बीड जिल्ह्यातील नारायणगडावर यंदा पहिल्यांदाच आरक्षणासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेले जरांगेंचे लाखो मराठा बांधव नारायण गडावर आले होते. यावेळी मेळाव्याला सामाजिक आणि राजकीय महत्व प्राप्त झाल्याचे दिसून आले. तर हा मेळावा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे.
यावेळी गर्दीने गच्च भरलेलं मैदान पाहून जरांगे म्हणाले, “एवढी गर्दी या मेळाव्याला होईल असं वाटलं नव्हतं. आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्यने आला आहात हे या समुदायावर संस्कार आहेत. या समुदायाने कधीच जातीवाद केला नाही आणि जात त्यांना शिवली देखील नाही.”
महाराष्ट्रातील विविध समाजबांधवांकडून मेळाव्याला भरगोस प्रतिसाद मिळाल्याचे पाहून जरांगेंनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत ते म्हणाले, “राज्यात मराठा, दलित आणि मुस्लिम समाजावर सर्वाधिक अन्याय होत आहे. हा अन्याय रोखण्यासाठी या समाजांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे झाले तर राज्यात अशक्य ते शक्य होईल.”
पुढे ते म्हणतात, “समाजासमाजात भांडण लावण्याचे काम केले जात आहे. याचा फटका मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाला बसत आहे. त्यामुळे या समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी समाज एकत्र येतो, याची प्रचिती श्री क्षेत्र नारायणगडावर आली. अशाच पद्धतीने मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाला परिवर्तनासाठी मनातून तयारी करावी लागणार आहे.”
या मेळाव्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये विशेषतः मुस्लीम समाजाची संख्या त्यामध्ये लक्षणीय होती. मुस्लीम समाजाने मराठा आंदोलनात सुरुवातीपासूनच मोठी भूमिका बजावली आहे. ज्या ज्या ठिकाणी आंदोलन असेल त्या त्या ठिकाणी स्थानिक मुस्लीम बांधवांनी उपोषण स्थळी जाऊन मराठा आरक्षणाला पाठींबा दिला. मराठा आंदोलनाच्या व्यवस्थापनापासून ते आंदोलकांच्या राहण्या-खाण्यापर्यंत मोफत सेवा मुस्लीम समाजाकडून पुरवण्यात आली आहे. अशा पद्धतीने आजपर्यंत मुस्लीम समाजाने या आंदोलनाला आपले समर्थन दर्शवले आहे आणि सहभाग देखील नोंदवला आहे.
महाराष्ट्रातील मराठा-मुस्लीम युती ही भविष्यातील धार्मिक आणि सामाजिक सौहार्दासाठी महत्वाची घटना ठरू शकते, असे सामाजिक आणि राजकीय विचारवंतांचे मत आहे. बीडमध्ये पार पडलेल्या या मराठा समाजाच्या दसरा मेळाव्यापूर्वी नियोजनासाठी मराठा समाजाकडून नारायणगडावर बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत सर्व समाज प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी देखील मुस्लीम समाजाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
केज तालुक्यातील माजी नगराध्यक्ष हारून इनामदार यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “केज जिल्ह्यातून मराठा आंदोलनासाठी आम्ही १०० गाड्यांचे नियोजन केले होते. या ठिकाणाहून मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी नारायणगडावर आम्ही लाखोंच्या संख्येने उपस्थित देखील राहिलो होतो. त्या दसरा मेळाव्याचे सामाजिक स्थरावर महत्व पटवून देण्यासाठी आम्ही त्याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो होतो.”
उपस्थितांसाठी मुस्लीम बांधवांकडून अन्नदान
दसऱ्याच्या दिवशी जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला पहाटेपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. तब्बल ९०० एकरामध्ये हा मेळावा पार पडला. तर २०० एकरमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. मराठा समाजाच्या या महामेळाव्याला मोठा जनसागर लोटला होता. तसेच सध्या ऑक्टोबर महिना सुरू असल्याने वाढते तापमान पाहता नगरिकांच्या सेवेसाठी परभणी जिल्ह्यातील काही मुस्लीम युवकांनी एकत्र येत ४०,००० पाणी बॅाटल्सची सेवा पुरवली. तसेच १० क्विंटल तांदळाच्या खिचडीचे देखील वाटप नारायणगडावर केले आहे. तर नारायणगडाकडे प्रस्थान करणाऱ्या जनसमुदायासाठी बीड जिल्ह्यातील मादळमोही या गावात मुस्लीम बांधवांकडून चहा नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते.
मुस्लिमांकडून मोफत गाडी दुरुस्ती सेवा
मनोज जरांगेंच्या महामेळाव्याला लाखोंची गर्दी दिसून आली. बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी ते नारायणगड अशी ३० किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. बीडकडे जाणारे चारही मार्ग जाम झाले होते. या मेळाव्यासाठी आलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी सोलापूर मार्गावर काही गॅरेज मालकांनी एकत्र येत मोफत सेवा दिली. त्यामध्ये मुस्लीम बांधवांचा देखील समावेश होता.
मोफत सेवा पुरवल्यानंतरचा अनुभव सांगताना अजीज खान सांगतात, “बीडमध्ये नारायणगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माझं गॅरेज आहे. आमच्या गॅरेज लाईनमध्ये माझे बरेच मित्र मराठा आहेत. मला त्यांच्याकडून ही गोष्ट समजली आणि मी सुद्धा या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. माझ्यासहित माझ्या गॅरेजमधल्या ८ मुलांची टीम कामाला लागली होती. त्या रात्री आम्ही ३-४ वाजेपर्यंत जागेवर जाऊन गाड्या रिपेअर करत होतो. आम्ही सुद्धा या महाराष्ट्राचा भाग आहोत त्यामुळं ही सेवा आम्ही मराठा बांधवांच्या प्रेमाखातर दिली.”
चौसाळा ते शहागड मार्गावर सेवा देणारे सलमान शेख म्हणतात, “मनोज जरांगे पाटलांचे चांगले काम सुरु आहे. म्हणून आम्ही त्यांच्या कार्याला पाठींबा देत आहोत. अभी नही तो कभी नही अशी आमची धारणा आहे. आम्ही चार-चार फिटरची टीम केली, जी १० ते २० किलोमीटर मध्ये एकएका गाडीत फिरत होती. आमच्यासोबत गाडीदुरुस्तीचे सर्व समान होते. गाडी दुरुस्त न झाल्यास ती मालकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा आम्ही केले. ही सर्व प्रकारची सेवा आम्ही मोफत दिली.”
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून मुस्लिम समाज देखील एकवटला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी केलेले बेमुदत उपोषण असो किंवा आत्ताचा दसरा मेळावा असो, मुस्लीम समाजाने नेहमीच त्यांचा सहभाग नोंदवला आहे. तर मनोज जरांगे यांनी सुद्धा मुस्लीम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.