दहशतवादाच्या सावटात नजाकत अलीने दाखवली 'काश्मीरियत'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
नझाकत अलीने वाचवले ११ पर्यटकांचे प्राण
नझाकत अलीने वाचवले ११ पर्यटकांचे प्राण

 

२२ एप्रिलला जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या क्रूर हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. देशभरातून शोक व्यक्त होत असताना नझाकत अली हे नाव मात्र आशेचा आणि मानवतेचा किरण म्हणून उदयास आले. या स्थानिक कापड व्यापाऱ्याने आपल्या प्रसंगावधानाने आणि धैर्याने ११ जणांचे प्राण वाचवले.

गोळीबारादरम्यान देवदूतासारखा धावून आला नजाकत
हल्ल्याच्या वेळी छत्तीसगडच्या चिरमिरीहून आलेले चार मित्र कुलदीप स्थापक, शिवांश जैन, हॅपी बधावान आणि अरविंद्र अग्रवाल हे आपापल्या कुटुंबांसह पहलगामच्या बैसरन खोऱ्यात फिरत होते. अचानक गोळीबार सुरू झाला आणि सर्वत्र गोंधळ उडाला. रस्त्याच्या दुतर्फा पर्यटक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. या गडबडीत नजाकत अलीने परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याने त्याठिकाणी असलेल्या ओळखीच्या पर्यटकांना शांत केले आणि सुरक्षित ठिकाणी नेले.

जुनी ओळख बनली आधार 
नजाकत दर हिवाळ्यात चिरमिरीला कपडे विकण्यासाठी जातो. तिथेच या कुटुंबांशी त्याची मैत्री झाली. हाच विश्वास त्यांना पहलगामपर्यंत घेऊन आला. हल्ल्याची बातमी पसरताच देश हादरला. त्यावेळी कुलदीप स्थापक यांची पत्नी आणि भाजपच्या नगरसेविका पूर्वा स्थापक त्यांच्या तीन लहान मुलांसह त्या घटनास्थळी होत्या.

त्याप्रसंगी सर्वजण जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. पण नजाकतने संयम ठेवला. त्याने एकेक पर्यटकाला रस्त्यावरून बाजूला काढले. सर्वांना लॉजपर्यंत सुरक्षित पोहोचवले. हल्ल्यानंतर लगेच त्याने लष्कराच्या मदतीने या सर्वांना हॉटेलपर्यंत पोहोचवले.

कुटुंबीयांनी सांगितला हल्ल्याचा थरार
कुलदीप स्थापक यांचे मामा राकेश परासर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “हल्ल्याच्या वेळी कुटुंबात तीन मुलं होती. आम्ही खूप घाबरलो होतो. पण नजाकतने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. आम्ही त्याचे आभारी आहोत.” 

शिवांश जैन यांच्या आई म्हणाल्या, “आमचा मुलगा, सून आणि नातू सुरक्षित आहे. नजाकत नसता तर काय झाले असते, याची कल्पनाच करू शकत नाही.”

मानवतेचा विजय
काही प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण नजाकत अलीच्या शौर्याने हे सिद्ध केले की मानवता सर्वश्रेष्ठ आहे. काश्मिरी मुस्लिम व्यापाऱ्याने हिंदू कुटुंबांचे प्राण वाचवून काश्मीरियत आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter