प्रा. सुहेल साबीर यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी दिली ५० लाखांची देणगी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
 शिष्यवृत्तीची देणगी देताना प्रो. सुहेल साबीर
शिष्यवृत्तीची देणगी देताना प्रो. सुहेल साबीर

 

प्राध्यापक सुहेल साबीर यांनी सेवा निवृत झाल्यानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ५० लाख रुपये एन्डॉमेंट फंड म्हणून दिले आहेत. एन्डॉमेंट फंड हा माजी विद्यार्थी आणि मान्यवरांच्या देणगीतून तयार करण्यात येतो. सुहेल साबीर यांनी दिलेला ५० लाखांचा फंड एखाद्या प्राध्यापकाने त्याच्या सेवानिवृत्तीतून मिळालेल्या लाभाचा काही भाग विद्यापठातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याची ही पहिलीच घटना आहे. 

डॉ. सुहेल साबीर म्हणतात, विद्यापीठ आणि समाजाने मला जे दिले त्याची  परतफेड करण्याच्या उद्देशाने माझे हे एक पाऊल आहे. महत्त्वाचे म्हणजे, माझी ही कृती एएमयूशी असलेल्या माझ्या भावनिकतेतून झाली आहे.  

या कृतीच्या माध्यमातून सुहेल साबीर यांचा एएमयूचे संस्थापक सर सय्यद अहमद यांना आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. एएमयूचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी संघर्ष करून मुस्लिमांसाठी विद्यापीठाची नीव ठेवली होती.  
    
प्रोफेसर सुहेल साबीर आवाज-द व्हॉईसशी बोलताना म्हणतात, “ या एन्डॉमेंट फंडमुळे विद्यापीठातील विद्यार्थी आनंदी होतील. विद्यापीठातील गरजूंच्या शिष्यवृत्ती वाटपावर देखरेख ठेवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.”  

प्रोफेसर सुहेल साबीर यांनी एन्डॉमेंट फंडच्या ५० लाख रुपयांचा चेक विद्यापीठाचे वित्त अधिकारी प्रा.एम.मोहसीन खान केके यांच्याकडे दिला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत हा चेक स्वीकारला त्याबबद्दल सुहेल साबीर यांनी विद्यापीठाचे आभार मानले. प्रो. सुहेल साबीर यांना आशा आहे की त्यांचे हे कृत्य अलिगढ मधील इतर निवृत्त प्राध्यापकांनाही प्रेरित करण्यास मदत करेल. 

"ज्या शिक्षण संस्थेने आपल्यावर संस्कार केले, आपल्याला घडवले त्या सर्वांनी अशा गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला हवा. यासाठी पुनः विद्यापीठाशी जोडले जाणे हाच  सर्वोत्तम मार्ग आहे.” 

आवाज-द व्हॉईसशी बोलताना प्राध्यापक सुहेल साबीर यांचे कौतुक करताना शफी किडवई म्हणतात, “सुहेल साबीर यांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. विद्यापीठाच्या शिक्षकांनी एन्डॉमेंट फंडात प्रथमच मोठी रक्कम दान केली आहे. सुहेल यांचे हे कृत्य सर सय्यद अहमद खान यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे, ज्यांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच, त्यांना आर्थिक मदत देण्यावर भर दिला. प्राध्यापक सुहेल साबीर यांनी आजवर जे केले आहे ते इतर कोणत्याही प्राध्यापकाने केलेले  नाही.”

अलीगढमध्ये ७० वर्षे घालवलेल्या इब्न सिना अकादमी ऑफ मेडिव्हल मेडिसिन अँड सायन्सेसचे हकीम सय्यद झुलुर रहमान म्हणतात की, “एखाद्या शिक्षकाने गरजू विद्यार्थ्यांसाठी एवढी मोठी रक्कम दान केल्याचे मी कधीच पाहिले नाही.”

एएमयूचे प्राध्यापक शफी किडवई म्हणतात, “प्राध्यापक सुहेल साबीर हे एक जबाबदार आणि संवेदनशील शिक्षक आहेत. सुहेल गरजू विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग द्यायचे. मी चांगला की वाईट या प्रश्नावर ते विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला सांगायचे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना पोस्टकार्डद्वारे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली आहे. सुहेल यांच्यासारखे शिक्षक दुर्मिळच आहेत."

पुढे ते म्हणतात, “प्रोफेसर साबीर हे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे ‘माजी विद्यार्थी संघटने’मध्ये होते. तेव्हापासून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली आहे. सुहेल यांनी केवळ आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनच दिले नाही तर प्रत्येकवेळी मार्गदर्शन देखील केले आहे. सुहेल साबीर हे विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय होते.”

प्रख्यात लेखक डॉ. असद फैसल फारुकी यांनी आवाज-द व्हॉईसला सांगितले की, “प्रोफेसर सोहेल साबेर यांच्या कृतीने सर्वांसमोर दातृत्वाचे उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या अध्यापनाच्या काळात ते विद्यार्थ्यांचे मदतनीस होते, ते त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करत असत. सुहेल यांचे कार्य एएमयूचे संस्थापक सर सय्यद यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे."

पुढे ते म्हणतात, “प्राध्यापक सुहेल साबीर यांचे वडीलही विद्यापीठ आरोग्य केंद्राशी संबंधित होते. विद्यापीठाशी असलेले पिढ्यानपिढ्याचे नाते सुहेल यांच्या निर्णयातून दिसून येते. एएमयूला देश आणि परदेशात राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु शिक्षकांमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी ही आवड दाखवली आहे.”

प्रोफेसर सुहेल साबीर हे मूळचे उत्तर प्रदेश मधील बाराबंकीचे आहेत. त्यांचे शिक्षण अलीगढमध्ये झाले. त्यांनी एएमयूमधून रसायनशास्त्रात पीएचडी देखील केली. यानंतर प्रा. सुहेल साबीर १९९३ मध्ये या विद्यापीठात लेक्चरर म्हणून रुजू झाले आणि २०१५ मध्ये ते प्रोफेसर झाले.

एंडॉवमेंट फंड हा एक गुंतवणूक पोर्टफोलिओ आहे ज्याचे प्राथमिक भांडवल देणग्यांमधून येते. चर्च, रुग्णालये आणि विद्यापीठे यासारख्या धर्मादाय आणि ना-नफा संस्थांना निधी देण्यासाठी एंडॉवमेंट फंड स्थापित केले जातात. एंडॉवमेंट फंडांना करमुक्त देणग्या दिल्या जातात. 
 
एंडॉवमेंट फंड सुरुवातीला समाजसेवेसाठी देणगीदारांकडून गुंतवले जातात. यासाठी गुंतवणूकदारांकडून सहसा  ट्रस्ट स्थापित केले जातात. ट्रस्टमुळे एंडॉवमेंट फंड (देणगी) कोणत्याही एका संस्थेपासून स्वतंत्र राहतो. एन्डॉवमेंट फंडामध्ये रोख, इक्विटी, बाँड आणि इतर प्रकारच्या सिक्युरिटीज असतात ज्या गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवू शकतात.

एंडॉवमेंट फंड आणि सामान्य गुंतवणूक निधी उदा म्युचुअल फंड यांच्यातील मुख्य फरक म्हणजे एंडॉवमेंट फंडचा लाभार्थी ना-नफा ना तोटा या तत्त्वावर चालतो. तर सामान्य गुंतवणूक निधीत व्यक्तिगत गुंतवणूकदार असतात. सामान्यतः एंडॉवमेंट फंडची मुख्य मूल्य सुरक्षित ठेवला जातो. तर गुंतवणूक उत्पन्न काही विशिष्ट उद्दिष्टांसाठी वापरले जाऊ शकते.

अनुवाद फजल पठाण 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter