सुप्रसिद्ध कलाकार, तबला वादक, संगीतकार, अभिनेते झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन हे अमेरिकेत वास्तव्य करत होते. त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्वही घेतलं होतं. त्यांच्या निधनामुळे भारतीय आणि जागतिक संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. रविवारी, १५ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. याआधी रविवारी हुसैन यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्क हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. याची माहिती त्यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी पीटीआयला दिली होती.
झाकीर हुसैन यांची कारकिर्द....
९ मार्च १९५१ ला जन्मलेले झाकीर हुसैन यांचे वडील सुप्रसिद्ध तबला वादक अल्ला राखा खान हे होते, तर त्यांच्या आईचं नाव बावी बेगम असे होते. वयाच्या सातव्या वर्षांपासून तबल्यावर त्यांची बोटं आणि हातांची थाप पडू लागली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून ते तबला वादनाचे कार्यक्रम करु लागले. वॉशिंग्टन येथील विद्यापीठात त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवीही घेतली. त्यांनी त्यांच्या संगीतातील करीअरची सुरुवात भारतीय शास्त्रीय संगीतापासूनच केली होती. मात्र आपल्या अद्वितीय शैलीमुळे झाकीर हुसैन जागतिक स्तरावरचे प्रसिद्ध कलाकार झाले.
झाकीर हुसैन यांनी तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले होते. फक्त ग्रॅमी पुरस्कारच जिंकले नाहीत तर त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते देखील होते. त्यांनी १२ चित्रपटांमध्ये काम केले आहे. उस्ताद झाकीर हुसैन यांनी १९८३ मध्ये आलेल्या ब्रिटिश चित्रपट 'हीट अँड डस्ट'मध्ये शशी कपूरसोबत काम केले होते. हा त्याचा अभिनयातील पहिला चित्रपट होता. याशिवाय ते १९९८ मध्ये आलेल्या 'साज' चित्रपटात दिसले होते. यामध्ये शबाना आझमी यांनी त्यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट करून सर्वांना चकित केले. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी वडिलांसोबत मैफिलीला जायला सुरुवात केली. झाकीर हुसेन हे अमेरिकेतही प्रसिद्ध होते. २०१६ मध्ये, त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यात सहभागी होणारे झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार होते.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, उस्ताद झाकीर हुसैन यांचे लग्न अँटोनिया मिनेकोला यांच्याशी झाले होते. ज्या कथ्थक नृत्यांगना आणि शिक्षिका तसेच त्यांचे व्यवस्थापक आहेत. त्यांना दोन मुली आहेत.
प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अश्या दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबलावादनाने मंत्रमुग्ध केले. त्याचे तबला वादन ऐकून लाखो युवक युवती तबला वादनाकडे वळले. भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवून एकल तबला वादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साथ संगतकार म्हणून आपला अमिट ठसा उमटवताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक संगीतकारांसोबत तबलावादन केले. असा तबला नसांनसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
झाकीर हुसैन यांच्या निधनावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे." उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे. उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले."