भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. देशामध्ये वैज्ञानिक क्रांती आणण्यात कलामांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तयार केलेल्या मिसाईल्स आणि सॅटेलाईट लाँच व्हेईकल्समुळेच आपला देश आज चंद्र आणि मंगळावर उपग्रह पाठवत आहे. यामुळेच अब्दुल कलाम यांना 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं.
नंदी हॉवरक्राफ्ट
कलाम यांनी मिसाईल व्यतिरिक्त देखील बरेच शोध लावले. विशेष म्हणजे कलाम यांनी त्या काळी देशातील पहिलं हॉवरक्राफ्ट तयार केलं होतं. 'नंदी' असं नाव असलेल्या या हॉवरक्राफ्टला कलाम यांचा पहिला मोठा शोध मानलं जातं. ड्युअल इंजिन असणाऱ्या या हॉवरक्राफ्टमध्ये दोन व्यक्ती बसू शकत होते. तर हे जमीनीच्या एक फूट वरपर्यंत तरंगू शकत होतं.
सॅटेलाईट लाँच व्हेईकल
इस्रोने या महिन्यातचं आपल्या चंद्रयान-३ चं प्रक्षेपण केलं आहे. यासाठी त्यांनी स्वदेशी सॅटेलाईट लाँच व्हेईकलचा वापर केला. अशा प्रकारच्या रॉकेटचा शोध लावण्याचं श्रेयही अब्दुल कलामांना जातं. त्यांनी आपल्या आयुष्याची दहा वर्षं यासाठी मेहनत घेतली. १९८०च्या जुलै महिन्यात एसएलव्ही-३ ने रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला होता. यामुळे भारत स्पेस-क्लब देशांच्या यादीत सहभागी झाला होता.
पोखरण
'स्माईलिंग बुद्धा' या कोडवर्डने पार पाडण्यात आलेल्या अणुचाचणीमुळे भारताची मान आणखी उंचावली होती. १९७४ साली पहिली पोखरण अणुचाचणी घेण्यात आली. त्यानंतर १९९८ साली पाच अणुबॉम्ब साखळी स्फोटांच्या रुपाने दुसरी पोखरण चाचणी पार पडली. यामुळे अण्वस्त्र असलेल्या देशांच्या यादीत भारताला स्थान मिळाले होते.
गाईडेड मिसाईल
भारताच्या लष्करालाही अब्दुल कलाम यांच्या शोधांचा मोठा फायदा झाला. त्यांनी तयार केलेल्या गाईडेड मिसाईल या पुढे कित्येक वर्षं युद्धामध्ये वापरण्यात आल्या. त्यांनी ब्रह्मोस, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, आकाश, नाग अशा मिसाईल्सची निर्मिती केली.
कलाम राजू स्टेंट
अब्दुल कलाम यांचं वैद्यकीय क्षेत्रात देखील योगदान राहिलं आहे. अब्दुल कलाम आणि सोमा राजू यांनी मिळून 'कलाम राजू स्टेंट'ची निर्मिती केली होती. कोरोनरी स्टेंटचा वापर हृदयरोग निवारणासाठी केला जातो. जेव्हा इतर कोरोनरी स्टेंट हे ३० हजार रुपयांना मिळत होते, तेव्हा स्वदेशी बनावटीचं हे कलाम राजू स्टेंट केवळ ७ हजार रुपयांना उपलब्ध करण्यात आलं होतं.
कलाम राजू टॅब्लेट
स्टेंटनंतर अब्दुल कलाम यांनी सोमा राजू यांच्यासोबत मिळून आणखी एक शोध लावला. अंगणवाडी सेविका, आया आणि ग्रामीण डॉक्टरांना डोळ्यासमोर ठेऊन हा टॅबलेट तयार करण्यात आला होता.
लाईटवेट कॅलिपर्स
ऑर्थोसिस कॅलिपर्सचा शोध लावण्यामध्येही अब्दुल कलाम यांचं योगदान आहे. न्यूरोलॉजिकल आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी हा शोध अगदी महत्त्वाचा ठरला. अशा प्रकारचे आजार असणाऱ्या लहान मुलांना यामुळे चालता येणं शक्य झालं.
एक महान वैज्ञानिक, संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी देशासाठी बरंच काही केलं आहे. कलाम यांनी आयुष्यभर देशासाठी काम केलं. विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं मन अधिक रमत होतं. २७ जुलै २०१५ साली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच त्यांनी आपले प्राण सोडले. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली!