेक रुग्णांचा जीव गमवावा लागत आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे कोणीही जीव गमावू नये असे आम्हाला वाटते. आज रक्ताची उपयुक्तता सर्व समाजाला भासत आहे. आपल्या सरकारी योजनेकडे रक्त पुरवठा कमी पडत असल्यामुळे आपल्या सर्वांचे कर्तव्य म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले.”
पुढे ते म्हणतात, “या रक्तदान शिबिरात पुरुषांप्रमाणेच महिलांचा देखील समावेश होता. या रक्तदान शिबिरातून १०० पिशव्या रक्त गोळा करण्याचा आमचा उद्देश होता. यामध्ये सर्व लोकांनी रक्तदान करत त्यांचे कर्तव्य बजावले. मी सर्वांना आवाहन करतो एक सामाजिक बांधीलकी आणि माणूसकी या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान केले पाहिजे.”
सीपीआर हॉस्पिटल व मिरजेच्या मिशन हॉस्पिटलच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रियाज सुभेदार म्हणतात, “अकबर मोहल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच वर्षानंतर अशा प्रकारचे शिबिर राबवले गेले. या शिबिरामुळे अल्पसंख्याक समाजात जनजागृती आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत होईल.”
या शिबिरास शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांनी भेट दिली. तसेच भागातील नगरसेविका महेजबीन सुभेदार यांनी नियाज सुभेदार आणि असीम शेख यांच्यासह सर्व मेडिकल स्टाफ व सुभदार मंच मित्र परिवारांचे खास अभिनंदन केले. तसेच यावेळी त्यांनी सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची विनंती केली. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्वांना रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या रक्तदान शिबिरास कोल्हापूर महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले.
जरिया फाऊंडेशन विषयी
जरिया फाऊंडेशनविषयी बोलताना रियाज सुभेदार सांगतात, “झालं अस की आमच्या एका मित्राचा अपघातात मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी आणि मुलं असा त्यांचा परिवार आहे. त्यांना आधार देण्यासाठी आम्ही सुरुवातीला आम्ही दहा मित्रांनी मिळून २०२३ मध्ये या फाऊंडेशनची स्थापना केली. यामाध्यमातून आम्ही काही ठराविक रक्कम दरमहिन्याला त्यांना द्यायचो.”
पुढे ते म्हणतात, “यांनंतर आम्ही विविध सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. आम्हाला समाजातील सर्व जाती धर्माचे लोक मदत करतात. लोकवर्गनीतून आम्ही लहान मुलांना शिक्षण घेण्यासाठी मदत करतो. निराधार लोकांना आधार देण्याचे काम आमचे फाऊंडेशन करत आहे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter