भक्ती चाळक
मुस्लीम धर्मग्रंथ कुराणमध्ये महिलांना शिक्षण, संपत्ती, नोकरी आणि व्यवसायाचा अधिकार दिला असतानाही एकविसाव्या शतकात या माहिलांना शैक्षणिक मागासलेपणाचा अभिशाप भोगावा लागतोय. सच्चर समितीच्या अहवालात भारतातील एकूणच मुस्लीम समाजाच्या लोकसंख्येपैकी केवळ २ टक्के महिलांना उच्चशिक्षणापर्यंत पोहोचता आले आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षणातच अत्यल्प सहभाग असल्याने शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांचे अस्तित्व १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. शिक्षणाची अशी दयनीय अवस्था असताना बिहारच्या एका मुस्लीम तरुणीने न्यायाधीश बनत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
बिहारच्या मुंगेर गावातील सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात जन्मलेली हबीबा बुखारी ही न्यायाधीश बनली आहे. बिहार न्यायिक सेवा परीक्षेत तिने ३०वा क्रमांक पटकावला आहे. मुंगेर गावात हबीबाच्या कुटुंबाकडे एक प्रतिष्ठित घराणे म्हणून पाहिले जाते. हबीबाचे आजोबा मौलाना सादुल्ला बुखारी हे १९४२ ला बुखारा शरीफ येथून मुंगेरला आले. त्यांनी मुंगेरमध्ये तजवीद उल कुरान मदरसाची स्थापना केली. ज्याचे कामकाज हबीबाचे चुलते अब्दुल्ला बुखारी यांच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे सुरू आहे. तर हबीबाचे वडील कारी मोहम्मद अहमद बुखारी हे मुंगेरच्या गुलजार पोखर मशिदीचे इमाम आहेत. शिक्षणाची गंगा वाहत असलेल्या अशा बुखारी कुटुंबात हबीबाचा जन्म झाल्याने ती शैक्षणिक वातावरणात वाढली आहे. तिच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे.
हबीबाचा न्यायाधीश होण्याचा प्रवास सोपा नव्हता. तिच्या या खडतर प्रवासात तिला कुटुंबाची साथ कशी मिळाली याबाबत ती सांगते, “माझ्या या निर्णयात मला कुटुंबाचा सुरुवातीपासून पाठींबा मिळाला आहे. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या माझ्या कुटुंबाने नेहमीच आधार दिला. कुटुंबाच्या आधारामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले.
माझ्या घरच्यांपुढे माझ्यापेक्षा अधिक आव्हाने होती. कारण माझ्या समाजात मुलींचे लग्न लवकर लावून दिले जातात आणि त्यामुळे क्वचितच मुलींना उच्चशिक्षिण घेता येते. यामुळे माझ्या कुटुंबाला खूप टोमणे ऐकावे लागले. तरीही घरच्यांनी माझे शिक्षण बंद केले नाही. त्यामुळे मी त्यांची कायमच ऋणी राहील.”
हबीबा पुढे म्हणते, “माझे वडील इमाम असल्याने त्यांना दीनबद्दल पुरेपूर माहिती आहे. कुराणच्या पहिल्या साकाशात्कारातच ‘इकरा’ म्हणजेच शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे धार्मिक वृत्तीच्या माझ्या वडिलांना कुराणच्या या संदेशाचे पालन केले. त्यांनी मला कधीच शिक्षणापासून वंचित ठेवले नाही, उलट त्यांनी मला पाठींबा दिला. त्यांच्याच सहकार्यामुळे मी आज ही उंची गाठली आहे. त्यांचा पाठींबा नसता तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते.”
हबीबाला मिळालेल्या यशानंतर तिचे वडील मोहम्मद अहमद बुखारी भारावून गेले. आपल्या मुलीविषयी भावूक स्वरात ते म्हणतात, “आपल्या मुलांनी मोठं यश संपादन करावं, मोठ्या पदावर जावं असं प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं. मुलांनी मेहनत घेतली तर त्यांना यश मिळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. माझ्या लेकीनेही अतोनात मेहनत घेतली आणि म्हणून ती या उंचीवर येऊन पोहोचली आहे. न्यायाधीश पद हे प्रतिष्ठित आणि महत्वाच्या पदांपैकी एक आहे, दोषीला शिक्षा अन् निर्दोषाला योग्य तो न्याय देण्याची हबीबाची जबाबदारी आहे. शोषितांना योग्य न्यायदानाचे काम करावे.”
