भक्ती चाळक
यावेळी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघाच्या आखाड्यात २१ उमेदवार उतरले आहेत. प्रमुख पक्षांपैकी महायुतीतील भाजपचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्यातच झुंज रंगणार आहे. तर इतर लहानमोठे पक्ष देखील आपल्या पद्धतीने जोरदार प्रयत्न करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. याठिकाणी २०२३च्या पोटनिवडणुकीत मतदारांची संख्या ५,६६,४१५ इतकी होती. मतदारसंघ जेवढा मोठा तेवढ्या अधिक नागरी समस्या. याठिकाणी विशेषतः अल्पसंख्यांक समुदायाच्या समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. इतर मतदारसंघांप्रमाणेच इथेही अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांबद्दल मोठी उदासीनता दिसून येते.
अल्पसंख्यांकांमध्ये येणाऱ्या मुस्लिमांची लोकसंख्या महाराष्ट्रात ११.५ टक्के आहे. ज्यापद्धतीने मुस्लीम मतदार गरजेचा आहे त्याचपद्धतीने या समाजाचे प्रतिनिधित्व देखील गरजेचे आहे. परंतु राज्यातील १० पैकी एक मतदार हा मुस्लीम असतानाही मुस्लीम प्रतिनिधित्वाची राज्य विधानसभेत अत्यंत विदारक अशी स्थिती आहे. विधानसभेत आज फक्त १० मुस्लीम सदस्य आहेत. २०१४-२०१९ काळच्या विधानसभेत हा आकडा ९ असा होता. विधान परिषदेत तर सद्यास्थितीला फक्त एक मुस्लीम प्रतिनिधी आहे.
लोकशाहीला सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या तुलनेने प्रतिनिधित्व मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. यानुसार मुस्लीम समाज देखील यंदा निवडणुकीत सक्रीय सहभाग घेताना दिसत आहेत. विविध पक्षांकडून तसेच काही ठिकाणी अपक्ष म्हणून मुस्लीम उमेदवार निवडणुका लढवत आहेत. त्यापैकीच एक आहेत सिद्दिक शेख. अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातून सिद्दिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुभाषचंद्र बोस यांच्या ऑल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक पार्टीच्या वतीने ते सिंह या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
सिद्दिक शेख यांच्याविषयी…
सिद्दिक शेख हे पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत. त्याच क्षेत्रात ते फॉर्मवर्क इंजीनियरिंगचा व्यवसाय करतात. वाकड परिसरातील अण्णाभाऊ साठे नगर येथील झोपडपट्टीत वाढलेल्या सिद्दिक यांचे कुटुंब बीड जिल्ह्यातून साधारण १९९२ च्या दरम्यान उपजीविकेसाठी पुण्यात स्थायिक झाले. सिद्दिक यांचे प्राथमिक शिक्षण नागु बारणे या शाळेतून तर, माध्यमिक शिक्षण थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातून झालेले आहे. उच्च शिक्षित असलेल्या सिद्दिक यांना सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड होती.
या आवडीतूनच सिद्दिक यांनी २०१५ मध्ये ‘अपना वतन’ संघटना सुरु केली आणि त्या माध्यमातून आपल्या समाज कार्याची सुरुवात केली. या संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात केलेल्या कार्याच्या बळावर ते राजकीय आखाड्यात उतरले आहेत. समाजसेवक म्हणून त्यांनी वातानुकूलित कार्यालयात बसून काम केले नाही, तर प्रत्यक्ष समाजात वावरून गरिबी, बेरोजगारी, सार्वजनिक स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण, प्रदूषण, जंगलतोड, ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच आदी विविध स्तरांवर काम करत आहेत.
भारतीय समाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने सामाजिक-धार्मिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने ते काम करत आहेत. सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी शिबिरे, आंदोलने, उपोषणे, व्याख्याने, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणे अशा पद्धतीचे उपक्रम संस्थेच्या मार्फत ते राबवत आहेत. विशेष म्हणजे या माध्यमातून त्यांचा सर्वपक्षीय नेत्यांशी आणि परिसरातील सामाजिक संघटनांशी तसेच तळागाळातील लोकांसोबत चांगला जनसंपर्क तयार झाला आहे.
सिद्दिक शेख यांनी परिसरात राबवलेले काही सामाजिक उपक्रम
पिंपरी चिंचवड शहरात समाजासाठी काम करत असताना सिद्दिक यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी शहरातील विविध भागांमध्ये ‘बेटी बचाव अभियान’, वयोवृद्धांसाठी ‘प्रौढ साक्षरता अभियान’ राबवले. शहरात वाढती गुन्हेगारी पाहता ‘गुन्हेगारी मुक्त शहर अभियान’ देखील राबवले आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी ‘मिशन भाईचारा अभियान’, तसेच लोकांसाठी प्रबोधनपर शिबिरे त्यांनी घेतली आहेत. त्या भागातील झोपडपट्टी परिसरामध्ये संविधान कार्यशाळा, तसेच कौटुंबिक हिंसाचार व घटस्फोटित पीडितांसाठी आधार शिबीरेसुद्धा त्यांनी राबवली आहेत.
पिंपरी चिंचवडमधील नागरी समस्यांवर वाचा फोडत सिद्दिक यांनी पत्रव्यवहार, धरणे आंदोलन आणि मोर्च्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळवून दिला आहे. अण्णाभाऊ साठेनगर मधील रस्त्याचे काम, कसाई बांधवांच्या पुनर्वसनसाठी प्रयत्न, वाकड परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन, वाहतूक कोंडी, पिंपरी चिंचवडच्या झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आंदोलन, पिंपरी शहरातील वाढती गुन्हेगारी व पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागणीसाठी त्यांनी उपोषणही केले होते.
भ्रष्ट कारभाराविरोधात पिंपरी महापालिकेवर अनेकदा नेलेले मोर्चे, शहरातील अवैध धंद्याविरोधात अनेक प्रकारची आंदोलने, मटका मोर्चा, 'हप्ता दो', 'लाच दो' यासारख्या आंदोलनांसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर 'चाय पाणी' मोर्चा नेऊन त्यांनी भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.
जनतेची सेवा करणे, त्यांचे कल्याण करणे, त्यांना सुविधा देणे हे राजकारण्यांचे आद्य कर्तव्य आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना समान न्याय मिळवून देणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मात्र तसे होताना सहसा दिसत नाही. समाजातील कोणत्याच घटकावर अन्याय अत्याचार होणार नाही, जातीय धर्मीय भावना भडकणार नाही याचे भान ठेवून आणि समतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे सिद्दिक शेख सांगतात.
आवाज मराठीशी बोलताना ते म्हणतात, “जनतेला त्यांच्या उमेदवाराकडून काही अपेक्षा असतात. योग्य नेतृत्व, पारदर्शकता, प्रामाणिकता आणि जनतेच्या हिताचे कार्य करणारा उमेदवार त्यांना अपेक्षित असतो. जनतेच्या याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी अपना वतन संघटनेच्या माध्यमातून मतदार संघातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.”
ते पुढे म्हणतात, “शहर वाढतंय परिसर वाढतोय पाण्याचा नियोजन होत नाहीये. टँकर माफिया मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तिसरा प्रश्न आहे कचरा. कचऱ्याने आपले आरोग्य, शहर बकाल होत आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे कचऱ्याचा विघटन केलं पाहिजे, व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जनता गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त आहे म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.”
सिद्दिक पुढे म्हणतात, “भारत देश हा सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्रित पुढे घेऊन जाणारा देश आहे. परंतु काही जातीयवादी शक्तींकडून हा धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत आहे. ती अबाधित राहावी यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे.”
कुठे नाव, कुठे काम तर कुठे केवळ पक्षाचा झेंडा दाखवित मतदारांकडे मतांची मागणी करण्यात अनेक उमेदवार व्यस्त आहेत. मतांचा हा जोगवा मागताना तोंडभरून आश्वासने देताना उमेदवार थकत नाहीत. निवडणुकीपूर्वी सादर केले जाणारे जाहीरनामे बऱ्याचदा कागदापुरते मर्यादित राहतात. परंतु सिद्दिक यांनी मात्र त्यांच्या कामांचा जाहीरनामा जनतेपुढे मांडलाच परंतु कामाला सुरुवात केल्याचे ते सांगतात. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून मतदार त्यांच्या मागे उभे राहणार का… ते उभे राहिल्याने मतदार संघातील राजकीय समीकरण कसे बदलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- भक्ती चाळक