ॲड. जाकिर अत्तार
त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात छात्रभारती या विद्यार्थी चळवळीतून झाली. पुढे कामगारांच्या, मोलकरणींच्या, मजुरांच्या चळवळींशी ते जोडले गेले. ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. बाबा आढाव, संविधान-अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांच्या सहवासात त्यांची वैचारिक परिपक्वता वाढली. पुढे कायद्याच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आणि कामगारांच्या प्रश्नांवर कायदेशीर लढा सुरू केला. ही कथा आहे सामाजिक भान जपत वकिली करणाऱ्या पुण्यातील ॲड. जाकिर अत्तार यांची.
हुतात्मा राजगुरू यांच्या नावे वसलेल्या राजगुरुनगर येथे (ता. खेड, जि. पुणे) जाकिर बाबूलाल अख्तार यांचा जन्म १२ मे १९६९ रोजी झाला. संयुक्त कुटुंबात जन्मलेले जाकिर पाच भावंडांतले दुसऱ्या क्रमांकाचे. जाकिर यांचे बालपण पुण्यातील गणेश पेठेत गेले. याच भागात महात्मा फुले यांच्या काही अनुयायांनी सन १८८५ मध्ये 'कॅम्प एज्युकेशन सोसायटी' नावाची शैक्षणिक संस्था सुरू केली होती. या संस्थेची 'राजा धनराज गिरजी हायस्कूल' ही मुख्य शाळा बाबाजान दर्ग्याजवळ आहे. थोर साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या शाळेचे त्या काळी मुख्याध्यापक होते. याच शाळेतून जाकिर अत्तार यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या जाकिर यांचे वडील पुणे महानगरपालिकेत चालक होते. पुढे बढती मिळून ते सुपरवायझर झाले. घरातील शैक्षणिक वातावरणाविषयी ते सांगतात, "आमच्या घरात फारसे शैक्षणिक वातावरण नव्हते. त्या काळी दहावीपर्यंत शिकलेला माझ्या कुटुंबातील मी पहिलाच मुलगा होतो."
जाकिर १९८५ मध्ये दहावी झाले. दहावीनतर त्यांनी 'आबासाहेब गरवारे महाविद्यालया'त कला शाखेत प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनाच्या पूर्वार्धात 'छात्रभारती विद्यार्थी संघटने'शी ते जोडले गेले. छात्रभारतीचे प्रतिनिधी म्हणून विविध समाजवादी चळवळींच्या कार्यक्रमांना ते जाऊ लागले.
चळवळीतील पदार्पणाविषयी जाकिर सांगतात, "मला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यात या संघटनांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे मी आजही अभिमानाने सांगतो. मी तरुणपणी छात्रभारतीचा एक सक्रिय कार्यकर्ता होतो. संघटनेचा पुणे शहराध्यक्ष म्हणून सुरू झालेला माझा प्रवास महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदापर्यंत पोहोचला."
त्या काळातील पुण्याविषयी जाकिर सांगतात, "मी ज्या परिसरात राहत होतो तिथे संमिश्र लोकवस्ती होती. हिंदू-मुस्लिम आणि इतर विविध धर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. त्या काळी शहर फार छोटे होते. शिवाजी रोडपासून ते कॅम्प असा पूर्व भाग आणि शिवाजी रोड ते डेक्कनपर्यंतचा पश्चिमेकडचा भाग अशा दोन भागांत शहर विभागलेले होते. पश्चिम भागाच्या तुलनेने पूर्वेकडचा भाग त्या काळी मागास समजला जायचा. आजही परिस्थिती फार वेगळी नाही. पूर्वेकडच्या भागात आजही शैक्षणिक संस्था कमी आहेत. दलित, ओबीसी, मुस्लिम बांधवांचा हा संमिश्र भाग आहे."
ते पुढे म्हणतात, "त्या काळी शहरात काही जातीय दंगली झाल्या. मी राहत असलेल्या परिसरात १९८७ मध्ये एक जातीय दंगल उसळली होती. सहा डिसेंबर १९९२ ला जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्यानंतर मोठ्या दंगली या भागात झाल्या नाही. याच काळात बाबा आढाव, भाई वैद्य यांच्या संपर्कात मी आलो. पुढे 'महात्मा फुले समता प्रतिष्ठान'मध्ये मी अनेक वर्षे काम केले. ही सामाजिक कामे करत करत १९९० मध्ये मी बीए झालो."
नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याचा निर्णय का घेतला असं विचाल्यावर जाकिर म्हणाले, "माझ्या कुटुंबीयांचा नोकरीकडे फारसा कल नव्हता, त्यामुळे मीही व्यवसायाकडेच वळायचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्या व्यवसायातून सामाजिक प्रश्न सोडवता यावेत असे मला नेहमीच वाटायचे."
विद्यार्थिदशेत चळवळीच्या माध्यमातून प्रश्न सोडवणाऱ्या जाकिर यांनी कायद्याच्या माध्यमातून मजुरांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. याविषयी प्रा. सुभाष वारे यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि आयएलएस (इंडियन लॉ सोसायटी) लॉ कॉलेजला प्रवेश घेतला.
सन १९९५ पासून वकिली करणारे जाकिर सांगतात, "सिव्हिल कोर्टात वकिली करायचा निर्णय न घेता मी कामगार न्यायालयात वकिली करायचा निर्णय घेतला. कारण, या क्षेत्रात मला प्रचंड आवड होती. त्या काळात कामगारांची मोठमोठी आंदोलनेही होत असत. त्यातून मला अधिक काम करायची प्रेरणा मिळायची. मला या कामाचे Attraction (आकर्षण) नव्हते, तर Fascination (आस, ओढ) होते."
त्या काळचे वकिलीच्या क्षेत्रातले मोठे मानले जाणारे ॲड. शरमाळेबंधू यांच्या मार्गदर्शनात जाकिर यांनी प्रॅक्टिस सुरू केली. 'हिंद मजदूर सभे'शी संलग्न असलेल्या 'पुणे मजदूर सभे'त त्यांना काम मिळाले. त्या वेळी 'पुणे मजदूर सभे'चे काम ॲड. आर. बी. शरमाळे आणि ॲड. रामचंद्र शरमाळे हे बघत असत. त्या काळी या पुणे मजदूर सभेच्या कार्याचा पसारा मोठा होता. असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सभा काम करत असे. लक्ष्मी रोडवरील सेल्समनची संघटना, बँकेच्या आणि पोस्टाच्या कर्मचाऱ्यांची संघटना, किराणामालाचे दुकानदार आणि होलसेल व्यापाराच्या दुकानात दिवाणजी म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना, मोलकरीण संघटना, वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांमधील संघटना 'पुणे मजदूर सभे'शी जोडलेल्या होत्या.
शंभरपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी त्या काळी या संघटनेशी जोडलेले होते. त्यामुळे जाकिर यांच्यावर कामाचा प्रचंड भार असायचा. या संघटनांमध्ये पुणे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्टेशनच्या (पीएमटी) चालकांचीही एक संघटना होती. पीएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या शेकडो केसेस जाकिर यांनी लढवल्या. त्यातून त्यांना कामाचा मोठा अनुभव मिळाला.
सन १९९७ मध्ये पुण्यामध्ये थ्री-सीटर आणि सिक्स-सीटर रिक्षांचा मोठा वाद होता. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव यांनी रिक्षाचालकांच्या संघटनेद्वारे म्हणजेच 'रिक्षा पंचायत'द्वारे सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यांनतर सिक्स-सीटर रिक्षा बंद करण्यात आल्या. या लढ्यात वकील म्हणून जाकिर सहभागी होते.
आपल्या कामाविषयी जाकिर पुढे सांगतात, "पुणे परिवहन महामंडळात सुरुवातीला पेन्शन-योजना होती. १९९० च्या दशकात काही कारणास्तव ती अचानक बंद करण्यात आली. पेन्शन-योजना पुन्हा सुरू करावी अशी तिथल्या कामगारांची मागणी होती. त्यामुळे औद्योगिक न्यायालयात आम्ही केस दाखल केली. कामगारांच्या या मोठ्या प्रकरणात आम्हाला यश आले. औद्योगिक न्यायालयाने पुणे महानगर परिवहन मंडळाला पेन्शन सुरू करण्याचे आदेश दिले."
जाकिर यांनी आतापर्यंत शेकडो केसेस लढवल्या आहेत. २५ वर्षांच्या अनुभवात अनेक चढ-उतार त्यांनी पहिले आहेत. या प्रवासात दिवंगत ॲड. प्रकाश हुद्दार हे त्यांचे प्रेरणास्थान राहिले. कामगारक्षेत्राचा हुद्दार यांना खूप अनुभव होता. जाकिर हे अखेरपर्यंत हुद्दार यांच्या सोबतच होते.
जाकिर सांगतात, "या क्षेत्रात मुस्लिम म्हणून मला कधीच काहीच अडचण आली नाही. घरातून माझ्या वडिलांचाही मला पूर्ण पाठिंबा होता. 'लेबर कोर्ट असोसिएशन'चा कमिटी-मेंबर ते अध्यक्ष या पदापर्यंत मी काम केले आहे, तसेच विविध संघटनांचे नेतृत्वही केले आहे."
ॲड. जाकिर सामाजिक सलोखा जपण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवतात. यावर्षी दिवाळीनिमित्त त्यांनी सर्वधर्मीय दिवाळीचे आयोजन केले होते. तर, ईदनिमित्त ते सर्वधर्मीय बांधवांसाठी जेवणाचे आयोजनही करतात. तसेच, दरवर्षी फुले वाड्यावर होणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेच्या आयोजनात ॲड. जाकिर सहभाग घेतात.
धार्मिक सौहार्द आणि सामाजिक सद्भाव जपणाऱ्या या उपक्रमांविषयी ते म्हणतात, "‘बंधुता’ हे आपल्या राज्यघटनेतील एक महत्वाचे तत्व आहे. त्यामुळे परस्परांमधील बंधुभाव वाढवण्यासाठी असे उपक्रम घ्यायला हवे, असे मला वाटते. एकत्र येऊन सलोख्याने सण साजरा करण्याची आपली शेकडो वर्षांची परंपरा आहे. आजच्या काहीशा धृविकरणाच्या वातावरणात असे प्रयत्न करणे मला महत्त्वाचे वाटते. अशा आयोजनांमधून एक सकारात्मक उर्जा मिळते आणि धार्मिक सौहार्दाचे उदाहरण समाजापुढे ठेवता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे, धर्माच्या बंदिस्त चौकटी मोडतात!”
- छाया काविरे