मोहम्मद आशिक ठरला मास्टरशेफ इंडिया २०२३!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
मास्टरशेफ मोहम्मद आशिक ट्रॉफी स्वीकारल्यानंतर
मास्टरशेफ मोहम्मद आशिक ट्रॉफी स्वीकारल्यानंतर

 

गेल्या अनेक दिवसांपासून किचन प्रेमींचा आवडता शो 'MasterChef India २०२३' प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आणि आपली पाककला सादर केली. या शोमुळे अनेक उत्कृष्ट रेसीपी प्रेक्षकांना शिकायला मिळाल्या.

'MasterChef India २०२३' चा काल अंतिम सामना मोठ्या दिमाखात पार पडला. काल हा शो संपला आणि इंडियाला नवीन मास्टरशेफ मिळाला आहे. मास्टरशेफ इंडिया २०२३ हा शो आठ आठवडे चालला. विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि पूजा धिंग्रा यांनी हा शो जज केला.

मोहम्मद आशिक हा मास्टरशेफ इंडिया २०२३ चा विजेता ठरला. खडतर आव्हानावर मात करून मोहम्मद आशिकने मास्टरशेफ इंडिया २०२३ ची ट्रॉफी आपल्या नावे केली. वयाच्या अवघ्या २४ वर्षीय मोहम्मद आशिकने मास्टरशेफ इंडियाचा आठवा सीझन जिंकला. या सोबतच मोहम्मदने एक कोट, ट्रॉफी आणि २५ लाख रुपये जिंकले आहेत. सईद आणि नंबी जेसिका या देखील फिनाले पर्यंत पोहचल्या. यात नंबी जेसिकाने दुसरा क्रमांक तर रुखसार सईदने तिसरा क्रमांक पटकावला.
 
शो चा जज रणवीर ब्रारने मोहम्मद आशिकचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत त्याने लिहिले की, 'प्रेरणादायक सुरुवातीपासून ते आव्हानात्मक  प्रवासापर्यंत, तू कधीही धाडस सोडलं नाही. मास्टरशेफ मोहम्मद आशिक झाल्याबद्दल अभिनंदन!

कोण आहे मोहम्मद आशिक?
मोहम्मद आशिक हा मूळचा कर्नाटकमधील मंगळूरचा आहे. ज्या वेळी आशिकने मास्टरशेफ इंडिया स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तो त्याच्या गावात ज्यूसचे दुकान चालवत होता.

त्याला स्वयंपाकाची आवड होती. वेगळ्या प्रकारच्या रेसीपी तयार करण्याचे कौशल्य त्याच्याकडे होते. मास्टरशेफ झाल्यानंतर आता मोहम्मद त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सक्षम आहे.

मास्टरशेफ इंडियाची ट्रॉफी मिळवल्यानंतर मोहम्मदने आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला, 'मास्टरशेफ इंडियावरील माझ्या प्रवासाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. एलिमिनेशनला सामोरे जाण्यापासून ते ट्रॉफी मिळवण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण मला खुप शिकवून गेला. या अनुभवाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे आणि मी हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले आहे.