अल्लाहकडे ‘पसायदान' मागणारी काश्मिरी तरुणी - शमीमा

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 10 Months ago
शमीमा
शमीमा

 

-पूजा नायक 

माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी |
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई |

वरील अभंगाच्या ओळी वाचल्या कि संत परंपरेचा वारसा जपणारा कोणी तरी हिंदू वारकरी समोर उभा दिसतो. मात्र हा अभंग तेवढ्याच तळमळीने सादर करणारी एक मुस्लिम धर्मीय मुलगी जेव्हा उभी दिसते तेव्हा नवा इतिहास लिहला जातो. 

मराठी संत परंपरेचे हे तत्वज्ञान जात, धर्म, प्रांत हा भेद विसरून सादर करणारी कश्मीर मधील शमीमा अख्तर. महाराष्ट्रामध्ये येते काय आणि हिंदु संत परंपरेचा वारसा जपून सर्व विश्वाला ऐक्याचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून शांतीचा संदेश देऊन जाते, हे खरंच माणुसकीला एका उंचीवर नेणारी बाब आहे.

शमिमाची पार्श्वभूमी:
शामिमा ही मुळची काश्मीरमधील बांदीपुरा जिल्यातील अरागम या गावातील आहे. आई वडिलांसह पाच बहिणी आणि एक भाऊ असे हे कुटुंब. दहावी पर्यंतचे शिक्षण काश्मीर मधूनच पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ती लखनऊ येथे आली. हीच शामिमा पुढे सरहद सारख्या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात आली. सरहद ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी गेल्या तीस वर्षांपासून भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये शांततेसाठी कार्यरत आहे. 

गेल्या तीन दशकांमध्ये सरहदने आपल्या अस्सल आपुलकीने आणि निःस्वार्थ कार्याद्वारे भारताच्या प्रवण सीमा संघर्षात राहणाऱ्या लोकांच्या मनात आणि हृदयात स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. आणि इथूनच तिचा काश्मीर ते पुणे असा प्रवास सुरु झाला. २०१७ साली पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ती पुण्यात आली त्यावेळेस सरहदचे संस्थापक संजय नहार यांच्याशी ओळख झाली. परंतु शिक्षण पूर्ण करण्यासाठी लखनऊ येथे परत गेली. संगीत विशारद झाल्यानंतर २०१८ साली ती पुन्हा पुण्यात आली आणि पुणेकर होऊन गेली. २०२२ मध्ये विवाहबद्ध झाली. आणि भारताच्या नंदनवनात जन्मलेल्या शामिमाचे पुणे आता दुसरे माहेर झाले असल्याचे तिने सांगितले.  

संगीत क्षेत्राकडे कशी वळली:
लहानपणापासून घरातून संगीताचा सहवास लाभला. तिचे नाना (आजोबा) कवी होते. ते रबाब हे काश्मिरी वाद्य वाजवत असत. तिचे दादाजी (आजोबा) कश्मीर मधील मोठे संत ‘पीर’ कवी होते. दोघेही काश्मिरी सुफी संत लाला अरागमी यांचे अनुयायी होते. मावशी दूरदर्शन मध्ये गायिका होती. त्यामुळे संगीत कानावर पडायचे. त्यामुळे संगीतातील रुची वाढली. हीच रुची पाहून वडिलांनी श्रीनगर येथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी पाठवायचे ठरवले. पुढे चालून त्यातच भातखांडे संगीत विद्यापीठ, लखनऊ येथून विशारद पदवी मिळवली. 

महाराष्ट्र संत परंपरेतील अभंग गाण्यामागची प्रेरणा:
शामिमा यांनी संत साहित्यातील पहिले काव्य गायले ते होते पसायदान. पसायदान विषयी बोलताना शामिमा म्हणतात कि संत महात्माची परंपरा खूप मोठी आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान हे संपूर्ण विश्वाला उद्देशून लिहिले आहे. त्यामुळे इथे हिंदू मुस्लिम असे विभाजन न करता माणुसकीच्या नात्याने या सर्व साहित्य कडे पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणापासून सर्वधर्म समभावाची शिकवण मिळत होती त्यामुळे अल्ला-ईश्वर सर्व एक आहेत आणि हे सर्व अभंग गाताना हिंदू किंवा मुस्लिम असे न पाहता एक माणुसकीच्या नात्याने हे गायन करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शिवाय घरातून नेहमी सर्व धर्म समभावाची शिकवण मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्रीयन आणि काश्मिरी संत लोकांपर्यंत पोहचवण्याचा मानस आहे.

समाजाची प्रतिक्रिया:
ही सर्व वाटचाल सुरु असताना समाजाची एकूण काय प्रतिक्रिया होती यांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले कि, कुटुंबाकडून तर पूर्ण पाठींबा होता. परंतु नातेवाईकांकडून सुरुवातीला विरोध होता. आता मात्र तेच समाजातील एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात. शामिमा यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांशी लढताना माझ्या पाच मुली पाच मुलांसारख्या आहेत म्हणून शिक्षणासाठी पुढाकार घेतला.

त्यांचे अनुभव सांगताना त्यांनी चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव सांगितले, लखनऊमध्ये हिंदू मुस्लिम असा फरक जाणवला नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये मला नाही, पण माझ्या काही मुस्लिम सहकाऱ्यांना थोडासा चुकीचा अनुभव आल्याचे सांगितले. 

धर्मिक ऐक्य :
धार्मिक ऐक्यावर बोलताना त्यांनी सांगितले कि, काश्मीर मध्ये आम्ही पंडितांच्या भागात लहानाचे मोठे झालो तिथे हिंदू मुस्लिम असा कोणत्याही प्रकारचा भेदाभेद नव्हता. आम्ही नेहमी एक मोठे कुटुंब असल्यासारखेच होतो. माझ्या शिक्षणाच्या वेळी काश्मिरी पंडित जे माझ्या वडिलांचे मित्र होते रतनलाल त्यांनीच माझ्या आई वडिलांना समजावले. त्यांच्यामुळेच मी बाहेर शिक्षणसाठी येऊ शकले. विशेष म्हणजे त्यांना आम्ही मम्मा आणि डँडा म्हणायचो. सर्व धर्म, ईश्वर एक आहेत फक्त रूप अनेक आहेत हेच आतापर्यंत आम्ही शिकलो आहोत आणि तेच जगलो आहोत, असेही त्यांनी निक्षून सांगितले. 

संगीत आणि धर्म
मी वेगवेगळ्या धर्मातील अभंग गाते या सगळ्याचा विचार करता कोणत्या धर्माचा, जातीचा अभंग गाते यापेक्षा मनापासून गायला पसंती देते. मी मनापासून गाते आणि ऐकते यात धर्म,जात, पंथ कुठेच येत नाही. मी मराठी सोबतच, कन्नड अभंग गायले आहेत.   

भविष्यातील प्रयोजन:
भविष्यात बरेच काही करायचे स्वप्न असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. जसे कि, येणाऱ्या पिढीला नव्या नव्या गोष्टींची ओळख करून देणे, त्यांना त्या गोष्टी शिकवणे. गावातील मुले ज्यांना संगीत क्षेत्राची आवड आहे मात्र त्यांना त्याबद्दल माहिती नाही त्यांना त्या क्षेत्राची ओळख करून देणे. तसेच रबाब - एक काश्मिरी वाद्य आहे. ज्याचा उगम ७व्या शतकात झाला असून त्याची मुळे मध्य अफगाणिस्तानात आढळतात. याचा उल्लेख पर्शियन पुस्तकांमध्ये आणि अनेक सूफी कवींनी त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा आठवतो. हेच वाद्य शिकवणी साठी एक अकादमी सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. यापलीकडे जाऊन लोकांची नकारात्मक दृष्टी बदलावी आणि समाजात शांतता पसरावी यांसाठी काम करण्याची इच्छा दाखवली. 

समाजाला संदेश: 
समाजातील धार्मिक तेढ, वाढता असंतोष यांवर पर्याय म्हणून काही करायचे असेल तर याची सुरुवात आपल्या घरापासुन झाली पाहिजे असा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आई वडिलांनी मुलांना वाढवताना सर्वधर्म समभावाची वागणूक दिली पाहिजे. सर्वांनी मिळून मिसळून वागले पाहिजे. एकमेकांना मदत केली पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला. आई वडिलांनी मुलीना शिकवलं पाहिजे, त्यांना पाठबळ दिल पाहिजे. मुस्लिम समाजातील परदा पद्धतीवर बोलताना त्यांनी पडद्यात राहूनही खूप काही करता येऊ शकते. आजच्या काळात मुलीनी बरीच  काही मिळवले आहे. असा संदेश दिला. सोबतच लोकांनी त्यांचे नाकारात्मक विचार बदलावे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असावे.