इद्रिस नायकवडी : विधानपरिषदेतील एकमेव मुस्लिम प्रतिनिधी

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवडी
विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवडी

 

फजल पठाण 
 
नुकतीच महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा करण्यात असून आचारसंहिता लागली आहे. यामुळे सर्वत्र निवडणुकीची तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्रात अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून रखडलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा निर्णय देखील यात झाला. आचारसंहितेपूर्वी  महायुतीने राज्यपाल नियुक्त बारा आमदारांपैकी सात आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. या सर्व सात आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. 

विधानपरिषदेवर भाजपला तीन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजप कडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली. शिवसेनेकडून मनीषा कायंदे, हेमंत पाटील तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे. यात सर्वांत जास्त चर्चा रंगली आहे ते इद्रिस नायकवडी यांच्या नावाची. 

कोण आहेत इद्रिस नायकवडी 
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून नायकवडी कुटुंब पक्षासोबत होते. नायकवडी यांचे वडील इलियास नायकवडी शरद पवार यांचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. पक्षाच्या उभारणीसाठी राज्यभर त्यांनी दौरे केले. इद्रिस नायकवडी हेदेखील गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात काम करत आहेत. ते मिरजेतील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात.  सांगलीच्या मिरजमध्ये त्यांनी राष्ट्रवादी विचारांची पेरणी केली आहे. सांगली मिरज मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. तसेच ते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे माजी महापौरदेखील राहिले आहेत. इद्रिस नायकवडी यांनी सातत्याने अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

विधान परिषदेत पुन्हा मुस्लिम प्रतिनिधि
लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणूक पार पडली होती. इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीत विधानपरिषद एकही मुस्लिम प्रतिनिधि निवडून गेला नव्हता. यावरून राज्यभर टीका आणि चर्चा झाली होती. शिवाय बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु आता राष्ट्रवादीकडून सांगली मिरजचे नेते इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे. नायकवडी यांनी राष्ट्रवादी कडून विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. या शपतविधीमुळे विधानपरिषदेवर पुन्हा मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. 

इद्रिस नायकवडी यांना संधी देऊन राष्ट्रवादीने काय साध्य केले ? 
लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडली. फूटीनंतर ४० आमदार अजित पवारांसोबत गेले. या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांनी राज्यात एकही  मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. यामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याचे बोलले गेले. यामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. 

आता विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. मुस्लिम समाजातून येणाऱ्या इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. नायकवडी यांना संधी देऊन अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. 

विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर काय म्हणाले नायकवडी
आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर इद्रिस नायकवडी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले ,  “ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका फक्त अजितदादांची आहे, हे त्यांच्या निर्णयायतून दिसते. गेल्या २०-२५ वर्षांपासून माझे कुटुंब राष्ट्रवादी सोबत आहे. मी केलेल्या कामाची दखल घेत दादांनी मला विधानपरिषदेवर संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.” 

पुढे ते  म्हणाले, “ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाला राष्ट्रवादीसोबत जोडण्यासाठी जे करावे लागेल ते मी करणार आहे. तसेच महाराष्ट्राचा दौरा करत अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना भेटणार आहे.” 

इद्रिस नायकवडी यांच्या रूपाने विधानपरिषदेवर पुन्हा मुस्लिम प्रतिनिधीची वर्णी लागली आहे. प्रत्येक समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले तरच समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे. अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले तर ही सुदृढ राजकारणासाठी महत्वाची बाब ठरेल.

- फजल पठाण 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter