मराठी व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे शंभरीत पदार्पण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 6 Months ago
डॉ. यास्मिन शेख
डॉ. यास्मिन शेख

 

भाषाशास्त्र आणि व्याकरण विषयांना आयुष्य वाहून घेतलेल्या निष्ठावंत ज्ञानसाधक, ज्येष्ठ व्याकरण विदुषी प्रा. यास्मिन शेख यांनी शुक्रवारी वयाच्या शंभरीत पदार्पण केले. गेल्या ७५ वर्षांपासून व्याकरण हाच ध्यास घेतलेल्या शेख यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर सुहृदांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘‘भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. मातृभाषेवर माझे नितांत प्रेम आहे. गेली अनेक वर्षे मी तिची मनापासून सेवा करते आहे, यापुढेही करत राहीन. भाषा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे, हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे,’’अशी भावना शेख यांनी वाढदिवशी व्यक्त केली. ‘‘मराठी भाषा प्राचीन आहे, त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायलाच हवा,’’अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
वाढदिवसानिमित्त शेख यांच्या कन्या डॉ. शमा भागवत आणि रूमा बावीकर यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी ‘यास्मिन शेख-मूर्तिमंत मराठीप्रेम’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ लेखक व संपादक भानू काळे यांनी ग्रंथाचे संपादन केले असून, प्रा. दिलीप फलटणकर यांनी सहसंपादन केले आहे.
 

                                                           डॉ. यास्मिन शेख यांच्या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा
 
ज्येष्ठ लेखक व प्राध्यापक प्रा. प्र. ना. परांजपे, अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त संग्राम गायकवाड, ज्येष्ठ लेखिका-समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. माधवी वैद्य, मेघना पेठे, स्नेहा अवसरीकर, ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर, 'मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे' अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी, रविप्रकाश कुलकर्णी, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, पुण्याचे माजी उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक आदी सुहृदांनी शेख यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
 
'यास्मिन शेख : मूर्तिमंत मराठी प्रेम' या गौरव ग्रंथाविषयी थोडसं :
डॉ. यास्मिन शेख यांच्या शंभरीत पदार्पनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ' यास्मिन शेख : मूर्तिमंत मराठी प्रेम' या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे आणि साहित्यिक दिलीप फलटणकर यांनी गौरवग्रंथाचे संपादन केले आहे. या गौरवग्रंथामध्ये यास्मिन शेख यांनी अंतर्नादसह इतर नियतकालिकांमध्ये  आणि वृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. यामध्ये व्यक्तीचित्रांपर  लेखन आहे, मराठी भाषा आणि व्याकरण या विषयी ही लेखन आहे त्याचबरोबर काही आत्मचरित्रात्मक लेखन ही आहे. यासोबतच या पुस्तकामध्ये यास्मिन शेख यांच्या सुहृदायांनी, त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी, मुलींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेले लेख ही पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आहेत.