ज्येष्ठ कवि मुबारक शेख यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करताना मान्यवर
जगभरातील मराठी साहित्याला मोठा इतिहास आणि परंपरा राहिली आहे. मराठी साहित्याला एका उंचीवर पोहचवण्यासाठी मराठीसह मुस्लिम साहित्यिकांचे योगदान आहे. मुस्लिम कवी, लेखक आणि संतांनी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भांमधुन मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे काम केले आहे. यापैकीच एक नाव म्हणजे सोलापुरातील ज्येष्ठ कवी मुबारक शेख. नुकतेच नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयातर्फे मुबारक शेख यांचा सत्कार करण्यात आला. या वाचनालयातर्फे मुबारक शेख यांच्या ‘अजान आणि चालिसा’ या काव्य संग्रहास कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे व उत्त कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुबारक शेख यांचा जन्म १९६१मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गिरणीमध्ये कामाला सुरुवात केली. तब्बल चौदावर्ष त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले आहे. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातदेखील काम केलेल आहे. शेख यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रक्षित झाली आहेत. यामध्ये चार काव्य संग्रह, गझलसंग्रह, बालकवितासंग्रह आणि समीक्षा अशा पुस्तकांचा समावेश आहे.
साहित्याकडे कसे वळाला असे विचारले असता मुबारक शेख म्हणतात, “सुरुवातीला मी गिरणीमध्ये काम करतो होतो. हे काम करत असताना गिरणीमध्ये कामगार कवी संमेलने होत होती. या संमेलनाच्या माध्यमातून मी साहित्याकडे वळालो. याचवेळी मी कवी नारायण सुर्वे यांच्या संपर्कात आलो. सध्या मी साहित्यातले वेगळवेगळे प्रकार हाताळत आहे. परंतु सुरुवातीपासूनच माझे भावना मांडण्याचे प्रमुख माध्यम कविता राहिले आहे.”
पुरस्काराचे स्वरूप आणि महत्व
नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराविषयी बोलताना मुबारक शेख म्हणतात, “सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माझे आणि नारायण सुर्वे यांचे चांगले संबंध होते. माझ्या ‘अजान आणि चालिसा’ या काव्य संग्रहास नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार मिळणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. या पुरस्काराविषयी बोलायचे झाल्यास नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित वाचनालय कोणतेही पुस्तक लेखकाकडून मागवत नाही. वाचनालयात आलेल्या पुस्तकांतून ते एका साहित्याची निवड करतात. साहित्य निवडीची प्रक्रिया ते गुप्त ठेवतात. साहित्याची निवड झाल्यानंतर ते लेखकाला कळवतात.”
पुरस्काराचे स्वरूप सांगताना ते म्हणतात, “कवी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कारात लेखकाला रोख रक्कम म्हणून दहा हजार रुपये दिले जातात. तसेच एक स्मृती चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन लेखकाला सन्मानित केले जाते.
‘अजान आणि चालिसा’ काव्य संग्रहात काय?
एखादे पुस्तक लिहण्यासाठी सुरुवातीला विषयाची आणि विचाराची गरज असते. त्यांनंतर विषयाशी निगडीत संदर्भ, माहिती गोळा करणे आवश्यक असते. ‘अजान आणि चालिसा’ या काव्य संग्राहाविषयी सांगताना मुबारक शेख म्हणतात, “जेव्हा मस्जिदींवर भोंगे सुरू झाले तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी भोंग्यावर हनुमान चाळिसा लावण्यात आली. हळूहळू याला राजकीय रंग आला. यामुळे समाजातील सौहार्दाचे वातावरण बिघडले. समाजात तणाव निर्माण झाला. या विषयावर आधारित मी तुलनात्मक रचना केल्या आणि ‘अजान आणि चालिसा’ या काव्य संग्रह तयार झाला.”
पुढे काव्य संग्रहातील गोष्टींवर बोलताना ते म्हणतात, “हा काव्य संग्रह राजहंस प्रकाशनने प्रकाशित केला आहे. मस्जिदींवरील भोंगे आणि मंदिरातील हनुमान चाळीसाविषयी मुस्लिमांचे तसेच हिंदूंचे काय म्हणणे आहे हे सकारात्मकदृष्ट्या मी या काव्य संग्रहात मांडले आहे. जगण्यासाठी धर्म माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही. तरीही माणूस धर्माच्या मागे किती लागला आहे, धर्माच्या नावाने कसे राजकारण केले जाते हे विषय मांडले आहेत. तसेच मुस्लिम समाजातील अनेक मूलभूत प्रश्न मांडले आहेत.”
मराठी मुस्लिम साहित्यिकांची कोंडी
मराठी मुस्लिम साहित्यिकांवर बोलताना ते म्हणतात, “अलीकडे मुस्लिम समाजातील साहित्यिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मराठी मुस्लिम वेगळ्याच कोंडीत सापडला आहे. आम्ही लेखकांनी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचारावर लिहले तर आम्हाला देशद्रोही बोलले जाते. दुसरीकडे मुस्लिम धर्मातील अनिष्ठ प्रथा किंवा परंपराविषयी लिहले तर धर्मद्रोही ठरतो. ही तयार झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न मी ‘अजान आणि चालिसा’ या पुस्तकातून केला आहे.”