फजल पठाण
समाजासाठी काही तरी करू पाहणाऱ्या अवलियांची संख्या आज कमी नाही. विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अशी व्यक्तिमत्व आपल्या कार्याने समाजापुढे आदर्श निर्माण करतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे खिसाल जाफरी. पुण्यातील मंचर या भागात राहणारे खिसाल जाफरी समाजसेवेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्गस्थ झाले. त्यांच्या समाजकार्याविषयी माहिती देणारा हा विशेष लेख.....
खिसाल जाफरी यांचा जन्म एक मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. पुण्यासारख्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची पावले समाजाकार्याकडे वळली. यानंतर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली. खिसाल जाफरी गेल्या वीस वर्षांपासून समाजकार्य करत असून ते युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. तसेच ते अल-हैदरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल-झेहरा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव असून महाराष्ट्रातील किमान सहा ते सात विविध सेवाभावी संस्थांचे ते सदस्य देखील आहेत.
आवाज मराठीशी बोलताना समाजकार्य करण्यामागच्या प्रेरणेविषयी ते सांगतात, “प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीवर आम्ही चालतो. इस्लाम मध्ये मानवसेवेला प्रचंड महत्त्व आहे. प्रेषितांचा विचार घेऊन, हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर यांचा आदर्श घेऊन आमची संस्था काम करते.”
पुढे ते आठवणीने सांगतात, “प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ज्यावेळी पुण्यातील कॉलेजमध्ये अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलो त्यावेळी मी फॉर्म भरला. नंतर मी फी भरण्यासाठी गेलो त्यावेळी माझ्या समोर लाईनमध्ये एक मुलगा उभा होता. त्यावेळी आम्हाला अकराशे पन्नास रुपये इतकी फी होती. त्यावेळी त्या विद्यार्थ्याकडे ७०० ते ८०० रुपये होते. पुरेसे पैसे नसल्यामुळे तो माघारी फिरला आणि नंतर त्याने ऍडमिशन घेतले नाही. हे सर्व घटनाक्रम मी पाहत होतो. त्यावेळी मला वाईट वाटले पण मी काही करू शकत नव्हतो. यानंतर मी ठरवलं की आपण समाजासाठी काहीतरी करायचं. मग हळूहळू त्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली.”
कोरोना काळात हजारो रुग्णांना दिला प्राणवायु
गेल्या काही वर्षांपूर्वी जगावर कोरोनाचे सावट होते. सर्वांसाठीच हा काळ अत्यंत कठीण होता. यावेळी विविध सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन काम केले. त्यातीलच एक म्हणजे खिसाल जाफरी यांचे युनिक फाऊंडेशन. त्यांच्या या फाऊंडेशनमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम युवक काम करतात. कोरोना काळातील कामाविषयी बोलताना खिसाल जाफरी सांगतात, “कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. कोविडच्या अनेक रुग्णांना त्यावेळी उपचार मिळत नव्हते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लाखो बांधव दगावत होते. याच पार्श्वभूमीवर आमच्या फाऊंडेशनने ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी आम्ही तब्बल तीन - साडेतीन हजार रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवले.”
या समाजकार्याच्या मागील भूमिकेविषयी विचारले असता ते सांगतात, “कोविड काळामध्ये मृत्युंची मालीखा सुरू होती. मी पुण्यातील ससून रुग्णालयातील गेलो होतो. त्यावेळी ससून हॉस्पिटलWमध्ये एका रुग्णाने माझ्या हातावर ऑक्सिजनच्या अभावी जीव सोडला. हा प्रसंग माझ्या समाजकार्याला नवी दिशा देणार होता. यानंतरच मी वैद्यकीय क्षेत्रातील समाजकार्याकडे वळलो. मी एक निश्चय केला की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचे काम सुरू ठेवणार. ते कधीही बंद करणार नाही.” खिसाल जाफरी यांच्या फाऊंडेशनचे हे काम अविरत मोफत सुरू आहे.
बालसुधारगृहातील मुलांना मिळतात जीवनाचे धडे
पुणे शहरात असलेल्या बालसुधार गृहांमध्ये शेकडो मुले आहेत. या मुलांचा सर्वांगीण विकास होणे तितकेच महत्वाचे आहे. खिसाल जाफरी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून या मुलांना योग्य मार्गदर्शन करतात. ते सांगतात,” संस्थेच्या माध्यमातून आम्ही शहरातील बालसुधारगृहांना वेळोवेळी भेटी देतो. त्या मुलांशी आणि कर्मचारी वर्गाशी बोलतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे येतील त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी लेक्चर घेऊन त्यांना मार्गदर्शन करतो”
निराधार लोकांना फाऊंडेशनमुळे मिळतोय आधार
महाराष्ट्रात आणि पुणे शहरात आजही असंख्य निराधार लोक आहेत. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता ती फुटपाथ वर झोपतात. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून खिसाल जाफरी यांचे फाऊंडेशन निराधार लोकांना आधार देण्यासाठी त्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना दरवर्षी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येते. हे काम अतिशय गुप्त पद्धतीने सुरू असल्याचे खिसाल जाफरी सांगतात. ते म्हणतात,”संघटनेचे सर्व कार्यकर्ते मध्यरात्री पुणे शहरातील विविध भागात जातात. या ठिकाणी गेल्यानंतर निधाधार लोकांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकतात. तसेच आठवड्यातून एकदा शनिवारी फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांसाठी संस्था फूड पॅकेट देते.”
शिक्षण क्षेत्रातही योगदान
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत कालानुरूप बदल घडत गेले. मात्र अल्पसंख्यांकांच्या शिक्षणाचा टक्का वाढताना दिसला नाही. आजही अल्पसंख्यांक समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. याविषयी माहीती देताना खिसाल जाफरी सांगतात, ”अल्पसंख्यांक समाज हा शिक्षणपासून अजूनही वंचित आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत मदत केली जाते. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था विविध कार्यक्रम हाती घेते आली आहे. अल्पसंख्यांक समाज शिक्षित व्हावा यासाठी संस्थेमार्फत पुस्तके, विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत केली जाते. तसेच शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेमार्फत पोहचवल्या जातात.”
पुढे ते म्हणतात, “अनाथ मुलांसाठी विविध ठिकाणी आश्रम शाळा आहेत. या ठिकाणी जाऊन संस्था महिन्यातून एकदा त्या मुलांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी मदत करते. तसेच त्यांचे जेवणाची देखील व्यवस्था करते. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देण्यासाठी लाखो युवक-युवती आपल्या पुणे शहरात येतात. त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सुविधा करण्यासाठी संस्था पुढाकार घेते.”
‘ड्रग्स फ्री पुणे’ करण्यासाठी संस्थेचा पुढाकार
अलीकडच्या काळात सर्वत्र ड्रग्स प्रमाण वाढत आहे. या ड्रग्स च्या विळख्यात विद्येचे माहेर घर देखील आले आहे. ड्रग्समुळे देशाचे उज्वल भविष्य असणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन झाला आहे. देशाची पुढची पिढी सावरण्यासाठी आणि त्यांना व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी जाफरी यांच्या संघटना ‘नशा मुक्ती अभियान’ सारखे कार्यक्रम चालवते. अशा कार्यक्रमातून संस्था तरुणांमध्ये जागरूकता तर निर्माण करतेच शिवाय मार्गदर्शन देखील करते.
तरुण पिढीला सल्ला देताना ते म्हणतात की,” प्रत्येकाने समाजकार्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७८ वर्ष झाली. तरीही आज आपल्या अवतीभावती अनेक असे विद्यार्थी आहेत जे फक्त पैशांमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक कुटुंब अशी आहेत ज्यांना दोन वेळेचे अन्न देखील मिळत नाही. जर प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारली, सामाजिक भान जपले तर समाजामध्ये निर्माण झालेली विषमता कमी होईल. यामुळे आपला समाज आदर्श समाज घडेल.”
खिसाल जाफरी समाजातील विविध अंगांसाठी करत असलेले सेवाकार्याला आवाज मराठीच्या शुभेच्छा.