देशाला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या मनमोहन सिंह यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 d ago
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

 

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देशाला आर्थिक संकटाच्या काळात टिकवून ठेवणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती. २००४ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते.

३ एप्रिल रोजी झाले होते निवृत्त
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे ३ एप्रिल २०२४ रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले. तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. मनमोहन सिंग यांच्या अनेक निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रुप बदलले. मनमोहन सिंग १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर गेले होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्र्याची जबाबदारी सांभाळली होती. या काळातच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान देखील राहिले आहेत.

मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास
1991 मध्ये मनमोहन सिंग आसामचे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर ते 1995, 2001, 2007 आणि 2013 मध्ये पुन्हा राज्यसभेचे खासदार होते. 1998 ते 2004 पर्यंत भाजप सत्तेत असताना मनमोहन सिंग हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 1999 मध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत येताच त्यांना पंतप्रधान करण्यात आले. 2009 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली आणि पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राहिले आहेत. 1982 ते 1985 या आपल्या कार्यकाळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक कामे केली. मनमोहन यांनी संयुक्त राष्ट्रातही काम केले आहे. 1966-1969 या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी आर्थिक व्यवहार अधिकारी म्हणून काम केले.

30 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले
मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणांनी देशाला गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले. या धोरणांमुळे देशातील 30 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. त्यानंतर देशात खाजगी क्षेत्राचा विस्तार झाला, त्यामुळे कोट्यवधी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. शिवाय अनेक बाबतीत आयातीवर अवलंबून असलेला भारत आज जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्यातदारांपैकी एक बनला आहे.

व्यवहार्य परराष्ट्र धोरण
मनमोहन सिंग यांनी परराष्ट्र धोरण अमलात आणताना त्यांच्या आधीच्या दोन पंतप्रधानांनी अमलात आणलेलं व्यवहारी धोरणच पुढे नेलं. त्यांनी पाकिस्तानबरोबरच्या शांततेच्या वाटाघाटी सुरू ठेवल्या. अर्थात, या शांतता प्रक्रियेत पाकिस्ताननं दहशतवादी हल्ले केल्याच्या आरोपांमुळे अडथळे निर्माण झाले होते. याची परिसीमा नोव्हेंबर 2008 मध्ये अवघ्या देशाला हादरवणाऱ्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झाली.

मनमोहन सिंग यांनी चीनबरोबरचा सीमावाद संपवण्याचाही प्रयत्न केला होता. 40 वर्षांहून अधिक काळ बंद असलेली तिबेटला जोडणारी नथुला खिंड खुली करण्याचा करार करण्यात त्यांना यश आलं होतं. त्यांनी अफगाणिस्तानला केल्या जात असलेल्या आर्थिक मदतीत वाढ केली. जवळपास 30 वर्षांनी अफगाणिस्तानला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते.

इराणसारख्या भारताच्या जुन्या मित्राबरोबरचे संबंध संपुष्टात आणले जात असल्याचे दिसत असल्यामुळे त्यांनी अनेक विरोधी राजकारण्यांचा रोष ओढवून घेतला होता.

विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
मनमोहन सिंग यांना देशातील आणि जगातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना लिहले, “भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून उदयास आले. देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले. देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमीट छाप होती. संसदेत त्यांनी केलेली भाषणं अभ्यासपूर्ण होती. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले.” 

विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील ‘मी मार्गदर्शक गमावला’ अशा शब्दात सहवेदना व्यक्त केल्या. ते म्हणतात, “मनमोहन सिंग यांनी त्यांची अत्युच्च बुद्धिमत्ता आणि सचोटीच्या बळावर देशाचं नेतृत्व केलं. त्यांचा नम्रपणा आणि अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. मी एक मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचे कोट्यवधी हितचिंतक मोठ्या अभिमानाने त्यांना स्मरणात ठेवतील." 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत भावनिक शब्दांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. ते म्हणतात, "इतिहास तुमच्याकडे अधिक करुणेने पाहील यात शंका नाही, डॉ. मनमोहन सिंग जी!माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, निर्विवाद सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला आहे. त्यांच्या आर्थिक उदारीकरण आणि हक्कांवर आधारित कल्याणकारी धोरणाने कोट्यवधी भारतीयांचे जीवन आमूलाग्र बदलले, भारतात एक मोठा मध्यमवर्ग निर्माण केला आणि कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter