सध्या पंचायत-3 (Panchayat 3) या वेब सीरिजची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. बरेच प्रेक्षक या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत होते. पंचायत या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझन प्रमाणेच तिसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंचायत-3 ही वेब सीरिज रिलीज होताच अनेकांनी बिंच वॉच केली. अशातच या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पंचायत-3 मधील प्रल्हाद ही भूमिका साकारुन फैजल मलिक घराघरात पोहोचला आहे. त्याचा ‘समय पहले कोई नहीं जाएगा, कोई नहीं मतलब कोई नहीं’ हा डायलॉगही व्हायरल झाला आहे. त्याच्या पंचायत-3 मधील अभिनयाचं लोक भरभरुन कौतुक करत आहेत.
फैजलनं अभिनय क्षेत्रात विशेष ओळख निर्माण करण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना केला आहे. जाणून घेऊयात त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...
22 व्या वर्षी मुंबईत आला
22 व्या वर्षी फैजलनं अभिनेता होण्यासाठी मुंबई गाठली. फैजलला मुंबईत आल्यानंतर काही दिवस रेल्वे स्टेशनवर काढावे लागले. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, तो दहा रुपये देऊन रेल्वे स्टेशनवर झोपत होता. त्याच्याकडे जेवण करण्यासाठी देखील पैसे नसायचे. महिना सातशे रुपयाची नोकरीही त्याने करून पाहिली. आर्थिक अडचणींचा सामना करत होता, त्यावेळी त्याला एका टीव्ही चॅनेलमध्ये नोकरी मिळाली. या काळात तो एडिटिंगदेखील शिकला.
अनुराग कश्यपसोबत सुरु केली होती कंपनी
फैजल हा एडिटर म्हणून काम करु लागला. अशातच त्याची भेट फिल्ममेकर अनुराग कश्यपसोबत झाली. फैजलनं अनुरागकडे प्रोड्युसर होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी अनुराग आणि फैजल यांनी एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली. पण नंतर ती कंपनी बंद पडली.
अनुराग कश्यप आणि फैजलची प्रोडक्शन कंपनीला यश मिळालं नाही पण अनुरागनं मात्र फैजलची साथ सोडली नाही. अनुरागनं त्याच्या फैजलला गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. गँग्स ऑफ वासेपूर सिनेमात फैजलनं इन्स्पेक्टर गोपाल सिंगचं पात्र साकारलं.
'पंचायत-3' मुळे मिळाली लोकप्रियता
फ्रॉड सैयां, डेढ़ बिगहा ज़मीन,मस्त में रहने का यांसारख्या चित्रपटांमध्ये फैजलनं काम केलं पण 'पंचायत-3' या वेब सीरिजमधील प्रल्हाद पांडे या भूमिकेमुळे फैजलला लोकप्रियता मिळाली आहे. या सीरिजमधील त्याच्या डायलॉग्सनं आणि अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अशी मिळाली या मालिकेत भूमिका
एका मुलाखतीत फैजल म्हणतो, "मला अभिनयाची भीती वाटते. मला पंचायतसाठी विचारणा झाली तर मी नकार दिलेला. गँग्ज ऑफ वासेपूर हा चित्रपट मी अनुराग कश्यप यांच्यामुळे केला होता. नंतर अभिनयाच्या ऑफरही आल्या. पण मी नकार कळवला होता. पंचायत सीरिजशी जोडलेली काही लोक माझ्या ओळखीचे होते आणि त्यांच्या आग्रहाखातरच मी ही सीरिज स्वीकारली."