भक्ती चाळक
हिजाब परिधान केलेली एक युवती एकदम आत्मविश्वासाने मुंब्र्याच्या रस्त्यांवर ट्राफिकचे नियोजन करत होती. तिचा तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. रमजानच्या काळात आपल्या महिला साथीदारांसह मुंब्र्यासारख्या परिसरात रात्री दीड-दोन वाजेपर्यंत ही युवती ट्राफिकचे नियोजन करते. सामाजिक क्षेत्रातील हे धाडसी आणि कर्तुत्ववान नेतृत्व म्हणजे मुंब्र्याची मर्झिया शानू पठाण.
राजकारण किंवा सामाजिक कार्यातील महिलांचा सक्रीय सहभाग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अशाच पद्धतीने आपल्या सामाजिक कार्यामुळे मर्झिया ही नेहमीच चर्चेत असते. समाजातील वंचित घटक आणि अल्पसंख्यांकांच्या अनेक प्रश्नांना ती वाचा फोडत आहे. मर्झिया हिच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून तिला राष्ट्रीय कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे.
गेल्या काही काळापासून मर्झिया पठाण सामाजिक, सांस्कृतिक कार्यात आघाडीवर आहेत. नागरी समस्यांसाठी लढणाऱ्या मर्झिया पठाण हिची नुकतीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मर्झियाला नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आवाज मराठीसोबत बोलताना मर्झिया म्हणाली, “मला पक्षाकडून मोठे पद आणि मोठी जबाबदारी मिळाली आहे. यामार्फत मला युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शिक्षण क्षेत्रात जास्त काम करायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत आहेत.”
शिक्षण क्षेत्रातील अडचणींबाबत बोलताना मर्झिया सांगते, “आजकाल आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना सरकारी स्कॉलरशिप मिळवून देण्याकडे जास्त असणार आहे. समाजातील निम्न किंवा गरजू वर्गातील घटकांसाठी अनेकदा शासनातर्फे महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या जातात. परंतु नागरिकांच्या अनास्थेमुळे किंवा माहितीचे योग्य प्रसारण न झाल्यामुळे योजनांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अशा योजनेपासून कुणी वंचित राहू नये यासाठी मी जास्त काम करणार आहे. जर आजची तरुण पिढी शिकली तरच आपला देश हा महासत्ता होणार आहे. त्यामुळे तरुणांचे प्रश्न सोडवण्याकडे माझा जास्त कल असणार आहे. ”
जितेंद्र आव्हाड यांनी मर्झियाच्या कार्याबद्दल विश्वास दाखवताना एका कार्यक्रमात म्हटले होते की, “तालिबानने पाकिस्तानातील स्वात खोऱ्यावर ताबा मिळवल्यानंतर मलाला यूसुफजईने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा दिला होता. २०१२ साली डोक्यात गोळी झेलून तिला तिच्या या लढ्याची किंमत चुकवावी लागली होती. मात्र यानंतर तिने पुन्हा उभे राहून शिक्षणासाठी हक्क बजावला. त्यानंतर स्त्रीशिक्षणाच्या हक्कासाठी मुंब्रयात मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चाचे नेतृत्व १०-१२ वर्षांच्या मर्झियाने केले होते. तेव्हापासून मी तिचे काम पाहतोय. मला ठाम विश्वास आहे ही मुलगी फक्त मुंब्र्याचं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करणार.”
मर्झिया पठाण विषयी…
मर्झिया ठाणे शहरात तरुण लढाऊ कार्यकर्ती म्हणून परिचित आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांची ती कन्या आहेत. बाप-लेकीची ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील मुलभूत प्रश्नांवर काम करत आहे. पाणी, कचरा, आरोग्य, महिला अत्याचार यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्यपूर्ण लढा देत आले आहेत. मधल्या काळात तिने सामाजिक समस्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे मुंब्रा आणि ठाणे शहरातील अनेक समस्यांचे निरसन झाले आहे.
मर्झियाने एमएसपी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य सुरु केले. उच्चशिक्षित असलेली मर्झिया विद्यार्थ्यांचे प्रशासनापुढे मांडण्यात आघाडीवर असते. याशिवाय विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संविधानाप्रति जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचेही ती आयोजन करते. मर्झियाच्या नेतृत्वात मुंब्रा परिसरातील नागरिकांसाठी दर महिन्याला नेत्र तपासणीचे शिबीर भरवले जातात. त्यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुद्धा मोफत केल्या जातात.
मदरसे बंद करण्याच्या शिफारसीसंदर्भात लढा
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) काही दिवसांपूर्वी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून राज्य सरकारांकडून मदरशांचा निधी थांबवण्याची शिफारस केली होती. मदरसा आणि मदरसा बोर्डांना मिळणारा राज्याचा निधी थांबवावा आणि मदरशांमध्ये जाणाऱ्या मुलांची नोंदणी करावी, अशी शिफारस या पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यावेळी हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर गाजले होते. मात्र मदरसे बंद करण्याच्या एनसीपीसीआरच्या शिफारशीला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे.
मदरशांमधील शिक्षण बंद होऊ नये यासाठी देखील मर्झियाने आपल्या स्तरावर प्रयत्न केले होते. मदरशांमधील शिक्षण पद्धती, त्यांना मिळणारे अनुदान हे तांत्रिकदृष्ट्या का गरजेचे आहे हे तिने व्हिडीओद्वारे तळमळीने पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तिचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला होता.
मर्झिया हिच्या याच कामाची दखल घेऊन जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीवकुमार झा यांनी मर्झिया पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मर्झिया हिला हे पद देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाला याचा विशेष फायदा होणार आहे. मर्झियाचे आजवरचे सामाजिक कार्य, हाती घेतलेले काम तडीस नेण्याची धडाडी, तिचा तगडा जनसंपर्क आणि समाज माध्यमांमधील तिची प्रतिमा याचा विशेष फायदा पक्षाला संघटन वाढीसाठी, तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी होणार आहे. राजकीय क्षेत्रातील अशा तरुण आणि धाडसी व्यक्तिमत्वाला सामाजिक कार्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…