हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील असणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) मुस्लिम शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने (MRM) झारखंडच्या बोकारो येथे तब्बल ५०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारून मानवतेचा नवा आदर्श उभा केला आहे. MRM च्या या रुग्णालयाने झारखंड आणि शेजारील भागातील लोकांना मोठी मदत मिळणार आहे . मंचाकडून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘सद्भावना सप्ताह’ सोहळ्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली.
MRM चे राष्ट्रीय संयोजक डॉ. माजिद तालिकोटी हे या मेडिसेंट कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या नावाने उभारण्यात आलेल्या या रुग्नालयाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. तालिकोटी यांनी मानवसेवा हाच खरा धर्म आहे, असे भावनिक प्रतिपादन केले.
सर्वसामान्यांसाठी परवडणारी आणि सहज उपलब्ध होईल अशी आरोग्यसेवा
यावेळी बोलताना डॉ. माजिद तालिकोटी म्हणाले, "केवळ रुग्णालय सुरू करणे हे आमचे उद्दिष्ट नव्हते. तर गरजू आणि गरीब रुग्णांना परवडेल अशा माफक दरात उपचार सहज उपलब्ध देण्याचे आमचे ध्येय होते. हे रुग्णालय केवळ झारखंडसाठीच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारतासाठी जीवनरक्षक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, दरवर्षी १८ फेब्रुवारी रोजी गरजू रुग्णांना विनामूल्य कर्करोग उपचार सेवा पुरवली जाईल आणि ही मोहीम सुरू राहील. डॉ. तालिकोटी यांनी सांगितले, "हे रुग्णालय पूर्णपणे सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून चालवले जात आहे. प्रत्येक गरीब आणि गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे."
मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा मदरसा विद्यार्थ्यांसोबत विशेष संवाद
इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम राष्ट्रीय मंच (MRM) च्या टीमने 'हार्मनी वीक' दरम्यान दिल्लीतील मदरस्यांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. MRM प्रवक्त्याने सांगितले की मदरशात 'इंकलाब जिंदाबाद', 'वंदे मातरम्', आणि 'जय हिंद' यासारखी घोषणांनी वातावरण भरून गेले होते.
धर्मशिक्षणासोबत आधुनिक शिक्षणाची गरज – इंद्रेश कुमार
वक्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना स्मरताना भारताच्या स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की स्वातंत्र्य हे केवळ एक अधिकार नसून एक जबाबदारीही आहे. मदरसा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इंद्रेश कुमार यांनी सांगितले की धार्मिक शिक्षण (मदरसा शिक्षण) बरोबरच आधुनिक शिक्षण (विश्वज्ञान) हेही महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की विज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, प्रशासन इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट होण्यासाठी मुलांनी धर्माव्यतिरिक्त इतर विषयांमध्ये निपुणता मिळवणे आवश्यक आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की मुख्य प्रवाहातील शिक्षण देश आणि समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. ते म्हणाले, "राष्ट्रवाद आणि शिक्षणाचे एकत्रीकरण भारताला जागतिक नेतृत्वाकडे घेऊन जाईल."
प्रथम हिंदुस्थानी बना – इंद्रेश कुमार यांचा संदेश
यावेळी इंद्रेश कुमार यांनी 'प्रथम हिंदुस्थानी व्हा' हा संदेश दिला. त्यांनी सांगितले, "मुलांनो, तुमचे शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसावे. जगातील सर्वात मोठा धर्म - मानवता; सर्वात मोठी कृती - देशभक्ती, आणि सर्वात मोठी ओळख - 'हिंदुस्थानी' (भारतीयता) आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे." ते पुढे म्हणाले, "तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, शास्त्रज्ञ काहीही बना, पण प्रथम स्वतःला हिंदुस्थानी समजा. जेव्हा आपण या भावनेने पुढे जाऊ, तेव्हा द्वेष आणि भेदभाव नष्ट करू शकू."
पुढे ते सांगितले, "आज आपण जे स्वातंत्र्य आणि अधिकार अनुभवतो, ते कोणत्याही एका धर्माचे परिणाम नसून संपूर्ण भारताच्या एकतेचे परिणाम आहेत. जेव्हा आपण 'जय हिंद' म्हणतो, तेव्हा ते केवळ एक घोषणा नसते; ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. आपल्याला या संस्कृतीला मजबूत करणे आवश्यक आहे."
राष्ट्रीय शिक्षण धोरणात मदरशांचे समावेश आवश्यक – डॉ. शाहिद अख्तर
राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्थेचे (NCMEI) कार्याध्यक्ष डॉ. शाहिद अख्तर यांनी असे सांगितले की, "आपले शिक्षण केवळ धार्मिक शिक्षणापुरते मर्यादित नसावे. तर आधुनिक विज्ञान, गणित, संगणक आणि व्यवसाय शिक्षणातही प्रावीण्य मिळवले पाहिजे. शिक्षणात बदल न झाल्यास प्रगती कठीण होईल, हे सत्य मुस्लिमांनी समजून घ्यायला हवे."
त्यांनी असेही सुचवले की,मदरसांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० शी जुळवून घेऊन आधुनिक शिक्षण समाविष्ट केले पाहिजे, जेणेकरून मुलांना त्यांनी निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकेल.
महिला सक्षमीकरणासाठी MRMचे विशेष उपक्रम
MRM च्या राष्ट्रीय संयोजक डॉ. शालिनी अली यांनी जाहीर केले की, मंच दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण सुरू करणार आहे. त्याअंतर्गत महिलांना शिवणयंत्र, शिकवणी केंद्रे आणि संगणक प्रशिक्षण यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत.
सेवा सप्ताहांतर्गत विविध सामाजिक उपक्रम
MRMच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'हार्मनी वीक'निमित्त स्वयंसेवकांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये गरजूंसाठी अन्नधान्य, उबदार कपडे, ब्लँकेट, औषधे आणि फळांचे वितरण केले. यानिमित्त लखनऊ आणि डेहराडून येथे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली, तर भोपाळ आणि जयपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याशिवाय मंदिर, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा येथे शांतता आणि बंधुत्वासाठी प्रार्थनादेखील करण्यात आल्या.
भारताच्या मजबूत भविष्याचा संकल्प
MRMच्या'हार्मनी वीक'बद्दल बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले की, "जेव्हा आपण सर्व एकत्र काम करू, तेव्हाच भारत अधिक मजबूत होईल. ही मोहिम एका आठवड्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती आपल्या विचारसरणी, संस्कृती आणि सेवाभावाचा भाग बनेल."