रतन टाटांच्या अंत्ययात्रेत सर्वधर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
रतन टाटांसोबतचे शेवटचे क्षण
रतन टाटांसोबतचे शेवटचे क्षण

 

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात पारशी, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख आणि हिंदू यांच्यासह सर्व धर्मातील धर्मगुरूंनी रतन टाटांसाठी प्रार्थना केली.

टाटा सन्सचे चेअरमन, रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजता दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारतीय राष्ट्रध्वजात त्यांचा मृतदेह नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) च्या लॉनवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.  त्यानंतर वरळी येथील स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. एनसीपीए येथे त्यांच्या श्रद्धांजली सभेत पारशी, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि हिंदू धर्मातील धर्मगुरूंनी प्रार्थना केली. या मार्मिक मेळाव्याचे व्हिडिओ इंटरनेटवर चांगलेच वायरल झाले आहेत. ज्यात अनेकांनी उद्योगपतीला 'भारताचे खरे प्रतीक' म्हटले आहे.

रतन टाटा यांच्या श्रद्धांजली सभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “चांगला माणूस असणे हा सर्वात मोठा धर्म आहे. मानवता हे त्या धर्माचे नाव आहे, ज्याचा प्रत्येक धर्मातील लोक आदर करतात, रतन टाटा हे मानवता धर्म जोपासणारे होते.” असे एका व्यक्तीने सांगितले. "आम्ही एक रत्न गमावले." "हे वैयक्तिक नुकसानीसारखे वाटते," “त्यांनी सर्वांना एकत्र आणले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” अशा प्रतिक्रया लोकांनी समाजमाध्यमांवर दिल्या.

 
 
रतन टाटा यांचे पार्थिव वरळीतील पारशी स्मशानभूमीत, प्रथम प्रार्थना हॉलमध्ये सुमारे ४५ मिनिटे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. स्मशानभूमीतील प्रार्थना हॉलमध्ये अंदाजे २०० लोक उपस्थित होते. प्रार्थनेनंतर, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह विद्युत स्मशानभूमीत हलवण्यात आला.

टाटा सन्सच्या निवेदनात “आम्ही आमच्या लाडक्या रतनचे शांततेत निधन झाल्याची घोषणा करत आहोत. आम्ही, त्याचे भाऊ, बहिणी आणि कुटुंबीय, त्याचे कौतुक करणाऱ्या सर्वांकडून प्रेम, आदर आणि सांत्वन स्वीकारतो. ते यापुढे व्यक्तिशः आपल्यात नसले तरी त्यांचा नम्रता आणि औदार्याचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दु:खाच्या काळात, आम्ही त्यांच्या स्मृतीचा आदर करण्यासाठी एकत्र आलो आहोत म्हणून आम्ही गोपनीयतेची विनंती करतो,” असे  म्हटले आहे.