अयोध्या : देशातील राजकारणाचा प्रदीर्घ काळ केंद्रबिंदू असलेल्या श्रीराम मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आल्याचे मंगळवारी दिसून आले. त्यासाठीच्या कामांना आता प्रचंड वेग आला आहे. मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यावर लगेचच ते भाविकांना खुले होणार आहे.
श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी होणार आहे. मंदिर उभारणीच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे देशातील निवडक प्रसारमाध्यमांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आले होते. न्यासाचे महामंत्री व विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपतराय यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी रामजन्मभूमी स्थळावरही पत्रकारांना नेण्यात आले.
मंदिर परिसर सुमारे ७० एकरांचा आहे. त्यात कमाल ३० टक्के बांधकाम करण्यात येत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून, दक्षिणेकडून भाविक बाहेर पडतील. मुख्य मंदिराजवळ चार कोपऱ्यात सूर्य, शंकर, भगवती व विष्णूचे मंदिर होईल. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी प्रवेशद्वारावर दोन रॅम्प व लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती चंपतराय यांनी दिली.
सुमारे पाचशे वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षातून साकारत असलेल्या राम मंदिराचे बांधकाम आता अल्पावधीत पूर्ण होणार आहे. प्रभू श्रीराम हे सर्व जाती-धर्मांचे आहेत. त्यामुळे राम मंदिर हे देशाचे राष्ट्रीय स्मारक असेल, असेही चंपतराय यांनी सांगितले.
२५ हजार भाविकांची व्यवस्था
मंदिर परिसरात एकाच वेळी २५ हजार भाविकांची व्यवस्था करता येईल, या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी यात्रेकरू सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तेथे भाविकांना त्यांच्या वस्तू ठेवता येतील, तसेच आवश्यकता वाटल्यास त्यांना आरोग्य सुविधाही मिळतील.
मूलभूत सुविधांसाठी स्वयंपूर्ण
दर्शनासाठी अयोध्येत हंगामानुसार रोज एक लाख ते अडीच लाख भाविक येतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) जलशुद्धीकरण प्रकल्प आणि एकूण ८०० एमएलडी क्षमतेचे दोन सांडपाणी प्रकल्प न्यासातर्फे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे भाविकांच्या वाढत्या संख्येचा कोणताही ताण महापालिकेवर पडणार नाही, अशी माहिती चंपतराय यांनी दिली.
हजार वर्षे मंदिर टिकणार!
मंदिर उभारणीसाठी पाया खोदताना फक्त माती आढळली. त्यामुळे पाइलिंग करून पाया तयार करण्याचे ठरले. त्यासाठी १२०० पाइल्स खोदण्याचे ठरविले होते, परंतु १२ पाइल्स खोदल्यानंतर अपेक्षित परिणाम मिळत नाही, असे लक्षात आल्यावर देशातील‘आयआयटीं’ची मदत घेण्यात आली. त्यात सुमारे चार महिने गेले. चेन्नई आयआयटीने विशिष्ट प्रकारचे काँक्रिट तयार केले. त्याची अनेक वेळा चाचणी झाली आणि त्यानंतर पाया तयार करण्याचे काम झाले.
त्यामुळे मंदिराचा पाया तयार करण्यासाठी एक प्रकारे कृत्रिम खडक तयार करण्यात आला. कोणत्याही हवामानात मंदिराच्या बांधकामावर परिणाम होऊ नये, यासाठी विशिष्ट पद्धतीने काँक्रिट तयार करून त्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर प्रदीर्घ काळ आहे त्या स्वरूपात राहू शकते, असे तेथील प्रकल्प अभियंत्यांनी सांगितले. मंदिराच्या उभारणीत कोठेही लोखंड वापरलेले नाही.
वैशिष्ट्ये...
मुख्य मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजला २० फूट उंचीचा
मंदिराची लांबी ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६० फूट
या मंदिरात ३९२ खांब असतील. प्रत्येक खांबावर १२ ते १६ मूर्ती (११ ते १६ इंचांच्या) असतील. त्या हाताने घडविल्या जात आहेत
शिलान्यासादरम्यान गावागावांतून जमा झालेल्या चार लाख २७ हजार विटा प्रदक्षिणा मार्गावर वापरण्यात आल्या आहेत
श्रीराम मंदिर आणि परिसर विकासासाठी ११५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित, लोकसहभागातून या निधीचे संकलन
‘जटायू’चाही भव्य पुतळा उभारणार
अयोध्येमध्ये साकार होत असलेले प्रभू श्रीरामाचे मंदिर हे आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण असेल. येथे मैलापाण्याच्या शुद्धीकरणाच्या सुविधेपासून ते दिव्यांगांना सहजपणे दर्शन घेता यावे म्हणून काही वेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी या मंदिराचा आराखडा आज प्रसिद्ध केला. या मंदिराच्या परिसरामध्ये ‘जटायू’चा एक भव्यदिव्य असा पुतळाही उभारण्यात येईल. या मंदिराचा सत्तर टक्के भाग हा पूर्णपणे हरित असेल, असे सांगण्यात आले. या मंदिराला चोवीस तास वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र असे युनिट देखील उभारण्यात येईल. मंदिराच्या परिसरामध्ये अग्निशामन दलाचे ठाणे असेल त्याला पाणी पुरवठा करण्यासाठी भूजलाचाच वापर करण्यात येईल. या भव्यदिव्य अशा राम मंदिरामध्ये ३९२ एवढे मोठे स्तंभ असतील. मंदिराच्या परिसरामध्येच टेहेळणी बुरूज असेल त्याचा विस्तार हा ७३२ मीटर एवढा आहे. परिसरामध्येच ‘जटायू’चा पुतळाही उभारण्यात येईल.