शाहीर अमर शेख यांची आई मुनेरबी यांनी मुस्लिम असूनही ओव्या रचिल्या, हिंदू-मुस्लिम एकतेची रुजवण अमर शेखांवर तिथेच झाली. अमर शेख बार्शीतील गिरणी कामगारांचे कार्यकर्ते होते, पुढे कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होत शेतकऱ्यांचे मोठे लढे त्यांनी उभा केले. इंग्रजांनी अटक केल्यानंतर बार्शी त्यांनी जागविली, सिनेमात रस न वाटल्याने पुढे त्यांनी कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिल्लीपर्यंत नेऊन पोचविला, असे प्रतिपादन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी केले.
आयटक कामगार केंद्र येथे कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार केंद्र यांच्या वतीने कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ठोंबरे बोलत होते.
शाहीर अमर शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंचावर अध्यक्ष म्हणून कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, लहू आगलावे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष सचिन झाडबुके उपस्थित होते. ठोंबरे म्हणाले, अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, प्र. के. अत्रे अशा मित्रांनी अमर शेख यांना साथ दिली, अभिजात मराठीच्या दर्जाच्या पायाचे दगड १०६ हुतात्म्यांच्या रक्ताने रंगले आहेत तो काळ कष्टकरी वर्गान बहरवला होतो. कष्टकरी वर्गाला जागविणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्रातील कामगार शेतकरी यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा बाजार, जातीय ध्रुवीकरण, मुलींवरील बलात्कार आदी प्रश्नांवर अमर शेखांच्या विचारांनी संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा वापर करून हल्ला करण्याची वेळ आहे असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
सभेचे अध्यक्ष ए. बी. कुलकर्णी म्हणाले, जनतेचे प्रश्न तीव्र झाले आहेत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी अमर शेखांच्या विचारांची आवश्यकता आहे, आयटक व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते काम पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे.
टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सचिन झाडबुके यांचा सत्कार प्रा. डॉ. महादेव ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक कॉ. शौकत शेख, सूत्रसंचालन कॉ. प्रवीण मस्तूद यांनी केले. यावेळी सतीश गायकवाड, प्रा. डॉ. रविकांत शिंदे, प्रा. प्रेमसागर राऊत, भारत भोसले, आनंद गुरव, अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते.