“कुणाचा जीव वाचवणे हे माझे कर्तव्य होते. ही मानवसेवा आहे. जेव्हा तुम्ही कुणाची मदत करता, तेव्हा तुम्ही कधीच पाहत नाही तो कोणत्या धर्माचा किंवा पंथाचा आहे. या जगात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाचा जीव, हे आम्हाला धर्मानेच शिकवले. मग मी रामशंकर यांचा जीव वाचवला किंवा मी त्यांना वेळेवर उपचार दिले, तर ते माझे कर्तव्य होते...”
हे शब्द आहेत युवा वकील आणि समाजसेवक फरहान आलम यांचे. फरहान यांनी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात रामशंकर नावाच्या एका भाविकाचाचा जीव वाचवला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
त्या व्हिडीओ मध्ये एक युवक हृदय विकारचा झटका आलेल्या एका व्यक्तीला सीपीआर देत आहे. बाजूला त्या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा धाय मोकलून रडत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब लक्षात आली की रामशंकर यांचा जीव वाचवणारे युवक हे फरहान आलम आहेत.
आवाज द वॉइसशी बोलताना फरहान आलम म्हणाले, “मी जे काही केले ती गोष्ट मला त्या प्रसंगी महत्वाची वाटली. तो माझ्या जबाबदारीचा एक भाग होता आणि मी तो चांगल्या प्रकारे पार पडला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, मी सीपीआरच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि अल्लाहने त्याला यशस्वी केले.”
त्यावेळचा प्रसंग सांगताना फरहान म्हणाले, “ही घटना घडली तेव्हा मी रेल्वे स्थानकावर होतो. त्यावेळी माझा सहकारी मुहम्मद अरशद याचा मला कॉल आला. वॉकी-टॉकीवर त्याने मला संपूर्ण घटना सांगितली. काही मिनिटातच मी घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा रामशंकर हे बेशुद्धावस्थेत होते, त्यांना श्वासही घेता येत नव्हता. मी तात्काळ त्यांना सीपीआर दिला. काही वेळात ते शुद्धीत आले आणि त्यांना नवीन आयुष्य मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.”
प्रयागराजमधील ‘युनिसेफ’ आणि ‘हक’ या एनजीओद्वारे ते मुलांच्या अधिकारांसाठी काम करत आहेत. फरहान आलम हे ‘प्राइम रोज’ या शिक्षण संस्थेचे संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांची संस्था महाकुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या भाविकांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते. त्यामध्ये कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच सीपीआरचा देखील समावेश आहे. परंतु अशा घटनेला त्यांना पहिल्यांदाच सामोऱं जावं लागलं होतं. या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, “हे एक आव्हान होतं. फक्त हिम्मत आणि प्रयत्न करा, बाकी सगळी अल्लाहची इच्छा.”
आवाज द वॉइसशी बोलताना फरहान म्हणाले, “महाकुंभमेळा सुरू होण्यापूर्वी, आरपीएफ इन्स्पेक्टर शिव कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली जवानांसाठी एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी सीपीआर कसं द्यावं हे मी जवानांना शिकवलं होतं. हा सर्व महाकुंभ मेळ्याच्या तयारीचा एक भाग होता.”
हा सौहार्दाचा महाकुंभ आहे…
फरहान म्हणतात, “महाकुंभमेळा हे जरी हिंदू धर्माच्या आस्थेचे केंद्र असले तरी आपण सर्वांनीच त्याचा आदर केला पाहिजे. प्रयागराजच्या रहिवाशांना कुंभ मेळ्यादरम्यान प्रत्येक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तयार राहिले पाहिजे, कारण इथे येणारा प्रत्येकजण आपला पाहुणा आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मला विश्वास आहे की हा बंधुभाव आणि सौहार्दाचा महाकुंभ आहे. इथे असे काही मुस्लीम आहेत जे इथे येणाऱ्या करोडो भाविकांना सेवा देण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.”
ते पुढे म्हणतात, ‘महाकुंभमेळा देशाच्या गंगा-जमनीचे प्रतीक आहे. त्यामुळे इथे हिंदू-मुस्लीम असा भेदभाव होत नाही. सेवा करण्यासाठी आम्हाला धर्माच्या आधारावर कुणीही रोखले नाही किंवा कुणी विरोधही केला नाही. खरंतर आपण या शहराचे नागरिक आहोत म्हणून इथे येणाऱ्या लोकांची मदत करणे आपली सामाजिक आणि मानवी जबाबदारी आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाची सेवा करणं हे आमचं कामचं आहे. स्वयंसेवकांचा कुठलाही धर्म नसतो, मानवसेवा हेच आमचे कर्तव्य आहे.”
रामशंकर पूर्णपणे बरे झाल्यानंतर फरहान यांनी प्रयागराजच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतली. त्यांचा चेहरा नवजीवन मिळाल्याच्या आनंदाने खुलला होता. फरहान यांचे आभार मानण्यासाठी हॉस्पिटलमध्ये रांग लागली होती. परंतु फरहान म्हणाले की, मी माझे कर्तव्य निभावले आणि मला याचा आनंद आहे की मी वेळेवर घटनास्थळी पोहोचले आणि माझे प्रयत्न यशस्वी झाले.”
विशेष म्हणजे गेल्या कुंभमेळ्यात फरहान आलम यांनी अशाच परिस्थितीत एका भाविकाचे प्राण वाचवले होते. त्या घटनेचा व्हिडिओ त्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. देशातील सोशल मीडिया जेव्हा आयटी बाबा आणि ममता कुलकर्णी यांच्या बॉलिवूड ते सन्यासी बनण्याच्या प्रवासाच्या बातम्यांमध्ये दंग असतानाच महाकुंभमेळ्यामधून ही घटना समोर आली आहे.
फरहान आलम यांनी आवाज द वॉइसला सांगितले की, “या घटनेने भाविकांना व प्रशासनाला प्रशिक्षण आणि तयारीचे महत्त्व पटवून दिले.”
या घटनेनंतर अनेक लोक फरहान आलम यांच्या कार्याची प्रशंसा करत आहेत आणि त्यांचे आभार मनात आहेत. तेथील स्थानिक लोकांसह कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांनी फरहान आलम यांच्या प्रयत्नांना दाद दिली आणि त्यांना खरा नायक देखील मानलं आहे.