पूजा नायक
संगीताला कोणत्याही जाती किंवा धर्माच्या बंधनात अडकवता येत नाही. त्याला एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व जपणारे लोक समाजात आहेत. धर्माच्या पलीकडे जाऊन संगीतालाच धर्म मानत धर्माच्या भिंती ओलांडणाऱ्या असंख्य संगीतकारांनी भारतीय संगीतात मोठे योगदान दिले आहे. यातीलच एक नाव म्हणजे शंकर आणि शंभू हे दोघे बंधू.
उत्तरप्रदेशमधील अलीगड येथील चांदौसी/दरियापूर येथे दोघांचा जन्म झाला. जन्मजातच तालाचा सहवास लाभलेल्या शंकर यांना वयाच्या सातव्या तर शंभू यांना पाचव्या वर्षापासूनच वडिलांकडून संगीताचे धडे मिळायला लागले. चुन्नीलाल उस्ताद हे शास्त्रीय संगीताचे उत्तम गायक होते. त्यावेळी ते उत्तरप्रदेश मध्ये ५० जणांचा एक थिएटर ग्रुपही चालवतही. संगीताचे मुलभूत शिक्षण त्यांनी वडिलांकडूनच घेतले. पुढे दिल्ली घराण्याचे उस्ताद चांद खान साहिब यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. मुख्यतः रियाज आणि गायकीविषयी शंकर आणि शंभू या बंधूंना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या सांगीतिक प्रवासातच शंकर आणि शंभू यांची भेट शारिक इरायनी आणि कमर सुलेमानी या शायरांशी झाली. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उर्दू, अरबी आणि पर्शियनचे धडे गिरवले.
शंकर आणि शंभू यांचा हा संगीत शिक्षणाचा प्रवास सुरु होता. त्यावेळी शंकर आणि शंभू यांनी आता गझल, कव्वाली आणि सुफियाना कलाम गायला सुरुवात करावी, असा सल्ला या दोन शायरांनी दिला. गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून दोन्ही बंधूंनी हे कलाप्रकार हाताळायला सुरुवात केली आणि ते मैफिलींमध्ये गाऊ लागले.
एके दिवशी कानपूरमधील हजरत सूफी साहब दर्गा शरीफच्या प्रमुखांनी त्यांना अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसामध्ये आपली कला सादर करण्याचे सुचवले. त्यांच्या सूचनेप्रमाणेदोघे बंधू अजमेर शरीफमध्ये दाखल झाले.मात्र पदरी फारसा अनुभव नसल्यामुळे त्यांना आपली कला पेश करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी निराशा झाली असली तरी ख्वाजांच्या दरबारात गायचंच असा दोघांनी निर्धार केला.
अजमेरच्या दर्गाहमध्ये गाण्याची संधी मिळत नाही तोवर अन्न-पाणी त्यागण्याचा शंकर यांनी निर्णय घेतला. तीन दिवस अन्न-पाण्याविना उलटून गेले. चौथ्या दिवशी दर्गा शरीफच्या व्यवस्थापनाला याची माहिती मिळाली. शंकर यांच्या जिद्दीचा मान ठेवत उरुसाच्या शेवटच्या दिवशी मेहफिल खानामध्ये काला सादर करण्याची संधी दोन्ही भावांना देण्यात आली.
दोन्ही भावांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी कार्यक्रमासाठी मोठी तयारी केली. मेहफिलमध्ये त्यांनी 'मेहबूबे किबरिया से मेरा सलाम कहना' ही पैगंबर मुहम्मद यांची स्तुती करणारी कव्वाली गायली. त्यावेळी मेहफिल खान्यात उपस्थित असलेले सर्वजणच त्यांच्या गायनाने मंत्रमुग्ध झाले. उपस्थितांपैकी अनेकांचे डोळे पाणावले. त्या दिवशी शंकर आणि शंभू यांना "कव्वाल" ही पदवी बहाल करण्यात आली. हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या आशीर्वादाने 'शंकर शंभू कव्वाल' म्हणून नावारूपास आल्याची या दोन्ही बंधूंची श्रद्धा होती.
शंकर आणि शंभू यांनी दर्गाहमध्ये कव्वाली सादर केली तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध सिने दिग्दर्शक मेहबूब खानही उपस्थित होते. या जोडीच्या गायनाने तेही मोहित झाले. महबूब खान यांनी दोन्ही बंधूंची भेट घेतली आणि त्यांना मुंबईतील स्टुडिओच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले.
मेहबूब खान यांच्या निमंत्रणावरून शंकर आणि शंभू मुंबईत आले.उद्घाटनावेळी मेहबूब यांनी शंकर आणि शंभू यांना कव्वाली सादर करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन दोघांनीही अप्रतिम कव्वाल्या गायल्या. उपस्थितांनी त्यांच्या गायनाला भरभरून दाद दिली. संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीने त्यांच्या पाठीवर शाबाशकीची थाप दिली.
या कार्यक्रमातील शंकर-शंभू यांच्या गायनाची संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला दखल घ्यावी लागली. दोन्ही भावांकडे गायनासाठी मोठी विचारणा होऊ लागली. मग दोघांनी मुंबईतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे ते मुंबईत स्थायिक झाले.
कव्वाली गायक म्हणून ते हळूहळू सिनेक्षेत्रात नावारूपाला येऊ लागले. त्यांनी ‘आलम आरा’, ‘तीसरी कसम’, ‘बरसात की रात’, ‘प्रोफेसर और जादूगर’, ‘शान-ए-खुदा’, ‘मेरे दाता गरीब नवाज’, ‘तीसरा पत्थर’ ‘बेगुनाह कैदी’, ‘लैला मजनू’, ‘बादल’, ‘तुम्हारा कल्लू’, ‘मंदिर-मस्जिद' यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यांची अनेक गाणी प्रचंड गाजली.
धर्माने हिंदू असूनही कव्वाली या इस्लामी गायनप्रकरात त्यांनी आपली छाप सोडली. बहुदा ते त्यावेळचे एकमेव हिंदू कव्वाल असावेत. 'सुफियाना कलाम' म्हणजेच कव्वाली गायानाला त्यांनी प्राधान्य दिले असले तरी भजने, माता की भेंटें, गुरबानी, साई भजने या गायन प्रकारांवरही त्यांची जबरदस्त पकड होती.त्यांनी फक्त सुफियाना कलाम गाणे पसंत केले. सुफियाना कलामांपेक्षा त्यांना भजने, माता की भेंटें, गुरबानी, साई भजने इत्यादी विविध प्रकारातील गायनांवर त्यांची जबरदस्त पकड होती आणि अनुभवही.ते आठ भाषांमध्ये अस्खलित गाणी गायचे.
‘ख्वाजा पासंद’, ‘फनाफिल मोईन,’ ‘कौमी एकता के प्रतीक’, ‘शहेनशाह-ए-कव्वाल’ यांसारख्या अनेक पदव्यांनी शंकर-शंभू यांना गौरवण्यात आले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपल्या गायनाने त्यांनी वाहवा मिळवली. ते सर्व जाती-धर्मातील लोकांच्या गळ्याचे ताईत बनले.
१० मार्च १९८४ रोजी राजस्थान येथून एक कार्यक्रम करून परताना गुजरात येथे कार अपघातात शंकर यांचे निधन झाले. शंकर यांच्या मृत्युनंतर अवघ्या पाचच वर्षांनी, म्हणजे ५ फेब्रुवारी १९८९ रोजी शंभू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शंकर आणि शंभू यांच्या पुढच्या पिढीने कलेचा वारसा जपला आहे. शंकर यांचा मुलगा राम आणि शंभू यांचा मुलगा राकेश यांनी गायनाची परंपरा पुढे सुरु ठेवली आहे. शंकर-शंभू यांनी गायलेल्या कव्वाल्या YouTube वर आजही लोकप्रिय आहेत. धर्माच्या भिंती अधिक मजबूत होत असण्याच्या आजच्या काळात तर अशा जोडीची कधी नव्हे इतकी गरज आहे.
या महान जोडीला आवाज मराठीचा सलाम!
-पूजा नायक