भारत आणि न्यूझीलंडच्या तीन टेस्ट मॅचच्या मालिकेला १६ ऑक्टोबर रोजी नुकतीच सुरुवात झाली आहे. अशातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शुक्रवारी (११ ऑक्टोबर) तेलंगणा पोलिसात पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तेलंगणा पोलिसांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.परंतु नंतर ती हटवण्यात आली होती.
सिराजने हे पद स्विकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सिराजने टीम इंडियासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे पद देऊन त्याला सन्मानित कण्यात आले आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर सिराजचे कौतुकही झाले होते. त्या विजयानंतर त्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला थेट तेलंगणा पोलिसात डीएसपी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सिराजला डीएसपी पद मिळाल्यानंतर तेलंगणा सरकारने त्याच्यासाठी पोस्ट लिहिल त्यात म्हटले म्हटले होते की, “भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला त्याच्या क्रिकेटमधील कामगिरी आणि राज्याप्रती समर्पणासाठी त्याची तेलंगणाचे डीएसपी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तो आपल्या नवीन पदासह अनेकांना प्रेरणा देत आपली क्रिकेट कारकीर्द सुरू ठेवेल.”
तेलंगणा सरकारने यापूर्वी बॉक्सर निखत जरीनचाही केलाय सन्मान
तेलंगना सरकारकडून हा सन्मान मिळवणारा मोहम्मद सिराज हा एकमेव खेळाडू नाही. यापूर्वी तेलंगणा सरकारने दोन वेळा विश्वविजेती बॉक्सर निखत जरीनला खेळातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर तेलंगणा पोलिसात डीएसपी पद दिले. निखत १८ सप्टेंबर २०२४ ला तेलंगणा पोलिसात पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झाली. यानंतर, तिने डीजीपी कार्यालयात ड्युटीसाठी अहवाल दिला. महेश एम भागवत आयपीएस, अतिरिक्त डीजीपी (कायदा व सुव्यवस्था प्रभारी कर्मचारी) यांनी निखत जरीनचे तिच्या नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन देखील केले होते.
मोहम्मद सिराजची कारकीर्द
सिराज हा मूळचा हैदराबादचा. त्याने आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने भारतीय क्रिकेट संघात आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक स्थान मिळवले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने टीम इंडियासाठी २९ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत ७८ विकेट्स घेतल्या आहेत. सिराजची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १५ धावांत ६ विकेट्स त्याने घेतले आहेत. त्याने भारतासाठी ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७१ विकेट घेतल्या आहेत. तसेच १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्यात त्याने १४ विकेट घेतल्या. तर नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्ध मालिकेत सिराजने दुसऱ्या कसोटीत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
यापूर्वी कोणकोणत्या क्रिकेटपटूंना मिळालाय हा सन्मान?
भारतीय क्रिकेटपटूला पोलिस अधिकारी बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेता संघातील खेळाडू जोगिंदर शर्मालाही हरियाणा पोलिसात डीएसपी बनवण्यात आले होते. माजी फिरकीपटू हरभजन सिंगलाही पंजाब पोलिसात डीएसपी पद देण्यात आले होते. तर भारतीय महिला संघाची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर हिलाही पंजाब पोलिसांनी डीएसपी पदाची जबाबदारी दिली आहे. कोणत्याही क्रीडा क्षेत्रातत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर सरकार अनेकदा खेळाडूंचा अशा प्रकारे सन्मान करतात.
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणा पोलिसांमध्ये पोलिस उपअधीक्षक वेतनश्रेणी ५८८५० रुपये ते १३७०५० रुपये आहे. या वेतनश्रेणीसोबतच मोहम्मद सिराजला पोलिस उपअधीक्षकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधाही मिळणार आहेत. त्याला सरकारकडून घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता यासह इतर सुविधाही मिळतील.