ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ सय्यद वाजिह नक्वी राष्ट्रीय विज्ञान श्री पुरस्काराने सन्मानित

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 23 d ago
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ सय्यद वाजिह नक्वी
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ सय्यद वाजिह नक्वी

 

फजल पठाण 
 
विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे. यावर्षी राष्ट्रपति भवनात गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील ३३ शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी एका नावाने सर्वांचे लक्ष वेधलं ते नाव होत डॉ. सय्यद वाजिह अहमद नक्वी यांचं. प्रो. नक्वी यांच्या वैज्ञानिक प्रवासाविषयी आणि त्यांनी केलेल्या संशोधानाविषयी माहिती देणार हा लेख... 

प्रा. नक्वी हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट जैव-रासायनिक समुद्रशास्त्रज्ञ आहेत. सय्यद वाजिह अहमद नक्वी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा या ठिकाणी झाला. नक्वी यांनी त्यांचे शालेय शिक्षण अमरोहा आणि बरेली तर उच्च शिक्षण लखनौमधून प्राप्त केले. १९७४  मध्ये त्यांनी लखनौ विद्यापीठातून एम.एस्सी, भौतिक रसायनशास्त्रात पदवी घेतली. पदवी मिळवल्यानंतर नक्वी यांनी गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) येथे संशोधन करण्यासाठी CSIR कनिष्ठ संशोधन फेलोशिप मिळवली. तेव्हापासून नवकी हे एनआयओमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. अनेक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्यानंतर आज ते संस्थेचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. 

शास्त्रज्ञ सय्यद वाजिह अहमद नक्वी यांना गुरुवारी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या सेवांचे कौतुक करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांचा गौरव केला. 

नक्वी यांच्या संशोधन कारकिर्दीची सुरुवात
सुरुवातीच्या काळात नक्वी यांना डॉ. आर. सेन गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवकी यांनी  १९८७ मध्ये पुणे विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी घेतली. यांनातर ते राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत (NIO) सामील झाले. या ठिकाणी ते अजूनही वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत. १९९०- ९१ मध्ये त्यांनी रमन रिसर्च फेलो म्हणून काम केले. 

शास्त्रज्ञ म्हणून प्रो. नक्वी यांचे कार्य  
नक्वी यांचे संशोधन अरबी समुद्रातील ऑक्सिजन मिनिमम झोन (OMZ) मध्ये जैविक दृष्ट्या-मध्यस्थ रासायनिक परिवर्तनांवर केंद्रित होते. हे संशोधन या पूर्वी कोणीही केले नव्हते. नक्वी यांनी संशोधनाच्या माध्यमातून जलस्तंभात मोठ्या प्रमाणात विनायट्रिफिकेशन (N2 आणि N2O मध्ये नायट्रेटचे सूक्ष्मजंतू घट) साठी निर्णायक असे पुरावे दिले. या संशोधनातून जलस्तंभाची अवकाशीय मर्यादा आणि ऐहिक परिवर्तनशीलता निश्चित केली. 

प्रो. नक्वी यांनी विविध नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करून पाण्यातील निर्जंतुकीकरणाचे प्रमाण ठरवले. या संशोधनातून त्यांनी अरबी समुद्र हे जगातील सर्वात मोठे महासागरीय विनायट्रीकरण साइट आहे हे दाखवून दिले. हे विनायट्रीकरण जागतिक जल स्तंभाच्या विघटनीकरणाच्या किमान एक तृतीयांश भाग आहे. त्याच्या संशोधनानुसार पूर्व पॅसिफिक महासागराच्या विरूद्ध, हिंद महासागरात उत्तरात सर्वाधिक प्राथमिक उत्पादनाचे क्षेत्र आणि सर्वात तीव्र विनायट्रीकरण भौगोलिकदृष्ट्या वेगळे केले आहे. 

यानंतर नक्वी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सागरी क्षेत्रातून विविध नायट्रोजन प्रजातींमधील नैसर्गिक विपुलतेवर पहिला सर्वसमावेशक डेटा तयार केला. या महितीतून त्यांनी सागरी नायट्रोजन सायकलिंगला नवीन र्दृष्टी दिली.  

प्रो. नक्वी यांनी उत्तर हिंद महासागरातील सागरी जैव-रसायनशास्त्रावरील जागतिक बदलांच्या परिणामांची तपासणी करण्याचा एक भाग म्हणून कार्बन डायऑक्साइड (CO₂), नायट्रस ऑक्साईड (NO) आणि मिथेन (CH)) यांच्यावर मोठे काम केले आहे. 

डॉ. नक्वी यांनी भारतातील गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचा (भूजल, नैसर्गिक तलाव आणि मानवनिर्मित जलाशय) अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून धरणांमध्ये तुलनेने मध्यम युट्रोफिकेशन असतात हे दिसून आले. या पूर्वी भारतातील धारणांमध्ये मिथेन उत्सर्जन सर्वात जास्त असल्याचे मानले जायचे. परंतु नवकी यांच्या अभ्यासानंतर भारतीय धरणांमधून मिथेन उत्सर्जन कमी असल्याचे समजले. 

डॉ. नक्वी यांचे एनआयओमध्ये जैव-रसायनशास्त्र गट हा गेल्या काही वर्षात जगातील सर्वोत्तम गटांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. या प्रक्रियेत त्यांनी विविध अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या आहेत. यांपैकी अनेक सुविधा विविध देशात कुठेही उपलब्ध नाहीत. तसेच नक्वी यांनी भारत आणि परदेशातील शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये उच्च पदांवर विराजमान असलेल्या तरुणांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले आहे. शिवाय त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांचे नेतृत्वही केले आहे. 

विविध संस्थांमध्ये केले काम 
नक्वी यांनी ५० हून अधिक संशोधन मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक मोहिमांमध्ये त्यांनी मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले. नक्वी हे अंटार्क्टिकाच्या तिसऱ्या भारतीय मोहिमेचे सदस्य होते. या मोहिमे अंतर्गत त्यांनी बर्फाळ खंडात पहिले कायमस्वरूपी स्थानक स्थापन केले. 

डॉ. नक्वी यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, यूएसए (रमन रिसर्च फेलो म्हणून); इन्स्टिट्यूट फॉर हायड्रोस्फेरिक- ॲटमॉस्फेरिक सायन्सेस, नागोया युनिव्हर्सिटी, जपान (व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून); सेंटर फॉर ट्रॉपिकल मरीन इकोलॉजी, ब्रेमेन, जर्मनी (हॅन्से विसेनशाफ्ट कोलेग फेलो म्हणून); आणि मॅक्स-प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मरीन मायक्रोबायोलॉजी, ब्रेमेन (मेरी क्युरी फेलो म्हणून) काम केले आहे. नवकी हे सध्या वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशन, वुड्स होल, यूएसए येथे सहायक वैज्ञानिक म्हणून आपली सेवा देत आहेत.

डॉ. नक्वी यांनी संयुक्त राष्ट्र पॅनेल आणि अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजन समित्यांसह मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम केले आहे. इंटरनॅशनल जिओस्फीअर-बायोस्फीअर प्रोग्राम (IGBP) आणि सायंटिफिक कमिटी ऑन ओशन रिसर्च (SCOR) च्या अनेक महासागर संबंधित प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते सध्या कार्यकारी समितीचे आणि SCOR च्या अनेक कार्यकारी गटांचे सदस्य आहेत. ते आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे संपादन, मरीन बायोलॉजी आणि एक्वाटिक बायोलॉजीच्या संपादकीय मंडळावर आणि जैव भूविज्ञानाचे संपादक-इन-चीफ म्हणूनही कार्यरत आहेत.

२०१४ ते २०१६ या कालावधीत OSI अध्यक्ष म्हणून नक्वी यांनी काम पाहिले. शिवाय भारतीय सागरी शास्त्रज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे माजी संचालक म्हणूनही नक्वी यांनी काम केले. एकंदरीतच त्यांनी समुद्रातील पाण्याचे रसायनशास्त्र, जैव-रसायनशास्त्र आणि सजीवांच्या रासायनिक संवादावर आणि गोड्या पाण्यातील परिसंस्थेवरही संशोधन केले.   

विविध पुरस्कारांचे मानकरी प्रो. नक्वी 

राष्ट्रीय विज्ञान श्री पुरस्कार
समुद्राच्या पाण्याचे रसायनशास्त्र, जैव-रसायनशास्त्र, सजीवांचे रासायनिक परस्परसंबंध आणि गोड्या पाण्यातील परिसंस्था या क्षेत्रातील योगदानाबद्दल पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान श्री पुरस्कार २०२४ हा पुरस्कार नक्वी यांना प्रदान करण्यात आला.   

राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 
राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार २०१८ देशातील २२  शास्त्रज्ञांना भूविज्ञान, खाणकाम आणि संबंधित क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात आला. त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते  सय्यद वाजिह अहमद नक्वी यांना मिळाला. 

उत्कृष्टतेचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून प्रा. सय्यद वाजिह अहमद नक्वी यांना जलीय जैव-रासायनिक संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जागतिक योगदानाबद्दल उत्कृष्टतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महासागर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय पुरस्कार
प्रो. नक्वी यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, भूविज्ञान मंत्रालयाने २०१३ मध्ये महासागर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. 

इतर पुरस्कार 

सय्यद वाजिह अहमद नक्वी यांना १९८७ मध्ये CSIR यंग सायंटिस्ट अवॉर्ड, १९८९ मध्ये MAAS यंग सायंटिस्ट अवॉर्ड, १९९६ मध्ये मानाचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार यांसह त्यांना विविध पुरस्कार देण्यात आले आहेत.   

गेल्या  तब्बल ३७ वर्षांपासून  समुद्रशास्त्रज्ञ म्हणून सय्यद वाजिह अहमद नक्वी यांनी विविध मोहिमांमध्ये मोठे योगदान दिले. आजही देत आहेत. आपल्या कार्याप्रती समर्पित राहिलेल्या प्रो. नक्वी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणे हा त्यांच्या उज्ज्वल कारकीर्दीचा गौरव आहे.
 
- फजल पठाण 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter