शतायुषी मराठी व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 Months ago
मराठी व्याकरणकार डॉ. यास्मिन शेख
मराठी व्याकरणकार डॉ. यास्मिन शेख

 

डॉ. शमसुद्दीन तांबोळी

सात्विक, समृध्द आणि संपन्न आयुष्याचे वरदान लाभलेले आणि त्यात स्वकृत्वाने मानवी जीवन अधिक सुंदर करणारे अशा असामान्याची संख्या फार कमी असते. मराठी भाषा व्याकरण तज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख या अशा अतिनिवडक असामान्याच्या श्रेयनामावलीतील एक सदा प्रसन्न चेहरा. आज (२१ जून) रोजी त्या वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत. ही घटना अनेकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची तर आहेच तसेच समाजासाठी आदर्शाचा मोठा ठेवा आहे. अर्थात या उत्तम, दीर्घ आणि आरोग्यसंपन्न आयुष्यास त्यांची शिस्तबद्ध जीवनशैली आणि शमाताई भागवत, रुक्साना बाविस्कर या कन्या, कुटुंबातील अन्य सदस्य, त्यांचे डॉक्टर या सर्वांना त्याचे श्रेय द्यायला हवे. डॉ. यास्मिन शेख यास देवाची कृपा मानतात. त्यांची देव आणि देवावरची भक्ती अत्यंत निर्मळ आहे. 

ज्यू कुटुंबात जन्माला आलेल्या  आणि वडिलांच्या शासकीय नोकरीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात वास्तव्य केलेल्या मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे आयुष्य अनेकांगानी विस्मयकारक आहे. लेखक भानु काळे  त्यांची ओळख 'सदाप्रसन्न वैयायोगिनी' अशी  करून देतात. भानु काळे संपादक असलेल्या आणि मराठी जनमानसात मानाचे स्थान मिळवणाऱ्या 'अंतर्नाद' या दर्जेदार मासिकाच्या व्याकरण  सल्लागार म्हणून त्यांनी पंधरा वर्षे  योगदान दिले आहे. मराठी विषयाचे अध्यापन आणि मराठी भाषा शुध्दलेखन तज्ज्ञ म्हणून डॉ. यास्मिन शेख यांचा जीवन प्रवास हा खऱ्या अर्थाने  महाराष्ट्र आणि मराठी भाषेचे मोठे  वैभव आहे. 

डॉ. यास्मिनताई यांचा स्नेह आणि आशीर्वाद मलाही लाभले यामुळे मी स्वतः भाग्यवान समजतो. ही माझ्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील विशेष उपलब्धी आहे. अनेकवेळा ताईंना भेटण्याचा, अनौपचारिक गप्पा मारण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा, त्यांचे कडूगोड जीवनानुभव ऐकण्याचा आनंद घेतला. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर एखादा ग्रंथ प्रसिद्ध व्हायला हवा होता पण तो झाला नाही. ही कमतरता त्यांच्या शंभरीनिमित्त काही प्रमाणात पूर्ण होणार आहे याचा खूप आनंद झाला. कारण लेखक मा. भानू काळे, दिलीप फलटणकर यांनी संपादित केलेल्या 'यास्मिन शेख : मूर्तिमंत मराठीप्रेम' या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले.   

पुण्यातील बाणेर रोडवरील डॉ. शमा भागवत यांच्या घरी ताईशी गप्पा मारताना त्यांनी त्या प्राथमिक शाळेत असतानाचे काही मनोरंजक तसेच संस्कारमय किस्से सांगितले. एकेदिवशी शाळेचा गणवेश न घालता गेलेल्या जेरुशा रूबेनवर वर्ग शिक्षिका रागावल्या. गणवेश का घातला नाही? या प्रश्नाचे उत्तर न देता  त्या शांत राहिल्या. शेवटी बाकावरच्या वर्गमैत्रणीने शिक्षिकेला सांगितले की 'आज जेरुशाचा वाढदिवस आहे.' ज्या विद्यार्थ्यांनीचा वाढदिवस असतो, त्यांना त्या दिवशी गणवेश न घालण्याची मुभा असायची. स्वतः चा वाढदिवस आहे हे सांगायलाही संकोच करणाऱ्या जेरुशा होत्या. हा दिवस होता २१ जून. तेव्हा शिक्षिका म्हणाल्या, "तू खूप मोठी होणार आहेस, कारण २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि हा तुझा जन्मदिवस आहे." डॉ. यास्मिन शेख वयाने तर मोठ्या म्हणजे शतायुषी तर झाल्याच शिवाय स्वकृत्वानेही खूप मोठ्या झाल्या.  शिक्षकेचा शब्द खरा ठरला. 

वडिलांच्या नोकरीनिमित्त हे कुटुंब पंढरपूरला स्थायिक झाले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी कुटुंबातील आणि  इतर मुलींसोबत त्या मंदीर बघायला गेल्या. त्यांचा रंग आणि कपड्यावरून स्थानिक पुजाऱ्यांच्या लक्षात आले की या हिंदू नाहीत. त्यांना  मंदीर पाहण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. समाजात अशाप्रकारच्या विषमतावादी प्रथा आहेत याची जाणीव त्यांना लहान वयात अनुभवायला आली. या अनुभवामुळे त्यांना वाईट वाटले मात्र त्याबद्दल त्यांनी कटुता वाटू दिली नाही. या स्वभावामुळे त्यांच्या व्यक्तित्वातील सात्विकता बहरली. मनाचा निर्मळपणा, शिस्त, बुध्दीमत्ता आणि परिश्रम या चार स्तंभावर आधारलेल्या डॉ. यास्मिन शेख यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक पैलू म्हणजे परिपूर्णतेचा ध्यास आणि स्पष्टवक्तेपणा! त्या स्वतः बहरल्या आणि अनेकांना सावली दिली. ही उत्तुंगता आणि दिव्यत्त्व लाभलेल्या ताईंबद्दल थोडेतरी लिहण्याची ही संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. 

मुस्लीम सत्यशोधक मंडळाने २०२१मध्ये 'सत्यशोधक फातीमाबी शेख कार्यगौरव सन्मान' पुरस्काराने यास्मिनताईंना सन्मानित केले होते. यानिमित्ताने त्यांची तसेच त्यांची कन्या शमाताई आणि रूक्सानाताईची जवळून ओळख झाली. डॉ. यास्मिन शेख यांच्याकडे जो अनुभवाचा फार मोठा खजिना आहे जो झऱ्याप्रमाणे अखंड वाहत असतो. कुटुंबाशी निकटचे स्नेहबंध असणाऱ्या ज्येष्ठ मराठी साहित्यिकांकडून त्यांची शेख कुटुंबियांशी ओळख झाली आणि त्यांचा डॅडी शेख यांच्याशी विवाह झाला. सासूबाईंना जेरूशा हे नाव उच्चारताना अडचण येत असल्याने जेरूशा हे नाव मागे पडले आणि त्या 'यास्मिन' झाल्या. मात्र शेख परिवाराच्या अत्यंत जवळ असणारे खलील यांनी धर्म न बदलण्याचा सल्ला दिला आणि धर्मांतराचा प्रश्नच आला नाही. डॅडी शेख कुटुंबातील महिलेने पूर्वी अंतरधर्मीय विवाह केलेला असल्याने आणि कुटूंबाची पार्श्वभूमी तशी पुरोगामी असल्याने हा अंतरधर्मीय विवाहाचा वारसा सदाप्रसन्न यास्मिनताईच्या मुलींनीही पुढे चालवला.
 
मानवता हाच आपला धर्म आहे असा स्वभावधर्म असल्याने या कुटुंबात मानवतेचा  झरा वाहतो. मात्र त्यांना आणखी एका कटू अनुभवातून जावे लागले. या  कुटुंबीयांच्या नावात मुस्लीम असल्याने सुमारे पन्नास वर्षांपूर्वी त्यांना घर नाकारण्यात आले होते. यावेळी झालेल्या क्लेशाची आपण फक्त कल्पना करू शकतो. मात्र त्यातून जाताना झालेले वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या आहेत.

समाज सुधारक हमीद दलवाई आणि यास्मिनताईंची ओळख होती मात्र ही ओळख तशी  योगायोगाने झाली होती. त्यावेळी यास्मिनताई  आकाशवाणी केंद्राच्या विविध कार्यक्रमाचे लेखन करीत तसेच जमेल तेव्हा अशा कार्यक्रमात सहभागही घेत असत. एकदा आकाशवाणीने यास्मिनताईंना मुस्लीम महिलांच्या प्रश्नांवर मराठी लेखन करण्याची विनंती केली होती. यास्मिनताई स्वत: ज्यू कुटुंबात वाढलेल्या असल्याने  आणि सासरची पार्श्वभूमी प्रागतिक असल्याने मुस्लीम महिलांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष अशी  फारशी माहिती नव्हती. ही अडचण ताईंनी त्यांच्या परिचयातील आणि स्नेहभाव असलेले साहित्यिक श्री. पु. भागवतांकडे मांडली. श्री. पु. भागवत हे हमीद दलवाईना ओळखत होते तसेच ते दलवाईंचे मित्रही होते. त्यांनी यास्मिनताई आणि हमीदभाईची भेटच घडवून आणली. दलवाईसोबत चर्चा करून मुस्लीम महिलांचा प्रश्न समजून घेऊन ताईंनी या मुस्लीम महिलांच्या विषयावर आकाशवाणीसाठी लेखन केले होते. 

