‘कुर्बानी’च्या भावनेला अधिक व्यापक करणारा मानवतावादी उपक्रम

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 3 Months ago
मंडळाच्या रक्तदान शिबिरातील एक दृश्य
मंडळाच्या रक्तदान शिबिरातील एक दृश्य

 

प्रज्ञा शिंदे, पुणे 
 
'बकरी ईद' हा जगभरातील मुस्लीम बांधवांच्या पवित्र सणांपैकी एक सण आहे. बकरी ईदला ' ईद-उल-अज़हा 'असे ही म्हणतात. या दिवशी  त्यागाचे प्रतिक म्हणून विशिष्ट  प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. त्याला कुर्बानी असे म्हणतात. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या प्रेषित इब्राहिम यांच्या आयुष्यातील एका घटनेच्या स्मरणार्थ ही परंपरा पाळली जाते. 

या कुर्बानीचे मांस  तीन भागात विभागली जाते, त्यापैकी एक भाग कुटुंबासाठी, दुसरा भाग मित्र, शेजारी आणि नातेवाईकांसाठी ठेवला जातो, तर  उरलेला भाग गरिबांना दान केला जातो. याद्वारे द्वारे  त्याग, दान आणि करुणा यांचा संदेश दिला जातो. 

कुर्बानीच्या या प्रथेला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न 'मुस्लीम सत्यशोधक मंडळ'कडून केला जातोय. त्यागाच्या या संकल्पनेला  अधिक लोकाभिमुख  करण्यासाठी  या भावनेला धर्माच्यापलीकडे  जाण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अभिनव उपक्रम राबवत आहे. या उपक्रमातून कुर्बानीच्या संकल्पनेला अधिक व्यापक करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. 

मंडळाकडून गेली १५ वर्षे बकरी ईदनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.  या उपक्रमात अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अनिस) चा ही सहभाग असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो मुस्लीम आणि मुस्लिमेतर नागरिक या उपक्रमाच्या उद्देशाविषयी विचारले असता मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, "बकरी ईदला 'कुर्बानीची ईद' अस म्हणतात. यात जनावरांचा बळी ही प्रतीकात्मक बाब आहे.  त्याग, बलिदान, सत्कार्यासाठी आपल्या जवळची गोष्ट देणे आणि या माध्यमातून समाजभान जागृत ठेवणे  हा कुर्बानीचा उदात्त हेतू आहे." 

‘बकरी ईद निमित्त रक्तदान’ या संकल्पनेविषयी विचारले असता ते सांगतात, "धार्मिक सण हे अधिक समाजाभिमुख, विज्ञानाभिमुख आणि मानवताभिमुख व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यामुळे या सणानिमित्त जात आणि धर्मापलीकडे जाणारे आणि  मानवतेचे नाते निर्माण करणार रक्तदान आपण करूया, या विचारातून बकरी ईद साजरी करण्याचे आम्ही ठरवले. आणि त्याचाच एक भाग म्हणून  मंडळ गेल्या पंधरा वर्षापासून रक्तदान अभियान राबवत आहे."

पुढे ते म्हणाले, “भारताची हिंदू-मुस्लीम सलोख्याची संस्कृती आहे. परंतु, काही वर्षांपासून समाजात द्वेष वाढत चालला आहे. त्यामुळे आनंद आणि उत्साहाचे भारतीय सण आता ताण-तणावात साजरे होताना दिसत आहेत. भारतीय संविधानानुसार वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे व बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कुर्बानीचा अर्थ ‘त्याग’ असा आहे. रक्त हे मानवाच्या शरीरातील अविभाज्य घटक आहे. जात, धर्म, लिंग, प्रांत या सर्वांपलीकडे जाणाऱ्या रक्ताची प्रतीकात्मक रूपाने कुर्बानी करून मानवता वृद्धींगत करणे, हाच या उपक्रमाचा हेतू आहे." 

या उपक्रमाच्या स्वरूपविषयी डॉ. तांबोळी  म्हणतात, "सुरुवातीला हा उपक्रम केवळ पुण्यातच राबवला जात असते. मात्र त्याला मिळणाऱ्या  उत्स्फूर्त प्रतिसदामुळे आम्ही महाराष्ट्रभरात हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. आता हे अभियान राज्यस्तरीय झाले आहे.”

यावर्षी यात आणखी एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची भर पडली आहे. त्याविषयी सांगताना डॉ. तांबोळी म्हणतात,“मुस्लीम सत्यशोधक मंडळाने या वर्षापासून रक्तदान अभियानासोबतच अवयवदान आणि मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून यासंदर्भात जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. सोबतच आधुनिक शिक्षणास चालना देण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहनही  मंडळाने केले आहे." 

मंडळाच्या या उपक्रमात दरवर्षी संघटना सहभागी होतात. अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस), राष्ट्र सेवा दल, मुस्लीम समाजातील काही पुरोगामी संघटना, धार्मिक संघटना या उपक्रमाला मोठे  सहकार्य करतात. 

याविषयी डॉ. तांबोळी म्हणतात, “जिथे आपले कार्यकर्ते नाहीत अशा ठिकाणी या संघटना कार्यक्रम पार पडतात. या उपक्रमातून  समाजात भाईचारा, सलोखा आणि  शांतता निर्माण होण्यासही मोठ्या प्रमाणात मदत होते.”

विशेष बाब म्हणजे मंडळाच्या ‘बकरी ईद निमित्त रक्तदान’ या उपक्रमात मुस्लिमांचा सहभाग मोठा असतो. राज्यभरातील मुस्लीम मंडळी या उपक्रमात सहभागी होतात. यावर्षीही अनेक मुस्लीम तरुण-तरुणी यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या याविषयीच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत. 

मंडळाचे कार्यवाह अल्तापहुसेन नबाब म्हणतात, “समाजावर रुढी-परंपरा, संस्कृती यांचा जबरदस्त पगडा असतो. बरेचदा त्यातून वाद निर्माण केले जातात. भारतात हिंदू-मुस्लिम वाद दोन्ही समाजाच्या आणि पर्यायाने भारताच्या प्रगतीच्या आड येत आलेला आहे. मुस्लिमांच्या बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याच्या प्रथेलाही बरेचदा निशाणा बनवले जाते. दुसरीकडे मुस्लिम समाजाने  जसे व्यक्तिगत जीवनात कुराणला स्थान दिले आहे तसेच भारतीय नागरिक म्हणून आधुनिक विचारसरणी, वैज्ञानिक दृष्टिकोन यांसारखी तत्वेही आत्मसात करायला हवीत. त्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मंडळाचा हा अभिनव उपक्रम आहे.” 

बकरी ईदच्या दिवशी रक्तदान करण्यामागे प्रेरणा काय, या कृतीतून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, असे विचारले असता बेनझीर काझी ही तरुणी म्हणते, "धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये ‘त्याग’ हे महत्वाचे मूल्य आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून, आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या प्रेरणेतून मी या उपक्रमात सहभागी  झाले. 

अमर तांबोळी हा आणखी एक तरुण या उपक्रमातील सहभागामागची भावना समजावून सांगताना म्हणतो, "प्रत्येकालाच आपला जीव महत्वाचा आहे आणि तो असलाच पाहिजे यात काही दुमत असण्याचे कारण नाही. आपल्याला जीवाचा त्याग करणं शक्य नाही, पण कमीतकमी मानवतावादी दृष्टिकोनातून आपण रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी निमित्त तरी होऊ शकतो. रक्त न मिळाल्याने देशात मृत्यूचे प्रमाण १५ ते २० टक्के इतके आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोकच रक्तदान करतात. त्यामुळे बकरी ईद निमित्त रक्तदान करून आपल्यापरीने कुर्बानीत सहभागी होण्याचा माझा उद्देश असतो."

यावर्षी ‘बकरी ईद निमित्त रक्तदान’ या उपक्रमाची सुरुवात सोमवारी (१७ जून रोजी) बॅ. नाथ पै सभागृह, सानेगुरुजी स्मारक येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच  'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' अशी शिकवण देणाऱ्या सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित मुस्लीम सत्यशोधक मंडळ ईद साजरी करताना सानेगुरुजींना अभिवादनही करणार आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस महाराष्ट्रभरात या शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाविषयी…  

मराठी साहित्यिक आणि कृतिशील समाज सुधारक हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० रोजी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजापासून प्रेरणा घेऊन सत्तरीच्या दशकात सुधारणावादी मुस्लिमांनी एकत्र येत ही चळवळ सुरू केली. मुस्लिम समाजातही धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात या उद्देशाने मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. भारतीय मुस्लिम महिलांच्या संवैधानिक अधिकारांविषयी आवाज उठवणारी मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही पहिली संस्था आहे. २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चर्चेत आलेल्या जुबानी तीन तलाकच्या विरोधात मंडळ गेल्या पन्नास वर्षांपासून लढा देत आल आहे. मुस्लीम समाजसुधारणेचा वसा घेतलेली ही महाराष्ट्रातील किंवा भारतातीलच नव्हे तर जगातील एक महत्त्वाची चळवळ आहे.

- प्रज्ञा शिंदे 

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter