मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी उभारायला हव्यात अभ्यासिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

मुस्लिम समाजात प्राथमिक व सर्वसाधारण शिक्षणाचा टक्का कमी आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणातील टक्कादेखील अत्यंत कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. शासनाने शहरातील मुस्लिम लोकसंख्येचा विचार करून विविध चार ठिकाणी चार अभ्यासिका मार्गदर्शन केंद्रे उभारण्याची गरज असल्याचे मत मुस्लिम समाजातील मान्यवरांनी व्यक्त केले. 

मुस्लिम समाजात शिक्षण घेणाऱ्या अनेकांना उच्च शिक्षणाविषयी खूप त्रोटक माहिती असते. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबाबत योग्य ती माहिती न मिळाल्याने अनेकजण भरकटतात. तर अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते.

अनेक विद्यार्थ्यांचे तसेच स्पर्धा परीक्षार्थीचे संधी असूनही केवळ अभ्यासाठी जागा नसल्याने नुकसान होते. त्यामुळे शहरात विशेषतः मुस्लिम वस्त्यांमध्ये तीन ते चार ठिकाणी अल्पसंख्याकांसाठी अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रे शासनाने उभारावीत, अशी अपेक्षाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. 

याविषयी बोलताना सोलापुरातील व्यावसायिक अजहर गढ़वाल म्हणतात, “महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले व उच्च शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी समाजकल्याण अथवा शांत ठिकाणी जातात. मात्र घरापासून हे अंतर लांब पडते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारल्यास अभ्यासासाठी होणारी अडचण दूर होईल आणि शिक्षण घेणाऱ्या सर्वांनाच याचा लाभ होईल.” 

सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद करीम शेख म्हणतात, “मुस्लीम समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांना अभ्यासिका नावाचा प्रकार व त्याची उपयोगिता याविषयी माहिती नाही. आयुष्याची आणि करियरची पुढील दिशा ठरवताना त्यांना अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र यांचा फार उपयोग होईल.

“मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका व मार्गदर्शन खूप गरजेचे आहे. त्याठिकाणच्या शैक्षणिक वातावरणाचा गंध अजूनही अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांना नाही. शासनाने शहरात किमान चार ठिकाणी अशी केंद्रे उभारायला हवीत जेणेकरून समजातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचे महत्त्व रुजेल ”, अशी मागणी कादर मुलाणी यांनी केली. 

तर एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताना सोलापूरचे शिक्षक इमरान जमादार म्हणतात, “मुस्लिम विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व स्पर्धा परीक्षांमधील मार्गदर्शनासाठी अभ्यासिकेसोबतच मार्गदर्शन केंद्रांची गरज आहे. त्यापैकी अनेकांच्या घरी शैक्षणिक वातावरण नसते. बहुतांश मुस्लिम भागांमध्ये वर्दळ व गजबज असल्याने अभ्यासात अडचणी येतात. दुसरीकडे शिकताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यामुळे अशा अभ्यासिका आणि मार्गदर्शक केंद्रांची मोठी गरज आहे. उच्च शिक्षणातील मुस्लिमांची संख्या वाढली तर त्यातून समाजात आवश्यक सुधारणा होतील व त्याद्वारे प्रगतीदेखील साधता येईल.” 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter