इस्लामी समाजक्रांतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या हजरत आएशा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 28 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

इस्लामच्यापुर्वीचे स्त्रीजीवन पितृसत्ताक समाजरचनेतील दुय्यमत्वामुळे राजकीयदृष्ट्या अदखलपात्र होते. टोळी समाजरचनेत विवाहसंस्था नैतिकतेची कोणतीही बंधनं मानत नव्हती. राजकीय स्थान नगण्य असल्यामुळे स्त्रियांचा राज्यव्यवस्थेवरील दबावही शुन्य होता. राजकीय प्रतिनिधित्वहीन गुलाम, मजूर आणि स्त्रियांच्या अवस्थेत फारसा फरक नव्हता. बलवान समाजघटकांसाठी हे तिघेही एनकेनप्रकारने आपल्या वर्चस्वाचा अहंकार प्रदर्शित करण्याचे माध्यम होते.  

प्रेषितांच्या क्रांतीची सुरुवात हीच मुळात दुबळ्या श्रमिकांच्या हक्कासाठी केलेल्या ‘हिल्फुल फुदूल’च्या कराराने झाली होती. त्यामुळे राज्यव्यस्थेत प्रतिनिधित्व विहीन असणाऱ्या श्रमिकांबरोबरच त्यांनी स्त्रियांनाही आपल्या जीवनकार्याचा उद्दीष्टबिंदू मानले होते. श्रमिक आणि गुलामांच्या बाबतीत प्रेषितकार्याची फलश्रुती नेमकी काय होती, याची चर्चा स्वतंत्रपणे करता येऊ शकेल. या लेखात आपण इस्लामी समाजक्रांतीची स्त्रियांविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रेषितांच्या पत्नी हजरत आएशा यांच्या जीवनाच्या आधारे इस्लामी तत्वज्ञानाचा धांडोळा घेणार आहोत. 

हजरत आएशा यांच्या माध्यमातून प्रेषितांवर आधुनिक जगातील इस्लामद्वेषी आणि प्रागतिकतेचे निवडक मापदंड वापरणारे अनेक अभ्यासक आरोपांची सरबत्ती करतात. त्यामुळे इस्लामवरील आक्षेपांच्या अनुषंगानेही हा विषय महत्वाचा आहे. सुरुवातीला हजरत आएशा या कोण होत्या, अरब टोळीजीवनात त्यांच्या कुटुंबाचे स्थान काय होते, हजरत आएशा यांचा जन्म आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती घेऊयात. 

हजरत आएशा कोण होत्या? 
हजरत आएशा यांचे पिता हजरत अबु बकर हे प्रेषितांच्यापश्चात इस्लामी राज्याचे पहिले खलिफा होते. हजरत अबु बकर हे इस्लामच्यापुर्वीपासून एक प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून अरबस्तानात प्रसिध्द होते. ते कुरैशी ए तैमिय्या या घराण्याचे होते. तर त्यांच्या पत्नी उम्मे रोमान या किनानीया या प्रसिध्द टोळीघराण्यातील होत्या. प्रेषितांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून अबु बकर ओळखले जातात. 

काही हबशी गुलाम असणाऱ्या व्यक्तींनी इस्लाम स्विकारल्यानंतर त्यांना त्यांच्या मालकांकडून प्रचंड त्रास दिला जात होता. या गुलामांपैकीच एक होते हजरत बिलाल. या गुलाम मुसलमानांच्या मालकांना त्यांची किंमत देऊन अबु बकर यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले होते. मालकाच्या छळाने जखमी झालेल्या बिलाल यांना तर अबु बकर यांनी अत्यंत चढ्या किंमतीने खरेदी केले होते. 

विशेष म्हणजे त्या काळात जखमी झालेल्या किंवा पंगुत्व आलेल्या गुलामांना कोणी खरेदी करत नव्हते. मालकही त्या गुलामांचा सांभाळ न करता त्यांना हालाखीच्या अवस्थेत सोडून देत. कालांतराने तो गुलाम बरा झाला की पुन्हा त्याच्यावर मालकी हक्क लादत. त्यामुळे अबु बकर यांनी बिलाल यांची खरेदी केल्यानंतर अरबांनी आश्चर्य व्यक्त केले होते. बिलाल हे स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी प्रेषितांसोबत मदिनेला स्थलांतर केले. तेथे बनलेल्या पहिल्या मस्जिदीत पहिल्यांदा आजान देण्याचा मान प्रेषितांनी बिलाल यांना दिला होता. पुढे बिलाल यांनी अनेक युध्द मोहिमांचे नेतृत्व केले.   

हजरत अबु बकर यांनी केलेल्या अशा अनेक कृतींमुळे मुस्लिम समाजात त्यांना प्रेषितांच्यानंतर महत्वाच्या इस्लामी पुरुषांमध्ये स्थान दिले जाते. हजरत अबु बकर व्यक्तीगत जीवनातदेखील अतिशय संवेदनशील, चारित्र्यवान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी एकूण चार विवाह केले होते. त्यांना हजरत आएशा यांच्यासह सात अपत्ये होती. प्रेषितांच्या पत्नी खदिजा यांचे निधन झाल्यानंतर प्रेषितांनी काही विवाह केले. त्यात हजरत अबु बकर यांच्या कन्या आएशा यांच्याशी केलेल्या विवाहावर सर्वाधिक चर्चा होते. कारण आएशा यांचे विवाहावेळचे वय फक्त सहा वर्षे होते, असा गैरसमज काही अभ्यासकांनी निर्माण करुन ठेवला आहे.

आएशा यांच्या विवाहवयाचा वाद
आएशा यांच्या विवाहाविषयी निर्माण झालेल्या वादावर टिप्पणी करताना आधुनिक इस्लामी विचारवंत जावेद अहमद गामिदी यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात, “आएशा यांच्या विवाहवयाच्या वादाविषयी आपण (मुस्लिमांनी) एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, हा वाद कुरआनशी जोडलेला प्रश्न नाही. हा प्रेषितांच्या आचरणतत्वांशी (हदिसशी) निगडीत प्रश्न नाही. हा इतिहासलेखनाचा प्रश्न आहे. आपला इतिहास कोणत्याही समकालीन विश्वसनीय इतिहासकाराने लिहिलेला नाही. प्रेषितांनंतर कोणताही इतिहासकार जन्मला नाही. लोकस्मृतींच्या आधारे, मौखीक इतिहासाच्या आधारे एक शतकानंतर इस्लामचा इतिहास लिहिला गेला आहे. ही संदर्भसाधने प्रमाण मानूनच इस्लामचा इतिहास लिहिला गेला आहे.”

ते पुढे म्हणतात, “लोकस्मृती या विश्वसनीय असतीलच असे नाही. लोकस्मृतींमध्ये व्यक्तीगणिक प्रक्षेप होत राहतात. त्यामुळे आएशांच्या विवाहाविषयी गैरसमज रुढ झाले की, त्यांचे वय विवाहावेळी सहा वर्षे आणि बिदाई वेळी नऊ वर्षे होते.” 

आएशा यांच्या विवाहवयाविषयी सत्यता जाणून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन जगातील काही अन्य इतिहासकारांनी याविषयी दिलेली माहिती पडताळून पाहायला लागते. आपण या विषयातील काही तज्ज्ञांच्या संशोधनाआधारे इस्लामच्या पहिल्या फळीतील इतिहासकारांचे विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न करुयात.  

सुलैमान नद्वींचे तीन तर्क
सय्यद सुलैमान नद्वी यांनी त्यांच्या ‘सिरत ए आएशा’ (आएशांचे चरित्र) या महत्वाच्या ग्रंथात काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. ते लिहितात,“ इस्लामच्या विरोधकांचा सर्वात मोठा आक्षेप हा आहे की, प्रेषित इतक्या मोठ्या वयाचे असताना त्यांनी अशा कमी वयाच्या बालिकेशी लग्न करणे योग्य नव्हते. या आक्षेपाच्या उत्तरादाखल मुसलमान विद्वानांनी वेगवेगळे प्रवाद मांडले आहेत. यातील एकाने तर कमी वयाच्या लग्नाचा मुद्दाच नाकारुन लावला आहे. दुसऱ्या एका संशोधकांनी विवाह आणि बिदाईच्या तारखा मान्य केल्या. पण या वयात बिदाईनंतर वैवाहिक संबंध प्रस्थापित होणे गरजेचे नव्हते असा दावा केला. त्यांच्या नवव्या वर्षातील बिदाईचे वय मान्य केले. मात्र तिसऱ्या एका संशोधक महाशयांनी मात्र खूप वेगळे तर्क मांडले आहेत. त्यांनी आधुनिक इतिहासलेखनशास्त्राच्या पध्दतीचा आधार घेऊन या सर्व गोष्टी नाकारल्या आहेत. याविषयावर एक लेख लिहून तो सर्व वर्तमानपत्रात प्रकाशित केला आहे.”

ते पुढे लिहितात,“आता राहिला मुद्दा युरोपियन विद्वानांकडून लावल्या जाणाऱ्या आक्षेपांचा तर त्याचे उत्तर असे आहे की, आक्षेप घेणारे युरोपियन विद्वान आपल्या युरोपच्या थंड वातावरणाच्या परिप्रेक्ष्यातच विचार करत आहेत. थंड हवेच्या ठिकाणी मुली उशिरा वयात येतात. पण तुलनेने उष्ण वातावरणात त्या खूप लवकर वयात येतात. भारतातदेखील युरोपच्या तुलनेत मुली लवकर वयात येतात.”

हे मुद्दे मांडल्यानंतर प्रेषितांनी आएशा यांच्या विवाह करण्याची काही राजकीय कारणे सांगितली आहेत. ते लिहितात, “या विवाहामागचा प्रेषितांचा हेतू इस्लामी इतिहासावरुन स्पष्ट होतो. विवाहाचा पहिला उद्देश प्रेषितत्व आणि खिलाफतीला मजबूती देण्याचा होता. दुसऱ्या बाजूला हजरत आएशा यांची प्रचंड बौद्धिक कुवत आणि क्षमता यांचा उपयोग करून त्यांना इस्लामला आधिकाधिक प्रगल्भ करायचे होते. महिलांमध्ये इस्लामी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे हा उद्देशही होताच. अल्लाहच्या कृपेने ही सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली. हजरत आएशा यांचे आयुष्य आणि कर्तृत्व याचे साक्षीदार आहे.”

जावेद अहमद गामिदींचे तार्कीक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण
जावेद अहमद गामिदींनी इस्लामी इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानल्या जाणाऱ्या ‘तबकात ए इब्ने साद’ या ग्रंथाच्या आधारे  या घटनेचे विश्लेषण करण्याच्या प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, “ इतिहासाचे सर्वात महत्वाचे साधन ‘तबकात ए इब्ने साद’ हे आहे. प्रेषितांनी सर्वात आधी खदिजा यांच्याशी विवाह केला. प्रेषितांचे वय त्यावेळी जवळपास पंचवीस होते. खदिजा यांच्या वयाविषयी म्हटले जाते की, त्या विधवा होत्या. त्यांना मुलंही होती. आणि त्या अडोतीस किंवा चाळीस वर्षांच्या होत्या. त्या शेवटपर्यंत प्रेषितांशी विवाहबंधनात राहिल्या. प्रेषित ५० वर्षांचे असताना खदिजा यांचे निधन झाले. म्हणजे जवळपास पंचवीस वर्षे त्या प्रेषितांसोबत राहिल्या. तोवर प्रेषितांनी दुसरे लग्न केले नव्हते. खदिजांच्या निधनानंतर प्रेषित इस्लामप्रसारात व्यस्त होते. व्यवसायदेखील करायचे. मुलांची जबाबदारी होती. पत्नीच्या निधनाने ते दुःखी असायचे. अशा अवस्थेत एक मुस्लिम स्त्री सहकारी ख्वौला या त्यांना वाटेत भेटल्या. त्या म्हणाल्या की, 
‘मी पाहतेय, की अलीकडे तुम्ही खूप उपेक्षीत आणि उदास दिसता. तुम्ही लग्न का करत नाही.’ 
हे ऐकल्यानंतर प्रेषितांनी विचारले की,  ‘एखादी विवाहेयोग्य स्त्री तुमच्या पाहण्यात आहे?’  
तेव्हा ख्वौला म्हणाल्या, “एक विधवा आहे आणि एक अद्याप लग्न न झालेलीही आहे.”
 
ही चर्चा ज्यावेळी होत आहे तेव्हा ख्वौला या अत्यंत सुज्ञपणे ही चर्चा करीत आहेत, असे मी मानतो. कारण प्रेषितांना आपल्या पत्नीच्या निधनानंतर कुटुंबाची व त्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्रीची गरज आहे. जी स्त्री त्यांची शारीरीक गरजही पूर्ण करु शकेल. त्यामुळे ख्वौला या प्रेषितांच्या सहकारी असणाऱ्या आणि सर्व परिस्थिती ज्ञात असणाऱ्या स्त्रीकडून एका सहा वर्षे वयाच्या बालिकेच्या विवाहाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवणे शक्य नाही. प्रेषितांनी संमती दर्शवल्यानंतर ख्वौला या हजरत अबु बकर यांच्या घरी गेल्या. तेथे त्यांनी आएशा यांच्यासाठी विवाहाचा हा प्रस्ताव समोर ठेवला. हजरत अबु बकर यांनी म्हटले, “माझ्या मुलीचा आएशाच्या विवाहाचा प्रस्ताव आम्ही एका मित्राकडे काही वर्षापुर्वी दिला होता. पण आम्ही इस्लाम स्विकारल्यानंतर त्याने आमच्याशी संपर्क ठेवला नाही. त्यातही तो आता भरकटला आहे. आणि आम्ही इस्लामी सन्मार्गावर आहोत.”

ख्वौला आणि अबु बकर यांच्यातील हा संवाद पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, काही वर्षापुर्वी याचा अर्थ स्पष्ट आहे की, दोन तीन वर्षापुर्वी तरी असू शकेल. जर प्रेषितांशी विवाहाची बोलणी सहाव्या वर्षी झाली असे मानले तर आएशा यांच्या विवाहाचा प्रस्ताव अबु बकर यांनी आपल्या मित्राला आएशा दोन किंवा तीन वर्षाच्या होत्या त्यावेळी दिला होता, हे मान्य करावे लागेल. जे अशक्य वाटते. अबु बकर यांच्या भेटीत निर्णायक चर्चा झाली नाही. 

त्यानंतर ख्वौला यांनी हजरत सौदा ज्या विधवा होत्या. त्यांच्याकडे विवाहाचा प्रस्ताव दिला तो त्यांनी मान्य केला. त्यावेळी सौदा यांचे वय जवळपास पन्नास वर्षे होते. इकडे अबु बकर यांनी पुर्वी ज्यांच्याकडे विवाहाचा प्रस्ताव दिला होता. त्यांच्याशी संपर्क करुन विचारणा केली तेव्हा त्यांनी ‘तुम्ही लोक मुसलमान झाले असल्याने आता विवाह शक्य नाही’, असे म्हटले. त्यानंतर अबु बकर यांनी प्रेषितांच्या प्रस्तावासंदर्भात विचारणा केली. 

सौदा यांच्याशी विवाहाचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर प्रेषितांनी आएशा यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्तावही स्विकारला. पण सौदा या पन्नास वर्षांच्या आहेत. त्यांच्यासमोर जर आपण एका तरुणीशी विवाह केला. तर त्यांच्या इच्छा, अपेक्षां वगैरेंना मुरड घातली जाईल. त्यामुळे त्यांनी आएशांशी विवाह तर केला, पण त्यांना आपल्या घरी आणले नाही. 

तब्बल पाच वर्षांनी सौदा यांनी ‘आता आपले वय झाले आहे, आता कोणत्याही पुरुषाची शारीरिक गरजेसाठी आवश्यकता नाही. पण प्रेषितांशी मी अखेरपर्यंत विवाहबंधनात राहू इच्छिते.’ असा व्यावहारिक विचार करुन प्रेषितांची गरज म्हणून आएशांना घरी आणण्याची परवानगी दिली.” 

‘तबकात ए इब्ने साद’ च्या संदर्भाने जावेद अहमद गामिदी यांनी केलेली चर्चा वस्तुनिष्ठ आणि तार्किक वाटते. त्यामुळे प्रेषितांनी सहा वर्षे वयाच्या बालिकेशी विवाह केला, या आरोपात तथ्य राहत नाही. गामिदी म्हणतात त्याप्रमाणे आएशांचे वय १६ किंवा १९ असण्याची शक्यता आधिक आहे. इब्ने खल्दून ज्यांना कार्ल मार्क्सच्या पुर्वीचा समाजवादी म्हटले जाते, त्यांनीही यासंदर्भात असेच स्पष्टीकरण देऊन ठेवले आहे. हजरत आएशा या प्रेषितांसोबत जवळपास नऊ वर्षे सहा महिने विवाहबंधनात होत्या. पण प्रेषितांच्या हयातीत आणि त्यांच्या निधनानंतर हजरत आएशा यांनी इस्लामी धर्म, राज्य आणि अरबी समाजासाठी खूप ऐतिहासिक कार्य करुन ठेवले आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या या कार्याची थोडक्यात माहिती आपण घेऊयात.  

हजरत आएशा यांचे शैक्षणिक कार्य 
इस्लामने सातत्याने ज्ञानाचा आग्रह धरला आहे. तर दुसऱ्या बाजूला अज्ञान, निरक्षरता यांचा निषेधही नोंदवला आहे. मुसलमान झाल्यानंतर हजरत अबु बकर यांनी ही शिक्षणाविषयीची नवदृष्टी स्विकारली. इस्लामच्या स्थापनेनंतर मक्केत शैक्षणिक स्थिती खूपच विदारक होती. संपूर्ण मक्का शहरात केवळ ७० लोक साक्षर होते. शिफा बिंत अब्दुल्ला ही एकमेव महिला साक्षर होती. इस्लामपश्चात स्त्री शिक्षणाची स्थिती बदलली. 

आएशा यांनीही या बदलत्या परिस्थितीत शिक्षण घेतले. विवाहानंतरदेखील त्यांचे शिक्षण थांबले नाही. कुरआन वाचनासाठी त्यांनी अरबी लिपी शिकून घेतली होती. त्या स्वतः पत्रव्यवहार करत होत्या. मस्जिद ए नबवी मध्ये होणाऱ्या व्याख्यांनांमध्ये त्या सहभागी व्हायच्या. व्याख्यानातील न समजलेल्या, मतभेदाच्या मुद्यावर प्रेषितांशी चर्चा करत होत्या. स्वतः महिलांच्या परिसंवादांचे आयोजन करत होत्या. धार्मिक प्रवचने देत होत्या. हजरत आएशा यांनी धार्मिक प्रवचने, व्याख्यानांच्या पलिकडे जाऊन अरबांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भरीव कार्य केले आहे. 

सुलैमान नद्वी यांनी याविषयी विस्ताराने माहिती दिली आहे. मस्जिद ए नबवीमध्ये विद्यालये चालवली जात होती. सय्यदना इब्ने उमर, हजरत अबु हुरैरा, इब्ने अब्बास आणि सय्यद जैद बिन हारीस यांचे वेगवेगळ्या विषयांवरील वर्ग चालायचे. त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय वर्ग हजरत आएशा यांचा होता. हजरत आएशांची शाळा प्रेषितांच्या घराजवळ होती. अनेक मुलं आणि पुरुषदेखील या शाळेत शिक्षण घेत होते. आएशांच्या वर्गात स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था होती. आएशांच्या उपस्थितीत या वर्गामध्ये अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. वाद-विवादाच्या बैठका व्हायच्या. एक विशिष्ट विषय देऊन त्यावर मांडणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाई. 

हजरत आएशा आपल्या विद्यार्थ्यांच्या भाषाकौशल्याकडे विशेष लक्ष द्यायच्या. विशेषतः शाब्दिक उच्चारांकडे त्यांचे जास्त लक्ष होते. त्याविषयी त्या मार्गदर्शन करायच्या. ज्या-ज्या व्यक्तींनी हजरत आएशा यांच्याकडून थेट शिक्षण प्राप्त केले, त्यांनी इस्लामी राज्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन नावलौकीक प्राप्त केले होते. यामध्ये सय्यदना कबीसा, उरवा आणि इमाम नकफी यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. 

दरवर्षी हजच्यावेळी बाहेरून अनेक कवी, विचारवंत, लेखक मक्का शहरात येत. कोहे हिरा आणि सबीर या डोंगरांच्या मध्ये हजरत आएशा यांचा तंबू असायचा. त्यावेळी अनेक विद्वान त्यांच्या खेम्याजवळ येत. त्यांच्याकडून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत. हजरत आएशा यांना प्रश्न विचारताना अनेकांवर एकप्रकारचे दडपण यायचे. तेव्हा हजरत आएशा म्हणायच्या, ‘तुम्ही तुमच्या आईला जसे प्रश्न विचारता तसे प्रश्न मला विचारत चला.’ 

प्रेषितांचे सहकारी सय्यदना अबू मुसा अशहरी हे एकदा आएशा यांना प्रश्न विचारताना कचरले, तेव्हाही त्या असेच म्हणाल्या. हजरत आएशा आम्हाला आईच्या मायेने शिक्षण देतात, असे काही तत्कालीन विद्वानांनी नोंदवून ठेवले आहे. तर काही गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची आणि उपजिवेकीची जबाबदारी हजरत आएशा स्वतः उचलत होत्या. हजरत आएशा आपल्या विद्यार्थ्यांशी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने वागत की, त्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना वाटे की आपणही या मुलांना इतके प्रेम देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच, त्यांच्या वेगवेगळ्या कौशल्यविकासाकडेही आएशा यांचे लक्ष असायचे.  

हदिस आणि फिकह (इस्लामी विधीशास्त्र) मध्ये हजरत आएशा यांचे योगदान
इस्लामचे दोन मुख्य आधार आहेत. एक कुरआन आणि दुसरे प्रेषितांची वचने. प्रेषितांच्या वचनांचे संकलन प्रेषितांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी सुरु झाले. प्रेषितांची वचने मौखिक स्वरुपात संकलीत करुन ती विद्यार्थ्यांना शिकवणे, त्याविषयीचे विश्लेषण करुन इस्लामी जीवनसंहिता अधिकाधिक विकसित करण्यात हजरत आएशांचे मोठे योगदान मानले जाते. प्रेषितांच्या वचनांचे कथन करण्यात प्रेषितांसोबत ज्यांनी जीवन व्यतीत केले त्या सोबत्यांमध्ये हजरत आएशांचा सहावा क्रमांक लागतो.

यामध्ये एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, तत्कालीन समाजाच्या रितींप्रमाणे आणि इस्लामी संहितेमुळे त्या पुरुषांच्या बरोबरीने अथवा ते ज्या प्रमाणात व्याख्याने, वाद-विवादांमध्ये भाग घेतात, त्यापध्दतीने हजरत आएशा यांना सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे प्रेषितांच्या वचनांविषयी त्यांनी दिलेली व्याख्याने, प्रवचनांची संख्या कमी आहे. तरीदेखील प्रेषित वचनसंग्रहाच्या बाबतीत त्यांचा सहावा क्रमांक लागतो. हजरत आएशा यांच्याआधी प्रेषित वचने संग्रहीत करण्यात ज्यांचा वरचा क्रम आहे, ते लोक हजरत आएशा यांच्यानंतरही अनेक वर्षे हयात होते, हा मुद्दाही येथे लक्षात घेतला पाहिजे. हजरत आएशा यांनी जी वचने कथन केली आहेत, त्या वचनांची संपूर्ण पार्श्वभूमी त्यांनी सांगितली आहे. त्यामुळे कोणत्याही खटल्याचा निकाल देताना, वादामध्ये समेट घडवताना हजरत आएशांनी उद्धृत केलेल्या वचनांनी मोठी भूमिका बजावली आहे. 

हदिस वचनसंग्रहांप्रमाणेच विधीशास्त्राच्या विकासामध्येही आएशांनी महत्वाचे योगदान दिले आहे. सय्यद सुलैमान नद्वी ‘सिरत ए आएशा’मध्ये लिहितात, ‘प्रेषित हयात असेपर्यंत ते स्वतः ज्ञानाचा केंद्रबिंदू होते. प्रेषितांच्या निधनानंतर ज्ञानार्जनाच्या या महान स्त्रोताशी असणारे जैविक नाते संपुष्टात आले होते. हजरत अबु बकर आणि हजरत उमर यांच्या खिलाफतीच्या काळात काही प्रश्न निर्माण झाले की, त्याची उत्तरे शोधण्यासाठी उलेमांना बोलावले जाई. प्रेषितांच्या वचनांचा धांडोळा घेऊन उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाई. त्यातून काही उत्तरे मिळाली नाही तर तर्काच्याआधारे (इज्तेहाद) प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला जाई.’ 

ते पुढे लिहितात,‘हजरत उस्मान यांच्या काळात बंडखोरांनी उच्छाद मांडला, त्यावेळी अनेक लोक मदिना सोडून मक्का, ताईफ, दमिश्क आणि बसरासारख्या अन्य शहरात निघून गेले. मदिनेत प्रेषितांचे जे अन्य सहकारी होते, त्यामध्ये हजरत अब्दुल्ला बिन उमर, अब्दुल्ला बिन अब्बास, हजरत अबु हुरैरा आणि हजरत आएशा होत्या. फतवे (धार्मिक सल्ला) देण्यासाठी हे चार लोकच अधिकृतरीत्या जबाबदार मानले जात होते. तेच फतवे देण्याच्या मसनदीवर (गादीवर) बसत. हजरत आएशा वगळता अन्य लोकांची फतवे देण्याची पध्दत निराळी होती.’

सुलैमान नद्वी लिहितात, ‘हजरत आएशा यांच्याकडे एखादे प्रकरण आले तर त्या कुरआनच्या आधारे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत. त्यात त्यांना यश आले नाही तर प्रेषित वचनांचा आधार घेऊन प्रकरणाचा निवाडा करण्याचा प्रयत्न करत. त्याआधारे प्रकरणाचा निवाडा शक्य नसल्याचा तर्कशास्त्राचा आधार घेऊन त्या संबंधीत प्रकरणामध्ये निर्णय देत होत्या. अनेक जटील प्रकरणात हजरत आएशा यांनी तर्कशास्त्राच्या आधारे निर्णय घेतला होता. इज्तेहादच्या प्रकरणात त्या कधीही चुकत नव्हत्या. कारण इस्लामी विधीशास्त्राचे शिक्षण त्यांनी थेट प्रेषितांकडून घेतले होते.’

वैद्यकीय सेवा
इस्लामी ज्ञानक्रांतीनंतर अरबस्तानात वैद्यकीयक्षेत्रात मोठे परिवर्तन घडून आले. जुनाट औषधोपचारांची जागा नव्या तंत्राने आणि औषधांनी घेतली. छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ लागल्या. युध्दात झालेल्या जखमांना काही वेळा टाके लावण्याचे कामही केले जात होते. वनस्पतींच्या मिश्रणातून नवी औषधे तयार केली जात होती. त्यासाठी छोट्या मोठ्या प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या होत्या. अरबस्तानात घडलेल्या या वैद्यकीय परिवर्तनाचे जनक म्हणून हजरत आएशा यांच्याकडे पाहिले जाते. 

उरवा हे आएशांचे भाचे होते. ते आएशांच्या वैद्यकीय क्षेत्रातील निपुणतेविषयी म्हणतात,“मी हजरत आएशांपेक्षा मोठा वैद्यकीय क्षेत्रातला विद्वान पाहिला नाही. एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, ‘तुम्ही कविता केल्या असत्या तर मी नवल मानले नसते. कारण तुम्ही अबु बकर यांच्या कन्या आहात. ते स्वतः या क्षेत्रात विद्वान होते. पण वैद्यकीय क्षेत्रातील इतके ज्ञान तुम्ही कसे मिळवले?’ त्यावेळी आएशांनी याचे कारण सांगताना, प्रेषित शेवटच्या काळात आजारी असताना अरब आणि आणि अरबस्तानाच्या बाहेरचे अनेक विद्वान वैद्य त्यांच्या उपचारासाठी येत असत. त्यांच्याशी चर्चा व्हायची. अनेक प्रयोग केले जायचे. प्रेषितांवर उपचार करताना वैद्यकीय ज्ञानाचे धडे गिरवल्याचे आएशा यांनी सांगितले.” 

एखाद्या नव्या विषयातील ज्ञान हाशील करण्याची जिज्ञासा आएशांमध्ये होती. त्यामुळे आएशा याविषयीची माहिती संकलीत करत राहिल्या. मिळालेल्या माहितीवर त्या चिंतन करीत. प्रयोगातून नव्या ज्ञानाला सिध्द करण्याची वेगळीच कुव्वत त्यांच्याकडे होती. हजरत आएशा युध्दांमध्ये सैन्यासोबत जात होत्या. जखमी सैनिकांचे उपचार युध्दाच्या मैदानात जाऊन त्यांनी केले होते. तात्कालीक उपचार करण्यासोबत आएशा सैनिकांना दिर्घकालीन उपचार व वैद्यकीय सल्लादेखील द्यायच्या. 

मौखीक इतिहासकथनाची परंपरा आणि हजरत आएशा
आएशा या अरब इतिहासातील मौखिक इतिहासकथनाच्या परंपरेतील एक नामांकित इतिहासकार मानल्या जातात. त्यांना पिता आणि पतीकडूनही इतिहासकथनाचा हा मौखिक वारसा मिळाला होता. हजरत अबु बकर हे टोळीसंस्कृतीचे अभ्यासक होते. टोळीसंस्कृतीच्या अनेक प्रथा, परंपरांचा इतिहास त्यांना मुखोद्गत होता. दुसऱ्या बाजूला विवाहानतंर प्रेषितांच्या घराण्यात मौखीक इतिहासकथनाची परंपरा होती. दाई हलिमा या तत्कालीन अरबस्तानातील नावाजलेल्या मौखिक इतिहासकार होत्या. त्यांच्या घरीच प्रेषितांची बालपणातील जडणघडण झाली होती. या दोन्ही वारश्यातून हजरत आएशा इतिहासाकडे अतिशय चौकसपणे पाहायच्या. 

इतिहासाचा अर्थ लावण्याची त्यांची पध्दत इतरांपेक्षा निराळी होती. उरवा बिन जुबैर म्हणतात, “अरबस्तानाच्या इतिहास आणि वंशावळीचा आएशांच्याइतका मोठा तज्ज्ञ अरबस्तानात दुसरा कुणी झाला नाही. ”प्रेषितांच्या वचनांमध्ये अरबस्तनानातील अज्ञानयुगातील रिती, परंपरा आणि रुढींविषयी जी माहिती मिळते, त्या सर्व वचनांचे संकलन हजरत आएशांमुळे शक्य झाले आहे. उदा. अरबस्तानात लग्नात कीती प्रकारची गाणी गायली जात होती, लग्नातल्या प्रथा कोणत्या होत्या याविषयीची माहिती असो की, हजयात्रेत लोक कशा पध्दतीने प्रवास करत, हजयात्रेचा इतिहास, मक्का शहाराचा इतिहास असो किंवा, वेगवेगळ्या टोळ्यांमधील नातेसंबंध, टोळ्यागणित बदलणाऱ्या रुढी परंपरा, इस्लामपश्चात झालेले बदल, प्रेषितांनी मक्केहून मदिनेकडे स्थलांतर करताना घडलेल्या बारीकसारीक घटना, मदिनेत आल्यानंतर झालेले बदल, मदिनेतील घडामोडी, बद्र आणि ओहोदचे युध्द याविषयी आएशांइतकी सुक्ष्म माहिती अन्य इतिहासकारांनी नोंदवलेली नाही. 

हजरत आएशा यांचे काव्यलेखन
हजरत आएशा इतिहास, वैद्यकशास्त्रासोबतच काव्यलेखनातही कौशल्य प्राप्त केले होते. त्या वेगवेगळ्या कवी संमेलनांमध्ये सामील व्हायच्या. शोकगीतांची एक विशिष्ट परंपरा अरबस्तानात आढळते. शोकगीत हे चाळीस कडव्यांवर आधारीत असते. हजरत आएशांना शेकडो शोकगीत पाठ होते. इमाम बुखारी म्हणतात, “हजरत आएशा यांना काफ बिन मालिक या कवीचा संपूर्ण कसिदा तोंडपाठ होता.” 

काफ बीन मालीक हा त्याकाळातील प्रसिध्द शायर होता. अनेक हदिसमध्ये हजरत आएशांच्या काव्य पाठांतराविषयी नोंदी आढळतात. कुटुंबातील अनेक सोहळ्यांमध्ये, राजकीय, धार्मिक व्याख्यानांमध्ये आएशा कवितांचे दाखले देत होत्या. याशिवाय आएशांनी अनेक कविता रचल्या होत्या. त्यांच्या कवितांच्या काही ओळी हदिसमध्ये येतात. पण या लेखनाकडे अरबी मुस्लिमांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्यांच्या अनेक कवितांचे संकलन होऊ शकले नाही. पण त्यांच्या काही कविता सुलैमान नद्वी यांनी नोंदवल्या आहेत. त्या महत्वाच्या आहेत. 
इस्लामची स्त्रीविषयीची भूमिका ज्या-ज्यावेळी चर्चेला येईल त्यावेळी हजरत आएशा यांचा इतिहास मांडला जाईल. त्या इतिहासाविषयी चर्चा करताना विशेषतः त्यांनी विधी, वैद्यक यांसारख्या शास्त्रांमध्ये टाकलेली भर आणि स्त्रियांच्या व्यक्तीगत आधिकारांसाठी करुन ठेवलेली मांडणी अतिशय महत्वपूर्ण आहे. विशेषतः हदिस संकलनाच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान कदापि विसरता येणार नाही. 
 
- सय्यद शाह वाएज

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter