उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याकडे पाहिले जाते. अशात धुळे शहर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार अनिल गोटे तर महायुतीतून भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच एमआयएमकडून विद्यमान आमदार फारूक शाह तर समाजवादी पार्टीकडून इर्शाद जहागीरदार हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.
एकेकाळी धुळे शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु भाजपने हा जिल्हा काबीज केला आणि त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने धुळ्यात आपले पाय रोवले. २००९ मध्ये लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून तर २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत अनिल गोटे यांनी या मतदार संघावर विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र एमआयएमचे आमदार फारुक शहा यांनी ४६ हजार ६७९ मतांनी निवडून येत आपले वर्चस्व स्थापन केले. तेव्हा धुळे शहर विधानसभा मतदारसंघासारख्या हिंदूबहुल भागातून प्रथमच मुस्लिम उमेदवार विजयी झाला होता. यंदा मात्र या विधानसभेत २ मुस्लीम उमेदवार आमनेसामने आले आहेत. विद्यमान आमदार फारूक शाह यांना समाजवादी पार्टीकडून लढत असलेले इर्शाद जहागीरदार यांचे तगडे आव्हान असणार आहे.
इर्शाद जहागीरदार यांचा राजकीय प्रवास…
इर्शाद हे मुळचे पुण्याचे. त्यांनी जगातील नामांकित हार्वर्ड यूनिवर्सिटीतून पदवी घेतली, पुढे इंग्लंडमधून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण तर न्युझीलंड येथून अॅग्रीकल्चर विभागात पदवी प्राप्त केली. त्यानंतर २००८ मध्ये ते धुळ्यात आले. धुळ्यातील सामाजिक समस्यांचा आढावा घेत त्यांनी तेथील स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवत काम करण्यास सुरुवात केली. विशेषतः धुळे शहरातील ग्रामीण भागात जागोजागी अडीचशे हून अधिक बोरवेल बांधून त्यांनी नागरिकांच्या पाणी प्रश्नाचे निराकरण केले. हे समाजकार्य अधिक मोठ्या स्तरावर नेण्यासाठी त्यांनी राजकीय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.
एकेकाळी अजित पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या इर्शाद यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी पक्षातून केली होती. पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची धुरा ते सांभाळत होते. मात्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. यंदाची धुळे शहर मतदारसंघाची विधानसभा निवडणूक ते समाजवादी पार्टीकडून लढवत आहेत.
धुळ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर इर्शाद यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले असल्याचे ते सांगतात. याविषयी बोलताना ते म्हणतात, “विरोधक माझ्यावर टीका करतात की मी धुळ्याचा नाही तरीही, इथून निवडणूक कशी लढवतोय. परंतु मी धुळ्यात जन्म घेतला नाही यात माझा दोष आहे का.. मी अचानक उठून निवडणूक नाही लढवली तर, १६ वर्ष धुळ्याची प्रामाणिक सेवा केल्यानंतर मी हा निर्णय घेतलाय. विरोधक हा मुद्दा उचलून धरतायेत कारण त्यांच्याकडे दुसरा ठोस मुद्दाच नाहीये.”
धुळ्यातील प्रमुख समस्यांबद्दल बोलताना ते सांगतात, “मी समाजकार्य सुरु केल्यापासून धुळ्यातील ३ मुख्य गोष्टींवर नियमित काम करत आलोय. इथे आल्यानंतर सर्वात आधी धुळेकरांना मी स्वखर्चातून पाण्याची व्यवस्था करून दिली. दुसरे म्हणजे दरवर्षी ३००० गरीब विद्यार्थ्यांना मी मोफत वह्यापुस्तकांचे वाटप करतो आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे संपूर्ण वैद्यकीय उपचार न घेऊ शकणाऱ्या रुग्णांना मी १ महिन्याची औषधे मोफत देतो. या व्यतिरिक्त माझ्या हातून जे काही समाजकार्य घडेल ते मी घडवत राहणार. मग माझ्याकडे कोणतेही पद असो किंवा नसो.”
पुढे बोलताना ते म्हणतात, “शहराला फक्त पाणी देणे म्हणजे विकासकाम असं मी समजत नाही. पाणी, वीज, कचरा, रस्ता सुधारणे ही कोणतीच विकासकामे नाहीत तर, ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. परंतु जनतेच्या याच मुलभूत गरजा धुळे शहरात पूर्ण होत नाहीयेत. शहराची परिस्थिती सुधरवण्यासाठी राज्यसरकारची मदत लागणार आहे, काही प्रमाणात केंद्रसरकारची मदत लागणार आहेत आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक आमदार पाहिजे जो या सगळ्या समस्या मार्गी लावेल. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी १००% प्रयत्न करेल आणि माझ्याकडे या सगळ्या गोष्टींचा अजेंडा सुद्धा तयार आहे.”
विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर बोलतना इर्शाद यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणतात, “धुळ्यातील जनतेचा पाणीप्रश्न सोडवत असताना माझ्या मनात कधी आमदारकीचा विषय आलाच नाही. परंतु देवपूरमध्ये एका ठिकाणी मी बोरवेलचे काम करायला जात असताना एक काँक्रीटचा नवीन रस्ता होता. त्यांनतर महिनाभरातच मी पुन्हा त्या रस्त्याने प्रवास करत असताना पहिले की खड्यांनी भरलेल्या त्या रस्त्याला डांबराने बुजवले होते. या प्रकरणांनंतर आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हा प्रश्न उघडकीस आणला आणि मग त्या संदर्भातील लोकांवर कार्यवाही झाली. त्यानंतर मी भ्रष्टाचाराविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.”
याविषयी पुढे बोलताना ते म्हणतात, “मी E-C-D हे तीन मुद्दे घेऊन मादानात उतरलो आहे. E म्हणजे एम्प्लॉयमेंट… रोजगार निर्मिती. मला धुळे शहरात ५ वर्षात ५ हजार रोजगार उभे करायचे आहेत. दुसरा मुद्दा C म्हणजे करप्शन फ्री. मला भ्रष्टाचार मुक्त धुळे करायचे आहे. शहराच्या सुधारणेच्या नावाखाली सुरु असलेले चोरांचे दुकानं मला बंद करायचे आहे आणि दर्जाहीन होत असलेली कामे मला दर्जेदार करायची आहेत. शेवटचा मुद्दा D म्हणजे डेव्हलपमेंट. रस्ते, वीज या मुलभूत सुविधांव्यतिरिक्त मला कमीत कमी अशा १० शाळा उभ्या करायच्या आहेत जिथे गरिबांची मुले दर्जेदार शिक्षण घेतील. शहरात केवळ महिलांसाठी मला कॉलेज उभे करायचे आहे, जिथे कार्यरत असणाऱ्या सुद्धा महिलाच असतील.”
शेवटी ते म्हणतात, “मला या मतदार संघातून निवडून जायचे मुख्य कारण म्हणजे धुळे शहरात पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. आत्ता मी समाजकार्याच्या माध्यमातून माझ्या स्तरावर बोरवेलद्वारे पाणीप्रश्न सोडवतच आहे परंतु, यासंदर्भातील धोरणे राबवायची असतील तर मला विधिमंडळातच जावे लागेल. त्याठिकाणी मला हे प्रश्न मांडायचे आहेत. त्यासाठी मला निवडून येणे गरजेचे आहे.”
सज्जाद नोमानी यांनी ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे काय होणार परिणाम
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील २६९ जागांवर पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची यादी जारी केली होती. ती यादी जाहीर केल्यानंतर धुळ्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. धुळ्यातील विद्यमान आमदार फारूक शाह यांना पाठींबा न देता नोमानी यांनी समाजवादी पार्टीला पाठींबा दिला. मागील निवडणुकीत कमी मतदान झाले असताना देखील समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांना पाठींबा जाहीर केला होता. परंतु मतदानाच्या तोंडावर २ दिवसापूर्वी धुळ्यातील काही मौलवी आणि धर्मगुरू नोमानी यांना भेटायला गेले आणि फारूक शाह यांच्या नावाची शिफारस केली. त्यांच्या शिफारसीवरून सज्जाद नोमानी यांनी विद्यमान आमदार फारूक शाह यांना नव्याने पाठींबा जाहीर केला.
ऐनवेळी घडलेल्या या घटनेमुळे इर्शाद जहागीरदार यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या कार्याक्रत्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले. मात्र दुसरीकडे इर्शाद यांचा ठाम विश्वास आहे की केलेल्या कामामुळे लोक त्यांनाच निवडून देतील. परंतु निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल की सज्जाद नोमानी यांनी ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयाचा फटका नक्की कुणाला बसणार.
- भक्ती चाळक