‘रेड क्रॉस’तर्फे पीडितांना पाच लाखांची मदत
गजापूर घटनेमध्ये अनेक कुटुंबीयांच्या घरांचे व साहित्याचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेतर्फे या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून पाच लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले गेले.
खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केलेल्या आवाहनानुसार संस्थेतर्फे ही मदत देण्यात आली. संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट व्ही. बी. पाटील, चेअरमन श्रीनिवास मालू, उपाध्यक्ष सतीशराज जगदाळे, सचिव निरंजन वायचळ यांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण झाले.
यावेळी गजापूरचे अलीसाहेब कासीम- प्रभुळकर, इसमान प्रभुळकर, जहीर म्हालदार, रमजान प्रभुळकर यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.
‘शांतीसाठी स्त्री-संघर्ष' मंचाकडून प्रसिद्ध केला सत्यशोधन अहवाल
गेल्या वर्षी जून महिन्यात कोल्हापूरमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व जाती-धर्मांतील स्त्रियांनी एकत्र येऊन 'शांतीसाठी स्त्री-संघर्ष' हा एक अभिनव मंच स्थापन केला होता. विद्वेषाच्या विरोधात शांती व न्यायाच्या मागणीसाठी या मंचाच्या माध्यमातून स्त्रिया मूक निदर्शने करत सभोवतालच्या समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. गजापूर हिंसाचाराच्या घटनेनंतर मेघा पानसरे, रेहाना मुरसल, भारती पोवार यांच्या नेतृत्वाखाली या समितीने सत्यशोधन अहवाल देखील सादर केला.
गजापूर हिंसाचाराच्या घटनेनंतर पुन्हा भविष्यात अशा घटना घडू नयेत व सामाजिक सलोखा आणि सुसंवाद टिकून राहावा यासाठी समाजातील सर्वा क्षेत्रातील विवेकी लोकांना एकत्र बोलावून या प्रश्नाची सखोल चर्चा घडवून आणावी. तसेच, अशा घटना घडत असल्यास संबंधित घटकांना तातडीने संपर्क साधण्यासाठी एक हेल्पलाईन स्थापन करावी अशी मागणी या समितीतर्फे करण्यात आली.
पीडितांसाठी ‘मानव मुक्तीचा एल्गार’
गजापुरातील घटनेनंतर हिंसक प्रवृत्तीना रोखणे, हल्लेखोरांना पायबंद घालणे, पिडितांना न्याय मिळवून देणे आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत, या प्रकारचे कार्य करण्यासाठी महाराष्ट्र व्यापी आघाडीची आवश्यकता असल्याचे लक्षात घेता काही संघटनांनी एकत्रित येऊन ४ ऑगस्ट रोजी 'मानव मुक्तीचा एल्गार' ही सभा घेतली.
महाराष्ट्राची एकोप्याची संस्कृती, पुरोगामी विचार परंपरा आणि सामाजिक सर्वसमावेशकता मजबूत राहावी. तसेच हिंसेविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. पिडितांना न्याय मिळावून द्यावा. यासाठी महाराष्ट्राच्या पातळीवर 'छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच' या नावे व्यापक आघाडी सुरू करण्याबद्दल एकमताने निर्णय यावेळी घेण्यात आला.
या सभेसाठी महाराष्ट्रभरतील अनेक संघटना एकत्रित आल्या होत्या. त्यामध्ये लोक मोर्चा, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), जिल्हा नागरी कृती समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, शांतीसाठी स्त्री संघर्ष यांचा समावेश होता.
प्रशासनाकडून पिडीत कुटुंबांना १ कोटी ४९ लाख ९० हजारांची नुकसानभरपाई मंजूर
हिंसाचारात दगडफेक, जाळपोळ, घरे, दुकाने, वाहने व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तातडीची मदत म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमधून ५६ बाधित कुटुंबांना प्रापंचिक साहित्य, सानुग्रह अनुदान व दैनंदिन मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये असे १४ लाख व ४२ घरांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयेप्रमाणे १० लाख ५० हजार असे एकूण २४ लाख ५० हजारांचे अनुदान देण्यात आले आहे.
शाहूवाडी तहसीलदार यांच्याकडील सुधारित पंचनाम्यानुसार १ कोटी ४९ लाख ९० हजार ९०० इतकी रक्कम होते. ही रक्कम मिळावी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला होता. यावर ३० जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईच्या रकमेला मंजुरी देण्यात आली. हा खर्च सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, दंगलग्रस्त भागातील झळ पोहोचलेल्या व्यक्तींना साहाय्य, सहायक अनुदाने या लेखाशीर्षाखाली उपलब्ध निधीतून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा, असे शासन आदेशात नमूद केले आहे.
- भक्ती चाळक