भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेक मौलानांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं. देशातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या हवेत मुक्तपणे जगता यावे यासाठी त्यांनी आपलं पणाला लावलं. अशाच थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे मौलाना मुहम्मद अली जौहर.
ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते. शिवाय इस्लाम धर्माचे विद्वान, समाजसुधारक, अत्यंत प्रभावी कवी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांची जीवनकथा म्हणजे देशभक्ती, समाजसेवा आणि ज्ञानोपासना यांचा प्रेरणादायी संगम आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान तर दिलंच पण त्यासोबतच शिक्षण, पत्रकारिता आणि शायरी यांमध्येही आपली वैशिष्ट्यपूर्ण छाप उमटवली.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
मौलाना मुहम्मद अली जौहर यांचा जन्म १० डिसेंबर १८७८ रोजी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. पाचव्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्याने त्यांचं पालनपोषण आई आब्दी बानो बेगम यांनी एकटीनं केलं. त्या सुशिक्षित आणि धर्माभिमानी महिला होत्या. आपल्या मुलांना धर्मासोबतच आधुनिक शिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता.
मौलाना मुहम्मद अली यांनी बरेली येथे प्राथमिक शिक्षण घेतलं आणि नंतर अलीगढच्या मोहम्मडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजमधून पदवी मिळवली. पुढे त्यांनी उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्यात योगदान
मौलाना मुहम्मद अली यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. १९१७मध्ये मुस्लीम लीगच्या अध्यक्षपदी निवडून आलेले मौलाना मुहम्मद अली पुढच्याच वर्षी कॉँग्रेसच्या स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले.
१९१९मध्ये त्यांनी महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी गांधीजींसोबत संघर्ष केला. ब्रिटीश सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज बुलंद केला आणि जनतेला एकत्र करून स्वातंत्र्याचा लढा उभा केला. ते म्हणायचे, "जिथवर ईश्वराच्या आज्ञेचा संबंध आहे, तेव्हा मी आधी मुसलमान आहे, नंतर मुसलमान आहे, शेवटी मुसलमान आहे. पण सवाल भारताच्या स्वातंत्र्याचा असेल तर मी आधी भारतीय आहे, नंतर भारतीय आहे, शेवटीही भारतीयच आहे."
खिलाफत आंदोलनात सहभाग
इस्लामी जगताच्या एकतेसाठी आणि तुर्कीतील खलिफाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी १९१९-२४ या दरम्यान झालेल्या खिलाफत चळवळीत मौलाना मुहम्मद अली यांनी सक्रिय भूमिका बजावली. महात्मा गांधींसोबत खांद्याला खांदा लावून काम करत त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं उदाहरण जगासमोर ठेवलं.
गोलमेज परिषदेतील सहभाग
१९३१मध्ये लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपली मतं ठामपणे मांडली .त्यांनी ब्रिटीशांना स्पष्ट शब्दांत सांगितलं, "माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या किंवा माझ्या थडग्यासाठी दोन गज जमीन द्या. मी इथं माझ्या देशासाठी स्वातंत्र्य घ्यायला आलोय." या तडफदार वक्तव्यामुळे त्यांच्या देशप्रेमाचं दर्शन जनतेला घडलं.
अलीगढ आणि जामिया विद्यापीठांच्या स्थापनेत मोलाची भूमिका
स्वातंत्र्यचळवळी आणि धार्मिक आंदोलनांसोबतच मौलाना मुहम्मद अली जौहर यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरीही अतुलनीय ठरली. आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास आणि उद्धार शिक्षणाद्वारेच शक्य आहे, याची पुरेपूर जाणीव मौलाना मुहम्मद अली यांना होती. आजही आघाडीवर असलेल्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचं योगदान दिलं.
इतकच नव्हे तर १९२०मध्ये त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया या आज मोठा लौकिक असलेल्या विद्यापीठाचीही स्थापना केली. या दोन्ही संस्थांनी भारतीय मुस्लिमांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीत खूप मोठे योगदान दिले आहे. मौलाना मुहम्मद अली यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी केवळ मुस्लीम समाजच नव्हे तर सर्वच भारतीय कायमच ऋणी राहतील.
पत्रकार मौलाना मुहम्मद अली
मौलाना मुहम्मद अली जौहर यांनी त्या काळात तडफेने पत्रकारीतही केली. त्यांनी इंग्रजी भाषेतील ‘कॉमरेड’ आणि उर्दू भाषेतील ‘हमदर्द’ हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रांनी जनतेचे प्रश्न मांडले आणि ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा पर्दाफाश करत स्वातंत्र्याच्या प्रेरणा जागवल्या.
यामुळेच ब्रिटीश सरकारने त्यांच्या वर्तमानपत्रांवर बंदी आणली. पत्रकारीतेसाठी त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र दरवेळी इंग्रजांच्या विरोधात ते अधिक जोमाने पेटून उठत.
महात्मा गांधी आणि इतर राष्ट्रीय नेत्यांशी मैत्री
मौलाना मुहम्मद अली आणि महात्मा गांधी यांच्यातील सहकार्य त्याकाळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं गेलं. त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. काही मुद्द्यांवर त्यांचे मतभेद झाले तरी त्यांच्यात परस्पर आदर कायम राहिला. त्यामुळेच गांधीजींनी त्यांना 'एक निडर देशभक्त' म्हणून गौरवलं होतं.
शायरीत मौलानांचा ठसा
मौलाना मुहम्मद अली जौहर एक प्रतिभावान शायरही होते. त्यांच्या शायरीत त्यांच्या जीवनातील संघर्ष, धर्माभिमान, आणि देशभक्तीचं प्रतिबिंब दिसून येतं. त्यांचे अनेक शेर आजही रसिकांना मुखोद्गत आहेत. त्यांच्या या काही प्रसिद्ध शेरमधून त्यांच्या काव्यप्रतिभेचा अंदाज येतो
न नमाज़ आती है मुझको, न वुज़ू आता है,
सज्दा कर लेता हूं जब सामने तू आता है।
किंवा
क़त्ल-ए-हुसैन असल में मर्ग-ए-यज़ीद है,
इस्लाम ज़िंदा होता है हर कर्बला के बाद।
किंवा हा शेर असो,
जीते जी तो कुछ न दिखलाया मगर
मर के 'जौहर' आपके जौहर खुले
मृत्यू आणि वारसा
भारतमातेच्या या सुपुत्राचे ४ जानेवारी १९३१ रोजी लंडन इथं निधन झालं. स्वतंत्र भारतात मरण यावे अशी त्यांची इच्छा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. मुस्लिमांसाठी मक्के-मदिन्यानंतर सर्वाधिक पवित्र असणाऱ्या जेरुसलेममधील मस्जिद-अल-अक्साच्या परिसरात त्यांना दफन करण्यात आलं.
मौलाना मुहम्मद अली जौहर यांचं जीवन म्हणजे त्याग, निर्भयता, आणि कर्तव्यभावनेचं मूर्तिमंत उदाहरण होतं. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेलं योगदान, समाजाच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, आणि त्यांची शायरी यामुळे ते कायम स्मरणात राहतील.