सत्तरच्या दशकातील फुटबॉलच्या जगात ‘बडे मिया’ म्हणून प्रसिद्ध असलेले, भारताचे दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचे काल निधन झाले. काल १५ ऑगस्ट दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते ७४ वर्षाचे होते.
१७ जुलै १९४९ मध्ये तेलंगणा (पूर्वीचे हैदराबाद) मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आयुष्यातला बराचसा काळ ते कोलकत्यात वास्तव्याला होते. काही वर्षांपूर्वी ते हैदराबाद येथे स्थायिक झाले होते. गेली काही वर्षे ते डीमेंशिया आणि पार्किन्सन्स या आजारांनी ग्रस्त होते. परंतु मागच्या एका वर्षापासून ते अंथरूनाला खिळून होते. शेवटी काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.
मोहम्मद हबीब यांची कारकिर्द:
भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधारपदी राहिलेले हबीब यांची गणना देशातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये केली जायची. १९७० मध्ये बँकॉक इथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये हबीब यांनी भारताला कांस्य पदक मिळून दिले होते.
भारताकडून त्यांनी ३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, त्यात त्यांनी ११ गोल केले. याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर ते कोलकत्त्यातील मोहन बागान, इस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंग या क्लबकडून खेळले. १९६५ ते १९७६ या काळात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले.
फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर ते टाटा फुटबॉल अकादमीचे प्रशिक्षक बनले. शिवाय हल्दिया येथे भारतीय फुटबॉल संघ अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी मोहन बागान आणि मोहम्मडन स्पोर्टिंग यादोन्ही क्लबमध्ये खेळाडूंना प्रशिक्षण दिले. खेळातील योगदानासाठी त्यांना १९८० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.
हबीब यासाठी होते प्रसिद्ध:
१९७७ मध्ये पेलेच्या संघाविरूद्ध केलेल्या गोलमुळे मोहम्मद हबीब यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली. १९७७ मध्ये इडन गार्डन येथे हा सामना झाला होता. पावसात झालेल्या या सामन्यात पेले यांच्या कॉस्मॉस क्लबविरूद्ध गोल केला होता. या संघात पेले, कार्लोस अलबर्टो, जॉर्जियो सी यांसारखे दिग्गज खेळाडू होते. हा सामना २-२ असा ड्रॉ झाला. या सामन्यानंतर पेलेने हबीब यांचे कौतुक केले होते.
पहिले ‘व्यावसायिक खेळाडू’ म्हणून लौकिक:
कोलकता येथील विविध क्लबकडून खेळणारे हबीब ‘व्यावसायिक खेळाडू’ म्हणून ओळखले जात. ते जीव ओतून खेळायचे. मोठ्या आणि महत्वपूर्ण सामन्यांमध्ये ते हुकमी खेळी करायचे. त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांना ‘भारतीय पेले’ म्हणून संबोधले जाते.