कर्पूरी ठाकूर : सामाजिक न्यायासाठी लढलेला जननायक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 11 Months ago
कर्पूरी ठाकूर
कर्पूरी ठाकूर

 

नरेंद्र मोदी
जननायक कर्पूरी ठाकूर यांची आज जन्मशताब्दी आहे. सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नामुळे कोट्यवधी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला. कर्पूरीजींना भेटण्याची संधी मला कधी मिळाली नाही; पण त्यांचे निकटवर्ती कैलाशपती मिश्रा यांच्याकडून मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. ते नाभिक या मागासलेल्या समाजातील होते. अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी मोठे यश प्राप्त केले आणि सामाजिक उन्नतीसाठी काम केले.

जननायक कर्पूरी ठाकूर यांचे जीवन साधेपणा आणि सामाजिक न्याय या दुहेरी स्तंभांभोवती गुंफले आहे. अखेरच्या श्वासापर्यंतची त्यांची साधी राहणी आणि नम्र स्वभाव सर्वसामान्यांच्या स्मृतीत कायम राहिला. त्यांच्या साधेपणाचे गुणगान करणारे अनेक किस्से आहेत. ठाकूर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासह कोणत्याही वैयक्तिक बाबींसाठी स्वतःचेच पैसे खर्च करणे नेहमी कसे पसंत केले, याबाबतच्या आठवणी त्यांच्या सहवासातील अनेक जण सांगतात. बिहारचे मुख्यमंत्री असताना राजकीय नेत्यांसाठी वसाहत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला; पण त्यांनी स्वत:साठी याकरिता कोणतीही जमीन किंवा पैसा घेतला नाही.
 
१९८८ मध्ये त्यांचे निधन झाले, तेव्हा अनेक नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावाला गेले होते, तेव्हा त्यांच्या घराची अवस्था पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले. एवढ्या मोठ्या माणसाचे घर इतके साधे कसे असू शकते? १९७७ मध्ये ज्यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला होता, त्यावेळी दिल्ली आणि बिहारमध्येही जनता दलाचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जनता दलाचे नेते बिहारमध्ये जमले होते. प्रमुख नेत्यांच्या मांदियाळीत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर फाटका सदरा घालून फिरत होते. आपल्या अनोख्या शैलीत चंद्रशेखर यांनी लोकांना काही पैसे दान करण्याचे आवाहन केले. त्या निधीतून कर्पूरीजी एक नवीन सदरा विकत घेऊ शकतील, असे वाटले होते. त्यांनी पैसे तर स्वीकारले, मात्र ते ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला दान करून टाकले.

जननायक कर्पूरी ठाकूर यांना सामाजिक न्यायाप्रती विशेष आस्था होती. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एका अशा समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी कार्य केले जिथे प्रत्येकाला समान न्याय मिळेल. त्यासाठी संसाधनांचे समान वाटप केले. प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध असतील हे पाहिले. त्यांना भारतीय समाजातल्या व्यवस्थेतील असमानता दूर करायची होती. आपल्या आदर्श आणि मूल्यांप्रती त्यांची निष्ठा इतकी दृढ होती की, ज्या काळात काँग्रेस पक्ष सर्वव्यापी होता, अशा युगात राहूनदेखील त्यांनी स्पष्टपणे काँग्रेसविरोधी भूमिका घेतली. याचे कारण काँग्रेस आपल्या मूलभूत तत्त्वांपासून विभक्त झाली आहे, याची त्यांना फार लवकर जाणीव झाली होती.
 
त्यांची राजकीय कारकीर्द १९५० च्या दशकाच्या सुरुवातीस सुरू झाली आणि तेव्हापासून ते कामगारवर्ग, मजूर, लहान शेतकरी आणि तरुणांच्या संघर्षांना मोठ्या हिमतीने आवाज देत राहिले आणि विधिमंडळाच्या सभागृहातले एक सामर्थ्यवान प्रतिनिधी झाले. शिक्षण हा विषय त्यांच्या आस्थेचा होता. गरिबांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अथक कार्य केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये शिक्षण द्यावे या विचारांचे ते पुरस्कर्ते होते; ज्यामुळे लहान शहरे आणि खेड्यातील लोकशिक्षण घेऊन जीवनात यशोशिखरावर पोहोचतील. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीही अनेक उपाययोजना केल्या.

समावेशक समाजासाठी पाया
लोकशाही, वादविवाद आणि चर्चा हे कर्पूरीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक होते. लहानपणी त्यांनी भारत छोडो आंदोलनात स्वतःला झोकून दिले, तेव्हा त्यांच्यातील हे धैर्य दिसले. त्यांनी आणीबाणीचा सर्वशक्तिनिशी प्रतिकार केला तेव्हा ते धैर्य पुन्हा दिसून आले. जेपी, डॉ. लोहिया आणि चरणसिंह यांच्यासारख्यांनीही त्यांच्या अद्वितीय अशा यथार्थ कामगिरीची प्रशंसा केली.

मागासवर्गीयांना त्यांचे हक्काचे प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी प्रयत्न करणारे आणि त्यासाठी कृतियंत्रणा बळकट करणारे कर्पूरी ठाकूर कायम स्मरणात राहतील, याचे कारण ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती. त्यांच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला; पण ते कोणत्याही दबावापुढे झुकले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली धोरणे अंमलात आणली गेली, जिथे एखाद्याचा जन्म एखाद्याचे भाग्य ठरवत नाही, या आधारावर या धोरणांनी अधिक समावेशक समाजासाठी पाया घातला. ते समाजातील सर्वात मागासलेल्या स्तरातील होते; पण त्यांनी सर्व लोकांसाठी काम केले. त्यांच्यामध्ये कटुतेचा कोणताही मागमूस नव्हता. हे वैशिष्ट्य त्यांना खरोखर महान बनवते.

गेली दहा वर्षे आमचे सरकार जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या मार्गावर चालले आहे. आमच्या योजना आणि धोरणांमध्ये परिवर्तनशील सशक्तीकरण आणले आहे. कर्पूरीजींसारख्या काही नेत्यांना वगळून सामाजिक न्यायाची हाक केवळ राजकीय घोषणापुरती मर्यादित राहिली, ही आपल्या राजकारणाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या दृष्टिकोनाने प्रेरित होऊन आम्ही त्यांचा दृष्टिकोन प्रभावी शासकीय प्रारूप म्हणून अंमलात आणले. मी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगू शकतो की, गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त करण्याच्या भारताच्या कामगिरीचा जननायक कर्पूरी ठाकूर यांना खूप अभिमान वाटला असेल. हे लोक समाजातील सर्वाधिक मागास वर्गातील आहेत, ज्यांना वसाहतवादी सरकारपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे सात दशके मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्या होत्या. त्याचवेळी प्रत्येक योजनेचे १०० टक्के  लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे सुनिश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे सामाजिक कल्याणाबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचे दर्शन घडत आहे.
 
आज इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती आणि जमातीच्या समुदायांमधील लोक मुद्रा योजनेमुळे उद्योजक बनू लागले असताना कर्पूरी ठाकूर यांचे आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न साकार होत आहे. तसेच आमच्या सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गाच्या आरक्षणाचा विस्तार केला आहे. आम्ही इतर मागास वर्ग आयोगाची स्थापना करण्यात यश मिळवले आहे. (दुर्दैवाने ज्याला काँग्रेसने विरोध केला होता), जो आज कर्पूरीजींनी दाखवलेल्या मार्गावर काम करत आहे. ‘पीएम-विश्वकर्मा योजना’ भारतातील इतर मागास वर्गाच्या समुदायाच्या कोट्यवधी जनतेसाठी समृद्धीची नवी दालनेदेखील खुली करणार आहे.

मी स्वतःच इतर मागास वर्गातील असल्यामुळे जननायक कर्पूरी ठाकूर यांचा मी खूप आभारी आहे. दुर्दैवाने कर्पूरी ठाकूर आपल्यातून त्यांच्या वयाच्या केवळ ६४ व्या वर्षी गेले. ज्यावेळी त्यांची नितांत आवश्यकता होती, त्याचवेळी ते गेले. तरीही ते कोट्यवधी जनेत्चा हृदयात आणि मनात त्यांच्या कामामुळे कायम राहतील. ते खऱ्या अर्थाने जननायक होते!

जननायक कर्पूरी ठाकूर यांना सामाजिक न्यायाप्रती विशेष आस्था होती. जिथे प्रत्येकाला समान न्याय मिळेल, अशा एका समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी कार्य केले. त्यासाठी संसाधनांचे समान वाटप केले. प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध असतील हे पाहिले. मंगळवारी त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णयही झाला आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष लेख.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान