योगाबद्दलचे मुस्लिमांचे गैरसमज आता बऱ्याच अंशी दूर झाले असले तरी, मुस्लिमबहुल काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमुळे अराजकता शिगेला पोहोचली होती, तेव्हा शब्बीर अहमद डार यांनी धैर्य दाखवले आणि काश्मीरमध्ये योगाची स्थापना केली. शब्बीर यांनी गेल्या दोन दशकांत योगाच्या प्रचारासाठी केलेल्या प्रयत्नांना आता चळवळीचे स्वरूप आले आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
शब्बीर यांनी आवाज-द व्हॉईसशी केलेल्या संभाषणात सांगितले की, ज्यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय योग महोत्सव श्रीनगरमध्ये आयोजित करायचा होता, त्यावेळी काही लोकांनी तेथील परिस्थिती इतकी खराब केली की त्यांना त्यांचा कार्यक्रम जम्मूमध्ये करावा लागला. त्यांच्या प्रयत्नांतून असे अनेक कार्यक्रम संपन्न झाले. ते म्हणतात, "सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यांनी शिकवलेली मुलं सौदी अरेबियात जाऊन लोकांना योग शिकवत आहेत."
शब्बीर अहमद डार यांनी 2004 मध्ये चार मुलांसह काश्मीरमध्ये योग प्रशिक्षक म्हणून सुरुवात केली. आज ते श्रीनगरमध्ये 250 आणि जम्मूमध्ये 250 मुलांना योग शिकवत आहेत.
आवाज-द व्हॉईसशी बोलताना शब्बीर अहमद डार म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगात योगाचे महत्त्व वाढले आहे, त्यामुळे त्यांनी शिकवलेल्या मुलांना आखाती देशातही बोलावले जात आहे. अनेक काश्मिरी मुले अरब देशांमध्ये योगाचे प्रशिक्षण देत."
पुढे ते म्हणतात, “योगाबाबतची परिस्थिती काळानुसार बदलल्याने लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. लोकांचा त्यावरचा इतका विश्वास वाढला आहे की, अमली पदार्थांचे व्यसन करणारेही वाईट सवयीपासून त्यांची सुटका व्हावी यासाठी योग शिकण्यासाठी येऊ लागले आहेत.
सहा वर्षांपासून शब्बीर यांच्याकडून योगा शिकत असलेल्या जारफा फैयाज सांगतात की, "योगामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढली आहे. त्यांच्या शरीराला आता खूप आराम वाटतो. आता माझी मैत्रीण सुद्धा योगा शिकण्यासाठी तिला सोबत घेऊन जाण्याचा आग्रह धरते."
योगाविषयी काश्मिरी नागरिकांच्या बदलत्या दृष्टिकोनाविषयी बोलताना शब्बीर म्हणतात, "लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, स्पोर्ट्स कौन्सिल आणि योगा सोसायटी ऑफ काश्मीर यांच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरमध्येही लोकांचे योगाबद्दलचे मत बदलले आहे. त्यांना योगाचे अधिक पटू लागले आहे. एलजी सिन्हा यांच्या प्रयत्नांमुळे, गुलाम मोहम्मद बक्षी स्टेडियम, श्रीनगर आणि जम्मूमधील मौलाना आझाद स्टेडियम याठिकाणी योगासाठी जागा देण्यात आली आहे."
जम्मू-काश्मीरमधील लोकांचे योगाबद्दलचे वाढते आकर्षण पाहून शब्बीर अहमद डार इतके उत्साहित झाले आहेत की ते म्हणतात, "काश्मीर खोऱ्यात क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. पण येत्या पाच-दहा वर्षांत या केंद्रशासित प्रदेशात योगाची लोकप्रियता इतकी वाढेल की ती क्रिकेटलाही मागे सोडेल."
योगाबाबत विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजे हिवाळ्यात योग करता येत नाही हा गैरसमज आता दूर झाला आहे. दहा अंश तापमानातही हे चांगले करता येते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी यापेक्षा चांगला मंत्र दुसरा नाही, असे डार पुढे म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून योग शिकणाऱ्यांच्या शरीराला अपाय होऊ शकतो, त्यामुळे योग शिकण्यास इच्छुक असलेल्यांनी योग प्रशिक्षकाशी थेट संपर्क साधावा असा सल्ला त्यांनी दिला.
(अनुवाद : प्रज्ञा शिंदे)
- यास्मिन खान, श्रीनगर