रक्तदानाने जपण्यात आली मोहम्मद रफींची स्मृती

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 18 h ago
मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुजय प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुजय प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर

 

भक्ती चाळक 
 
चित्रपटांमध्ये भावदर्शी गायन करण्याचे उत्तम कसब आणि सिनेगीतांच्या सुवर्णकाळाचे भागीदार असलेले मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीला २४ डिसेंबर २०२४ला आरंभ झाला. रफी यांच्या ताना, प्रेमगीतं, नृत्यगीतं, विरहगीतं, भक्तिगीतं, गझल, कव्वाली अशा सर्वच गायन प्रकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरात संगीत, नृत्यासारखे अनेक कार्यक्रम पार पडले. मात्र पुण्यातील नवी पेठेत अनोखा उपक्रम पाहायला मिळाला.

पुण्याचे रहिवासी असलेले सुरेश सपकाळ यांनी मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एका नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. सुजय प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी नुकतेच नवी पेठ भागात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला पुणेकरांचाही चांगला प्रतिसाद लाभला. पन्नासहून अधिक लोकांनी रक्तदान करून मोहम्मद रफी यांची जन्मशताब्दी साजरी केली. रक्तदान शिबिर झाल्यानंतर सायंकाळी मोहम्मद रफी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखवण्यात आला. त्यानंतर सुरेल संगीत मैफिलींचा कार्यक्रम देखील पार पडला. 

अशी सुचली संकल्पना…
रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा सामाजिक उपक्रम राबवण्याच्या अनोख्या संकल्पानेबद्दल बोलताना सपकाळ म्हणाले, “माझे मामा रफींचे खूप मोठे फॅन आहेत. ते दरवर्षी मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनी संगीत मैफिलीचा कार्यक्रम ठेवतात. मग यंदा रफी यांची जन्मशताब्दी होती म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवले.”

ते पुढे म्हणाले, “एखाद्या गायकाच्या स्मरणार्थ कुणी रक्तदान शिबीर घेण्याची कदाचित पहिली वेळ असावी. मला असं वाटलं की इतर काही उपक्रम घेण्यापेक्षा आपण रक्तदान शिबीरचं का घेऊ नये. या उपक्रमाने समाजात एक चांगला संदेश जाईल आणि गरजूंना मदत सुद्धा होईल. म्हणून मी रक्तदान शिबीर घेण्याचे ठरवले.”
 

रक्ताच्या कर्करोगामुळे मुलाचा मृत्यू 
सुरेश सपकाळ यांनी आजवर शेकडो रक्तदान शिबिरे भरवली आहेत. त्यांची स्वतःची रक्तदान करण्याची ही ९८वी वेळ आहे. रक्तदान शिबीरे भरवण्यामागे सपकाळ यांची काळीज पिळवटून टाकणारी कथा आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले, “२०१२ला माझ्या एकुलत्या एक मुलाचा वयाच्या १९व्या वर्षी ब्लड कॅन्सरने मृत्यू झाला. माझा मुलगा गेल्यामुळे मला खऱ्या अर्थाने रक्ताची गरज लक्षात आली. मग मुलगा गेल्याचे दुःख घरी कुरवाळत बसण्यापेक्षा समाजात काहीतरी योगदान द्यावे म्हणून मी मोठ्या रक्तदान करण्याचे काम हाती घेतले.”

राज्यपालांच्या हस्ते सन्मान 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर रक्ताचा तुटवडा असताना सुरेश सपकाळ आणि त्यांच्या संघटनेने मिळून हजारहून अधिक गरजूंना प्लाज्मा आणि रक्त उपलब्ध करून दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 

थॅलेसेमिया या आजाराचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या आजारामुळे अनेक मुलांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. या रुग्णांना दोन महिन्यातून एकदा रक्त भरावे लागते. मग अशा रुग्णांना वाचवण्यासाठी सपकाळ अधिकाधिक रक्तदान शिबिरे घेत आहेत.   
 
मुस्लीम समाजात रक्तदानाविषयी जनजागृती 
सपकाळ सांगतात, “कोरोनाकाळात आम्ही ज्या मुस्लीम बांधवांना रक्ताची गरज ओळखून मदत केली, त्यांना एकत्र घेऊन आम्ही शास्त्री चौकात रक्तदानाविषयीचा फतवा काढला. तेव्हापासून ते लोकं सुद्धा प्रत्येक वर्षाला रक्तदान शिबिरे घेतात आणि मोठ्याप्रमाणावर रक्तदान सुद्धा करतात.” 

ते पुढे म्हणतात, “हडपसर, रामटेकडीवर जे मोहोल्ले आहेत, त्याठिकाणच्या लोकांना सुद्धा आम्ही रक्तदानाचे महत्व पटवून दिले. आम्ही त्यांना सांगितले की मुस्लिमांनी सुद्धा नियमित रक्तदान सुरु केले तर १०टक्के लोकांची रक्ताची गरज भागू शकते. आम्ही सांगितल्यानंतर त्या लोकांना सुद्धा हे महत्व पटले आणि त्यांनी रक्तदान करण्याचा विश्वास आम्हाला दाखवला.” 

समाजात माणुसकी जपण्यासाठी जात, धर्म, पंथाचा विचार न करता कर्तव्य आणि खरी गरज समजून प्रत्येकाने रक्तदान करावे. आजच्या काळात रक्तदान हेच खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविते असे मत व्यक्त करताना सपकाळ म्हणाले, “रक्त कोणत्या फॅक्टरीत बनत नाही, ते फक्त माणसांपासून मिळतं. रक्त भरायची वेळ आल्यावर कुणी पाहात नाही ते कोणत्या जातीच्या माणसाचं आहे. मुळात रक्ताला जात-धर्म नसतो, त्यामुळे ते हिंदूचं आहे की मुसलमानाचं हे कुणीही ओळखू शकत नाही. रक्तात फक्त माणुसकी असावी. त्यामुळे लोकांनी अधिकाधिक रक्तदान करावे, कारण कुणावर कधी काय वेळ येईल हे कुणीच सांगू शकत.”
 
- भक्ती चाळक 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter