दिल्लीत आल्यावरही नसरीनच्या कुटुंबाची संघर्षयात्रा सुरूच होती. ७ नोव्हेंबर १९९८ रोजी नसरीनचा जन्म झाला. नसरीन घरातले पाचवे अपत्य. शाळेत अभ्यासासोबत नसरीन विविध खेळ खेळत होती. त्यावेळी एका शिक्षिकेने तिच्यातील चपळता आणि धावण्यातील तिचा वेग हे कलागुण हेरले आणि तिने खो खो खेळावे असे सुचवले. शिक्षिकेचा हा सल्ला नसरीनच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
लहानपणापासून तिला खो-खोची गोडी लागली. शाळेत असल्यापासूनच ती आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक होती दाखवू लागली. तिसरीत असताना तिने १०० मीटर आणि २०० मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकले. सहावीपर्यंत ती शाळेतील राष्ट्रीय खेळाडूंबरोबरच खो-खोमध्येही सहभागी होत होती.
नसरीनचे शालेय शिक्षण सरकारी शाळेतून झाले. नवी दिल्लीतील पीतमपुराच्या कोहाट एन्क्लेव्हमधील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दौलत राम विद्यालयातून बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली. पुढे ‘शारीरिक शिक्षण’ या विषयात तिने आणखी एक पदवी मिळवली. पुढे याच विषयातून तिने पदव्युत्तर पदवीही मिळवली.
नसरीनने पूर्ण वेळ खो-खो खेळण्याचा निर्णय घेतला त्यामागचे कारणही तिच्यातील संवेदनशीलता आणि आहे त्या परिस्थितीतून भरारी घेण्याची तिची वृत्ती. खो-खो खेळायला कोणत्याही प्रकारचे साहित्य लागत नाही. थोडक्यात घरातील लोकांना खेळासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. पण साहित्य लागत नसले तरी पौष्टिक आहार हा लागणारच होता. तिची हीच गरज भागवण्यासाठी नसरीनचे वडील दुप्पट कष्ट करत. एकाच दिवशी दोन ठिकाणच्या आठवडी बाजारात ते आपले दुकान मांडत. ते रोज सकाळी ७ ला घर सोडत. पहिल्या ठिकाणचा बाजार झाला की दुसरीकडे जात. ते नंतर थेट रात्री १२ ला घरी परतत. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला त्यांचा दिवस सुरु होई. नसरीनला या खेळात यशस्वी होताना पाहणं हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव लक्ष्य बनले होते. ‘गावाकडे गेलो तर धंदा बुडेल, त्यामुळे ते कधी गावीही जात नसत, त्यांनी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग केला,’ असे नसरीनने आठवणीने सांगितले.
नसरीन सकाळी उठून सरावाला जायची तेव्हा मोहल्ल्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या जायच्या. अनेकांना तिचे असे बाहेर जाणे खटकत होते. नसरीन ज्या मोहल्यात राहत होती तेथील बहुतांश मुली हिजाब घालत असत. त्यामुळे नसरीनही सरावाला जाताना बुरखा घालूनच जाई आणि तिथे जाऊन ते काढून ठेऊन मगच व्यायाम करत असे. सरावात कोणाचाही अडथळा येऊ नये म्हणून दूरच्या बागेत जाऊन ती तिचा सराव करायची. या सगळ्यांत तिच्या घरचे भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे राहिले.
२०१६ मध्ये इंदोर येथे झालेल्या खो-खो चॅम्पियनशिपसाठी नसरीनची पहिल्यांदा निवड करण्यात आली. पुढे २०१८ मध्ये, लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या खो-खो चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड होणारी नसरीन पहिली भारतीय खेळाडू ठरली.
हळूहळू खो-खो मधील एक उगवता तारा म्हणून नसरीनची ओळख निर्माण होऊ लागली. कष्टाची पोचपावती देणारा एक क्षण नसरीनच्या आयुष्यात आला. तो क्षण म्हणजे २०१९ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खो खो संघाची कर्णधार म्हणून झालेली तिची निवड. मिळालेल्या संधीचे सोन करायचं ही खुणगाठच जणू तिने मनाशी बांधली होती. त्यावेळी नेपाळ विरुद्ध झालेल्या लढतीत स्वतः नसरीनने ५ खेळाडूंना बाद करत ११-३ अशी एक लढत जिंकली. आणि नेपाळ संघाचा ८ गुणांनी पराभव करत भारताने तिच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक जिंकले. एकेकाळी तिच्यावर प्रश्न उपस्थित करण्याऱ्यांची तोंडे तिच्या कर्तुत्वाने बंद केली. आता तिची आणि तिच्या कुटुंबियांची सर्वत्र वाहवा होऊ लागली.
कर्णधारपदाची माळ नसरीनच्या गळ्यात पडली खरी, पण काही दिवसांतच जग कोरोनाच्या विळख्यात अडकले. परिणामतः वडिलांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आणि तिच्या कुटुंबालाही याचा फटका बसला. अशा परिस्थितीत जगायचे कसे? हा प्रश्न आ वासून उभा होता. त्यावेळी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यात तिला नोकरी होती पण कोविडमुळे जाऊ शकत नव्हती. तिने संस्थेला सर्व हकीकत सांगितली त्यानंतर तेथील स्पोर्ट्स टीमने नसरीनला शक्य तेवढी मदत केली. पुढे खो खो फेडरेशन ऑफ इंडिया या प्रशासकीय संस्थेने नसरीन आणि तिच्या कुटुंबीयांची गरज ओळखून एक लाख रुपयांची मदत केली. पुढे दिल्ली युथ वेलफेयर या संस्थेकडूनही ५० हजार रुपयांची मदत नसरीनला मिळाली. मिळालेल्या आर्थिक मदतीतून त्यांची तात्पुरती गरज भागली.
हळूहळू जसा कोविडचा विळखा कमी होत होता आणि लोकांची जगण्यासाठीची धडपड सुरु होऊ लागली. नसरीनलाही कुटुंबासाठी आता कामाची गरज भासू लागली. मात्र कनिष्ठ गटातील खेळाडूंची नेमणूक झाली की वरिष्ठ खेळाडूंना ही जागा रिकामी करावी लागते. या नियमांतर्गत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया बरोबरचा करारही संपुष्टात आला आणि नसरीनची नोकरी गेली.
याचा परिणाम नसरीनने तिच्या कसरतीवर होऊ दिला नाही. घरच्यांनी घेतलेल्या कष्टाचे नसरीनला चीज करायचे होते त्यामुळे ती कायम परिस्थितीशी दोन हात करत राहिली.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी ती आजही रोज सकाळी तीन तास व्यायाम करते तर सायंकाळी चार तास खो-खोसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित करते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत स्वतःला खंबीर बनवत खो-खोच्या दुनियेत आपला ठसा उमटवणाऱ्या नसरीनला भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने गौरवत तिच्या पंखाना बळ देण्याचे मोठे काम केले