'इस्कॉन' ही कट्टरतावादी संघटना असल्याने तिच्यावर बांगलादेशमध्ये बंदी आणावी, अशी येथील सरकारने केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. बांगलादेशमधील हिंदू नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आजच्या निर्णयाद्वारे येथील अल्पसंख्य हिंदू समुदायाला दिलासा दिल्याचे मानले जात आहे.
बांगलादेशमध्ये ऑगस्ट महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर हंगामी सरकार असले तरी हिंसाचार कमी झालेला नाही. अल्पसंख्य हिंदू समाजावर आणि मंदिरांवर देशभरात अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी काढलेल्या मोचविळी संघर्ष होऊन एका वकिलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी चिन्मय कृष्णदास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर बांगलादेशात 'इस्कॉन 'तर्फे मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे 'इस्कॉन' ही कट्टरतावादी संघटना असल्याचा आरोप करत बांगलादेश सरकारने या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. ही मागणी आज फेटाळून लावण्यात आली. ही संघटना कट्टरतावादी असल्याचे पुरावे द्या, असे न्यायालयाने सरकारला सुनावले आहे.
हसीना यांच्याकडून निषेध
चिन्मय कृष्णदास यांना झालेल्या अटकेचा बांगलादेशच्या परागंदा माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी निषेध नोंदवून त्यांच्या सुटकेची मागणी केली. "बांगलादेशात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. सर्व समुदायांच्या धार्मिक स्वातंत्र्याची तसेच त्यांच्या जीविताची व मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी," अशी मागणी हसीना यांनी केली. घटनाबाह्य पद्धतीने सत्ता काबिज करणारे युनूस सरकार दहशतवाद्यांना आवर घालण्यात अपयशी ठरल्यास त्यांनाही मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा दिली जाईल, असे हसीना यांनी म्हटले आहे.
जयशंकर यांची मोदींबरोबर चर्चा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेत त्यांना बांगलादेशमधील परिस्थितीची माहिती दिली. तसेच, या परिस्थितीबाबत ते उद्या (शुक्रवारी) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांगलादेशमधील परिस्थितीवर भारताचे भाष्य म्हणजे अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप असल्याचा बांगलादेश सरकारचा आरोपही भारताने धुडकावला आहे. तुमच्यामुळेच देशात अराजकता निर्माण झाली आहे, असे भारतीय अधिकाऱ्यांनी बांगलादेश सरकारला सुनावले आहे.