पूर्वाश्रमीच्या जेरूशा रुबेन असणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांचे मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्र हे अभ्यासाचे खास विषय आहे. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर जवळपास पस्तीस वर्षे अध्यापनाचे कार्य केले आहे. मुंबई येथील एस आय ई एस महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. शासनाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह करिअर' तर्फे आयएएस विद्यार्थ्यांना दहा वर्षे शिकवले. बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकाचे सात वर्षे संपादन केले. याच बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रकाशित झालेल्या 'कार्यात्मक व्याकरण' या पुस्तकात महत्त्वाचा सहभाग होता. मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्थेमार्फत 'मराठी लेखन मार्गदर्शिका' पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. 

या व्यतिरिक्त व्याकरणविषयक देशप्रदेशातून येणाऱ्या शंकाचे निरसन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आजही त्या आनंदाने वेळ देतात. या शिवाय विविध नियतकालिकांतून आणि वर्तमानपत्रांनामधून त्यांनी विपुल लेखन केले आहे. दै. लोकसत्ता या वर्तमानपत्रात दर सोमवारी प्रसिद्ध होणारे 'भाषा सूत्र' हे दैनंदिन व्यवहारातील मराठी भाषेत होणाऱ्या त्रुटीवरील त्यांचे सदर लोकप्रिय ठरले. तसेच त्यांनी लिहिलेला 'मराठी शब्दलेखनकोश' हा ग्रंथ लेखक, संशोधक, विद्यार्थी, शिक्षक आणि पत्रकारांचा मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो. 

मुस्लीम सत्यशोधक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी मांडलेले विचार आजही आठवतात. त्या आपल्या अनुभवांबद्दल बोलताना म्हणाल्या,  माझ्या आडनावावरून अनेकजण मला विचारतात,"अहो, तुम्ही इतके छान मराठी बोलता! हे कसं काय?” त्यावर माझं हसून उत्तर असतं, "मराठी माझी मातृभाषा आहे. तुमच्यासारखंच मी बोलते. छान-बिन काही नाही." हाच असा अनुभव माझ्यासारख्या अनेकांना येतो. अर्थात यास मराठी न बोलणारे, मराठीबद्दल दुस्वास बाळगणारे  मुस्लीम समाजातील लोकही जबाबदार आहेत. 

बोलीभाषा-प्रमाणभाषा या वादात मराठी भाषेबद्दल डॉ. यास्मिन शेख एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात. त्या म्हणतात, "मराठीच्या अनेक पोटभाषा आहेत. आपण कोणतीतरी बोली बोलत असतो. सातारी, कोल्हापूरी, वह्राडी, अहिराणी, पुणेरी इत्यादी. मात्र औपचारिक लेखनासाठी जी भाषा वापरली जाते, ती प्रमाण भाषा होय. मराठीची प्रमाणभाषा ही एक संकल्पनाच आहे. वर्तमानपत्रात, मासिकात, शास्त्रीय ग्रंथात, वैचारिक, वैज्ञानिक लेखनात, शासकीय पत्रव्यवहारात जी भाषा वापरली जाते, ती प्रमाणभाषा होय. प्रत्येकाने 'मी जसं बोलतो तसंच लिहणार' असा हट्ट करणं चुकीचे आहे. असा अट्टाहास केल्यास लेखनात अनागोंदी माजेल हे विसरु नका." अर्थात यास्मिनताई यांच्या या विधानावर मतभेद होऊ शकतात, तरीही हा मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही. 

मराठी शब्द उपलब्ध असताना इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर करणे, मराठी माध्यमांच्या शाळांची दुरवस्था, मराठीबद्दल दैनंदिन व्यवहारात दिसून येणारी उदासीनता, शासकीय नोकरी मिळवताना मराठी अनिवार्य नसणे आणि भाषाविषयक धोरणात्मक अभाव यासंदर्भात डॉ. यास्मिन शेख यांनी केलेली चिकित्सा समजून घेणे आवश्यक आहे. मराठीच्या अशा दुरवस्थेमुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात अडचणी असल्याच्या निदानावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

डॉ. यास्मिन शेख यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले असले तरी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केलेल्या डॉ. यास्मिन शेख यांचा उचित गौरव झाला पाहिजे. त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यायला हवा. हे मात्र खरं की डॉ. यास्मिन शेख अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या कितीतरी पुढे गेल्या आहेत. त्यांचा गौरव त्यांच्यासाठी नसणार आहे तो आपण केलेला आपलाच गौरव ठरेल. 

शंभरी उंबरठ्यावर आलेल्या सात्विक, संपन्न आणि कृतार्थ आयुष्य जगणाऱ्या मराठी भाषातज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांना शंभरीत पदार्पण केल्याबद्दल कृतज्ञतेचा सलाम आणि हार्दिक शुभेच्छा!

- डॉ. शमसुद्दीन तांबोळी

(लेखक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत.  [email protected] या मेल आयडीवरून त्यांच्याशी संपर्क साधता येईल.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter