शिया इस्माईली मुस्लिम समुदायाचे ४९वे वंशपरंपरागत इमाम आणि आगा खान विकास नेटवर्कचे (AKDN) संस्थापक, हिज हायनेस प्रिन्स करीम अल-हुसैनी, आगा खान चतुर्थ यांचे मंगळवारी लिस्बन येथे निधन झाले. ते ८८वर्षांचे होते.
१९५७मध्ये आजोबा आगा खान तृतीय यांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी आपल्या करीम आगा खान यांनी इस्माईली मुस्लिमांच्या आध्यात्मिक नेत्याचे पद स्वीकारले.
आपल्या आयुष्यातील सात दशके त्यांनी इस्माईली समुदायाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विकासासाठी समर्पित केली.आगा खान चतुर्थ यांच्या निधनामुळे इस्माईली मुस्लिम समुदायात शोककळा पसरली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली इस्माईली समुदायाने जागतिक स्तरावर सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आगा खान चतुर्थ यांनी १९६७मध्ये आगा खान विकास नेटवर्कची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. AKDN मध्ये सध्या ९६,०००हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ही संस्था भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, ताजिकिस्तान यांसारख्या अनेक देशांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवते.
आगा खान फाउंडेशनने नुकतीच करीम आगा खान यांच्या निधनाची घोषणा केली असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगितले आहे.उत्तराधिकारी निवडीबाबतची माहिती त्यांच्या मृत्यूपत्रात आहे. हे मृत्युपत्र लिस्बन त्यांच्या कुटुंबीय आणि धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत वाचले जाणार आहे.
नेमकं काय आहे आगा खान विकास नेटवर्क (AKDN)?
आगा खान विकास नेटवर्क (Aga Khan Development Network - AKDN) हा एक आंतरराष्ट्रीय संस्थांचा समूह आहे. ही संस्था सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी कार्य करतो. या नेटवर्कची स्थापना आगा खान चतुर्थ यांनी १९६७ मध्ये केली होती. AKDN जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यरत असून संस्थेचा मुख्य उद्देश गरिबी निर्मूलन, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवा पुरवणे आहे. सांस्कृतिक वारसा जतन करण्यातही या संस्थेचा मोठा वाटा आहे.
AKDN ने राबवलेले काही महत्त्वाचे उपक्रम
शिक्षण:
- आगा खान विद्यापीठ (AKU) – हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ असून, पाकिस्तान, आफ्रिका आणि युरोपमध्ये त्याच्या शाखा आहे.
- आगा खान शाळा आणि अकादमी – प्राथमिक ते उच्च शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त शाळा आणि महाविद्यालये.
- शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम – शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण देऊन शिक्षणव्यवस्थेची गुणवत्ता वाढवणारा उपक्रम.
आरोग्यसेवा:
- आगा खान हॉस्पिटल्स आणि हेल्थ सर्व्हिसेस – अनेक देशांमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रे चालवली जातात.
- मातृ आणि बाल आरोग्य कार्यक्रम – गर्भवती माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम.
- टिकाऊ औषधोपचार आणि संशोधन – आरोग्यविषयक संशोधन आणि औषधोपचार सुधारण्यासाठी विविध प्रकल्प.
आर्थिक विकास:
- आगा खान फाउंडेशन (AKF) – ग्रामीण आणि शहरी भागात गरिबी हटवण्यासाठी विविध उपक्रम.
- सूक्ष्म वित्तपुरवठा (Microfinance) – लघुउद्योग आणि उद्योजकांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी विविध बँका आणि पतसंस्था.
- अर्थव्यवस्था आणि व्यापार सुधारणा – रोजगारनिर्मिती आणि स्थानिक उद्योगांना मदत करणारे उपक्रम.
सांस्कृतिक वारसा संवर्धन:
- आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर (AKTC) – ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि पुनरुज्जीवनासाठी विशेष प्रकल्प.
- आगा खान आर्किटेक्चर पुरस्कार – आधुनिक आणि पारंपरिक वास्तुकलेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार.
- म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीज – जगभरातील इस्लामिक आणि ऐतिहासिक कलांचा प्रचार आणि प्रसार करणारी संस्था.
कोणकोणत्या देशांमध्ये कार्यरत आहे AKDN?
AKDN ३०हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. त्यामध्ये पाकिस्तान, भारत, बांगलादेश, ताजिकिस्तान, केनिया, युगांडा, अफगाणिस्तान, टांझानिया, मोझांबिक, माली आणि फ्रान्स यांसारख्या देशांचा समावेश आहे.
AKDNचे भारतातील उपक्रम:
- महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे AKDN शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास उपक्रम राबवतो.
- आगा खान पॅलेस, पुणे – महात्मा गांधींशी संबंधित ऐतिहासिक वारसा जतन करणारी संस्था.
- हुमायूनचा मकबरा, दिल्ली – आगा खान ट्रस्ट फॉर कल्चरने या ऐतिहासिक स्थळाचे पुनरुज्जीवन केले आहे.
आगा खान विकास नेटवर्क (AKDN ) ना नफा तत्त्वावर चालणारी समाजसेवी आणि अराजकीय संस्था आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था कार्यरत आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे लाखो लोकांना उच्च शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक संधी मिळाली आहे. आगा खान चतुर्थ यांच्या निधनानंतरही AKDNचे कार्य चालूच राहील आणि त्यांच्या विचारांना पुढे नेईल, अशी अपेक्षा आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter