आपल्या उदारमतवादी भुमिकेसाठी प्रसिद्ध असलेले 'मुस्लिम वर्ल्ड लीग'चे प्रमुख डॉ. मुहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा यांनी गेल्यावर्षी हज यात्रेच्या चौथ्या दिवशी मक्केपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अराफातच्या मैदनात जगभरातून हज यात्रेला आलेल्या मुस्लिमांना उद्देशून भाषण केले. त्यांचे हे भाषण जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवाद करून ऐकवण्यात आले. 'मुस्लीम बांधवांनी इतर धर्माचा आदर केला पाहिजे आणि सर्व धर्मीयांमध्ये एकोपा कसा राहील याबाबत प्रयत्नशील राहायला हवे' , असा सल्लावजा उपदेश त्यांनी उपस्थित असलेल्या लाखो भाविकांना केला होता. या भाषणामुळे डॉ.अल इसा यांची जगभरातून प्रशंसा करण्यात आली.
जगाचे लक्ष वेधून घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. सौदी अरेबियाचे न्यायमंत्री म्हणून कार्यकाळ सांभाळताना त्यांनी अमुलाग्र बदल घडवले. कायदामंत्री म्हणून त्यांच्या प्रगतीशील भूमिकांमुळे जगभराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ते सौदी अरेबियातील वरिष्ठ विद्वान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी मांडलेल्या भूमिका लक्षणीय ठरल्या.
ते न्यायमंत्री असताना सौदी अरेबियामध्ये सुधारणांची लाटच आली. कौटुंबिक कायदे, मानवतावादी प्रकरणे, महिलांचे हक्क यांसह अनेक क्षेत्रांमधील सुधारणा त्यांच्याच नेतृत्वाखाली झाल्या. विशेष म्हणजे, युवराज मोहम्मद बिन सलमान यांची देशाची सामाजिक आणि आर्थिक रचना बदलण्याची मोहीम सुरू करण्यापूर्वीच डॉ.अल इसा यांच्या कार्यकाळात हे बदल घडले होते.
सुधारणावादी विचारांचे डॉ. अल-इसा यांची ओळख केवळ एक उच्चविद्याभूषित व्यक्ती इतकीच नाहीत. ते त्याहून अधिक आहेत. माणुसकीवर विश्वास असलेली जगातील अनेक राष्ट्रे त्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत असतात. या पार्श्वभूमीवर ते आठवडाभरासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी त्यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष बहुसांस्कृतिक मूल्यांचे कौतुकही केले आहे.
डॉ अल-इसा यांनी अराफत इथे दिलेलं प्रवचन हे त्यांच्या उदारमतवादी आणि सुधारणावादी विचारांचे प्रतिक ठरले आहे. 'मुस्लिमांना चांगली कृत्ये करत रहावीत आणि इतरांच्या श्रद्धास्थानांना दुखवू नये. त्यांच्याशी चांगले वागावे. सर्वधर्मीय लोकांचा आदर करा.' असा उपदेश त्यांनी या प्रवचनात दिला होता. समाजात द्वेष परवणाऱ्या कृत्यांपासून आणि अशी कृत्ये करणाऱ्यांपासून मुस्लिमांनी स्वतःला दूर ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला होता.
'इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे मतभेद, वैमनस्य, विभाजन या सर्व गोष्टी टाळून सुसंवाद आणि प्रेम यांना जागा द्या', असे भावनिक आवाहन त्यांनी अराफातमधील निष्टावंताना केले होते.
कुरआन आणि सुन्नाचे पालन करायचे म्हणजे एकता, बंधुता आणि सहकार्य यांचे आचरण करणे. मुस्लीमांचे आपापसातले आणि इतरांसोबतच्या संबधांत सुधारणा करण्यासाठी या बाबी महत्वाच्या ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले होते. त्यांच्या या हजच्या प्रवचनाचे हिंदी, उर्दू, बंगाली आणि तामिळसह 14 भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले.
डॉ. अल-इसा हे विविध समुदाय, धर्म आणि राष्ट्रांमध्ये भागीदारी करण्यास आग्रही असतात. अतिरेकी आणि दहशतवादी विचारसरणीशी लढण्यासाठी सौदी संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या बौद्धिक युद्ध केंद्राचेही ते प्रमुख आहेत.
२०२० मध्ये डॉ. अल-इसा यांनी मुस्लीम धर्मगुरूंबरोबर पोलंडमधील ऑशविट्झ येथील ज्यू छळछावणीला भेट दिली. ऑशविट्झ छळछावणीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुस्लीम शिष्टमंडळाची ही भेट ऐतिहासिक ठरली. 'ऑशविट्झ म्युझियमला भेट देणारे सर्वांत महत्त्वाचे इस्लामी प्रतिनिधी मंडळ' असे कौतुक ऑशविट्झ म्युझियमने केले होते.
अँटी सेमिटीसीजम, इस्लामोफोबिया आणि द्वेषमुलक भाषणांचा सामना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल, अमेरिकन ज्यू कमिटी, अमेरिकन सेफार्डी फेडरेशन आणि कॉम्बॅट अँटी-सेमिटिझम मूव्हमेंट आधी महत्त्वाच्या संस्थांनी डॉ. अल-इसा यांच्या कार्याचे कौतुक केले.
२०१९ मध्ये इस्टरच्या भीषण दहशतवादी हल्ल्यांमुळे श्रीलंकेत आंतर-धार्मिक दरी निर्माण झाली होती. त्याला उत्तर देण्यासाठी श्रीलंकेत सलोखा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. अल-इसा यांनी फ्रान्समधील अब्राहमिक धर्मांच्या (ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम) प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली शांतता आणि एकता करारावर स्वाक्षरी केली. २०१७ मध्ये त्यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. यावेळी MWL आणि व्हॅटिकन चर्च यांच्यामध्ये पहिला ऐतिहासिक करार झाला.
जगभरातील मान्यवरांनी डॉ. अल इसा यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार
अमेरिकन ज्यू कमिटी (AJC) ने डॉ. अल-इसा यांचे वर्णन 'इस्लामची खरी भूमिका मांडणारा मुस्लिम जगातील सर्वात शक्तिशाली आवाज' असे केले. तर कार्डिनल टिमोथी डोलन यांनी डॉ. अल-इसा यांना 'विविध धर्मांमधील सलोखा आणि मैत्री यांसाठी झटणारे इस्लामिक जगतातील सर्वात महत्त्वाचे प्रवक्ते' म्हटले.
जीझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे या चर्चचे अध्यक्ष रसेल नेल्सन म्हणाले, 'डॉ. अल-इसा शांतीदूत आहेत. दोन धर्मांमध्ये पूल बांधण्याचे काम ते करत आहेत. जगाला त्यांच्यासारख्या आणखी नेत्यांची गरज आहे.' येशिवा युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अरी बर्मन यांनी डॉ. अल-इसा यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्या मते, मुस्लिम आणि ज्यू यांच्यातील ऐतिहासिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने डॉ. अल इसा प्रयत्नशील आहेत.
अब्राहमिक धर्मांना एकत्र आणण्यासाठी डॉ. अल-इसा यांच्या प्रयत्नांची अमेरिकेचे राजदूत सॅम ब्राउनबॅक यांनी प्रशंसा केली. अँटी सेमिटिझमचे निरीक्षण आणि मुकाबला करण्यासाठी नेमलेल्या अमेरिकेच्या एलन कॅर या विशेष दूतानेही यांनी डॉ. अल-इसा यांचे कौतुक केले. ते म्हणाले, 'ते केवळ ज्यू आणि मुस्लिमच नाही नाही तर सर्वच मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी समाजाची बांधणी करत आहेत.'
२०२० मध्ये दहशतवादाशी संबंधित अहवाल सादर करणाऱ्या अमेरिकेच्याच्या एका विभागाने डॉ. अल-इसा यांनी तयार केलेल्या दहशतवादविरोधी कायद्याची दखल घेतली आणि म्हटले, 'मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद अल-इसा यांनी केवळ अरब नाही तर जगातील सर्व मुस्लिम इमामांसह धार्मिक अधिकारी यांना आंतरधर्मीय संवाद, धार्मिक सहिष्णुता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचा संदेश दिला आहे.'
२०१९ च्या यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या दहशतवादविरोधी अहवालामध्ये नेमस्त (मॉडरेट) इस्लामचा प्रचार करणाऱ्यांमध्ये डॉ. अल-इसा यांच्या नावाचाही समावेश केला. 'जगभर संयम आणि सहअस्तित्वाचा संदेश पोहोचावा यासाठी ते कठीण परिश्रम घेत आहेत.' असे कौतुक त्यात करण्यात आले होते.
२०१९ मध्ये, श्रीलंकेत झालेल्या प्राणघातक इस्टर हल्ल्यानंतर तेथील धार्मिक विद्वेष शांत व्हावा आणि त्या देशाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी डॉ. अल-इसा तेथील बौद्ध आणि मुस्लिम धर्मगुरूंना भेटले. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्याकडून त्यांना ऑर्डर ऑफ पीस हा पुरस्कारही मिळाला.
जगभर इस्लामचा शांतीचा संदेश पसरवणारे, धार्मिक सुसंवाद आणि सौहार्दासाठी कृतीशील असणारे डॉ. अल- इसा आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भारतभेटीमुळे सौदी अरेबियातील प्रभावशाली इस्लामिक विद्वान आणि सुधारणावादी यांच्याशी संवाद साधण्याची संधी भारताला मिळणार आहे.
(अनुवाद : पूजा नायक)
मुस्लीम वर्ल्ड लीग प्रमुख डॉ. अल-इसा यांच्या भारतभेटीशी संबंधित हे इतर लेखही वाचा :
'मुस्लीम वर्ल्ड लीग' प्रमुखांचा भारत दौरा का आहे महत्वाचा?
भारत सौहार्दपूर्ण सहजीवनाचे एक आदर्श मॉडेल - डॉ. अल-इसा
डॉ. अल-ईसा यांनी घेतली पीएम मोदींची भेट
'मुस्लिम वर्ल्ड लीग'च्या प्रमुखांचा भारतदौरा ठरणार महत्त्वाचा
डॉ. अल-ईसा यांनी घेतली पीएम मोदींची भेट