हबीबाचे वडील पुढे म्हणतात, “मुलींचे शिक्षण बंद करून त्यांना घरात बसवू नका किंवा लग्न लावून देऊ नका. हेच मी माझ्या समाजातील पालकांना सांगू इच्छिते. मुलींना शिक्षण घ्यायचे असेल तर घेऊ द्या आणि त्यांना पुढे जाऊ द्या. मुली या मुलांपेक्षा कमी नसतात हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. उलट मुली मुलांपेक्षा हुशार असतात. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आहे त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही राहावे.”
अलिगड विद्यापीठातून घेतले वकिलीचे शिक्षण…
हबीबाचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंगेरमध्ये झाले. अलिगड विद्यापीठातून तिने इंटरमिजिएट आणि वकिलीचे शिक्षण घेतले. २०२० ला तिने वकिलीची पदवी मिळवली. त्यानंतर तिने उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली. हबीबा म्हणते, “वकिलीची पदवी घेईपर्यंत मी न्यायिक सेवा परीक्षा देण्याचा विचारही केला नव्हता. कारण तोपर्यंत इंटरनेटवर पुरेशी माहितीही उपलब्ध नव्हती आणि त्याच काळात कोरोना महामारी सुरु झाली आणि मला घरी जावे लागले. घरी गेल्यानंतर मी त्या रिकाम्या वेळेत मी परीक्षेविषयी माहिती घेतली आणि मग ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. हा अभ्यास सुरु केल्यानंतर मनात नेहमी भीती असायची की माझी निवड नाही झाली तर पुढे काय करायचे. त्यामुळे मी प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला होता. आपल्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर आपण स्पर्धापरीक्षांची तयारी कधीही सुरु करू शकतो.”
ती पुढे म्हणते, “मला अनेक लोक विचारतात तू तुझ्या वर्गातील टॉपर होतीस का? पण असं काहीही नाही. फक्त अभ्यासात सातत्य असायला पाहिजे. दिवसातील किती वेळ कोणत्या गोष्टीला द्यायचा याचे नियोजन आधी जमले पाहिजे, जेणेकरून अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो. आपल्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते आणि ते मी करून दाखवले.”
समाजात शिक्षणाच्या बाबतीत जनजागृती निर्माण करण्याचे हेतून हबीबा शेवटी म्हणते, “समाजाला मी हाच संदेश देऊ इच्छिते की, आजच्या जगात शिक्षण खूप महत्वाचे आहे. मुलगा-मुलगी हा भेद न करता त्यांच्या साक्षरतेवर भर दिला पाहिजे. कारण शिक्षणामुळेच आपण समाजात आपले स्थान निर्माण करू शकतो. समस्त पालकांना मी हेच सांगेन की आपल्या पाल्यांना व्यवस्थित शिक्षण द्या. समाज काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या मुलांच्या कौशल्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या.”
आज मुली पिढीतील मुली शिक्षणाच्या ओढीने कुटुंबीय, समाज आणि धार्मिकता या सगळ्यांशी झगडत शिक्षणाची वाट धरत आहेत. आज मुस्लीम मुली अनेक सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करत उच्च शिक्षण घेत आहेत, इतकेच नव्हे तर त्यात प्राविण्यही मिळवत आहेत. यामध्ये त्या मुस्लीम मुलांच्या पुढे असल्याचे दरवर्षी प्रदर्शित होण्याचे यशस्वीतांच्या यादीत दिसून येते. हबीबाच्या पालकांप्रमाणे इतर पालकांनी सुद्धा आपल्या मुलामुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले तर घरात बसलेल्या कित्येक हबीबा आज अनेक मुख्य पदांवर बसून कारभार सांभाळतील. हबीबाच्या या यशाने मुस्लीम मुलींना आणि त्यांच्या पालकांना प्रोत्साहन मिळेल.